युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
फीट इंडिया फ्रीडम रनचा महाराष्ट्रात शुभारंभ
एनएसजी कमांडोंच्या नेतृत्वात गेटवे ऑफ इंडिया इथे फिट इंडिया फ्रीडम रन
दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायामासाठी खर्च करा- केंद्रीय क्रीडा मंत्री
नेहरू युवा केंद्रातर्फ ऑगस्ट क्रांती मैदान आणि इतर ऐतिहासिक महत्वाच्या स्थळांवरून फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन
Posted On:
13 AUG 2021 3:32PM by PIB Mumbai
मुंबई/पुणे, ऑगस्ट 13, 2021
फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चा भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दल- एनएसजच्या 50 कमांडोनी नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडीयम इथे झालेल्या अखिल भारतीय दौड मध्ये सहभाग घेतला. त्यांच्यासह, देशातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या 10 स्थळांवरून निमलष्करी दलाचे जवान आणि सर्वसामान्य नागरिकही या उपक्रमात सहभागी झाले होते. यात, अलाहाबाद येथील आझाद पार्कपासून सीआरपीएफचे जवान, पोर्ट ब्लेअर इथल्या सेल्युलर जेलपासून सीआयएसएफचे जवान, हिमाचल प्रदेशच्या लाहौल-स्पिती इथून आयटीबीपी चे जवान, आसामच्या तेजपूर इथून, सीमा सुरक्षा दलाचे जवान, भारत-पाक सीमा, अटारी इथून सीमा सुरक्षा दलाचे जवान, झांसी रेल्वे स्थानकापासून, पंजाब रेल्वेचे जवान या सगळ्यांनी या देशव्यापी स्वातंत्र्य दौडमध्ये सहभागे घेतला होता. तर नेहरू युवा केंद्र संघटनेने लेह आणि चेन्नई इथून या उपक्रमात सहभाग घेतला होता.
या देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे आणि त्याला लोक चळवळीचे – ‘जन भागीदारी से जन आंदोलन’ असे स्वरूप देण्याचे आवाहन केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. नागरिकांनी दररोज किमान अर्धा तास शारीरिक व्यायाम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे- ‘फिटनेस की डोस, आधा घंटा रोज’.
गेटवे ऑफ इंडिया- फ्रीडम रन
मुंबईतील गेट वे इंडिया या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील ऐतिहासिक स्मृतीस्थळापासून, ही फ्रीडम रन सुरु झाली, याच ठिकाणाहून, भारत स्वतंत्र झाल्यावर 1948 साली ब्रिटीशांची शेवटची तुकडी, भारतातून इंग्लंडला रवाना झाली होती.
देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चा भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दल- एनएसजी च्या 50 कमांडोंनी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथून फ्रीडम रनची सुरुवात केली. या जवानांनी, मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या इमारती, जसे मुंबई उच्च न्यायालाय, नरीमन पोइंट इथून ही दौड घेत, गेटवे ऑफ इंडिया येथेच त्याची सांगता केली.
यावेळी बोलतांना एनएसजी चे ग्रुप कमांडर, कर्नल नितेश कुमार म्हणाले, “या दौड मध्ये सहभागी झालेल्या सर्व जवानांनी कोविड विषयक नियम-प्रोटोकॉलचे पूर्ण पालन केले”.
फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रमाचा देशव्यापी शुभारंभ करताना, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी, सध्याच्या विपरीत हवामानाच्या स्थितीतही यशस्वीपणे दौड केल्याबद्द्द्ल एनएसजीचे ग्रुप कमांडर कर्नल नितेश कुमार, आणि त्यांच्या 50 जवानांच्या चमूचे कौतुक केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमांचा भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
ऑगस्ट क्रांती मैदानापासून फ्रीडम रन
नेहरू युवा केंद्र संघटनेने ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानापासून, सुरु केलेल्या फ्रीडम रन मध्ये 20 स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्याआधी, सर्वांनी ऑगस्ट क्रांती स्तंभ इथे फिटनेस म्हणजेच तंदुरुस्त आरोग्य राखण्याची प्रतिज्ञा घेतली. आधी गोवालिया टॅंक मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैदानावरच महात्मा गांधी यांनी 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनाचा नारा दिला होता.
पुण्यातील फ्रीडम रन
पुण्यातील नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यालयाने, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेपासून, या फ्रीडम रनची सुरुवात केली होती. त्यावेळी ‘पुना’अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहराने स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले होते. तसेच, याच शहरात, हुतात्मा क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म झाला होता; ज्यांना भगत सिंह, सुखदेव थापर यांच्यासह ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हत्येसाठी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. नामदार गोपाल कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या सर्वेंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सचिव, मिलिंद देशमुख या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नेहरू युवा केंद्राने देखील महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या रायगड इथून फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील गावागावात स्वराज्याची ज्योत पेटवणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मस्थानापासून ही दौड सुरु झाली. तसेच, वर्धा, अकोला, हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणीही स्वातंत्र्य दौड आयोजित करण्यात आल्या होत्या.
देशातील 744 जिल्ह्यात फ्रीडम रन
आझादी का अमृत महोत्सवांतर्गत युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या या संकल्पनेअंतर्गत साकारण्यात आलेलता फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 देशात 75 जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील 75 गावांमध्ये 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. दीड महिन्यात एकूण 744 जिल्ह्यात हे कार्यक्रम होतील.
लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात धावणे आणि खेळ यासारख्या तंदरुस्ती राखणाऱ्या फिटनेस उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, तसेच लठ्ठपणा, आळशीपणा, तणाव, चिंता, आजार यापासून त्यांना दूर राखणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
नामवंत लोक, लोकप्रतिनिधी, पंचायत नेते, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, प्रसारमाध्यम क्षेत्रातील व्यक्ती, डॉक्टर, शेतकरी आणि लष्कराच्या जवानांनी विविध स्तरांवर या कार्यक्रमांना उपस्थित राहून लोकांना प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात येत आहे
लोकांनी त्यांच्या रनचे फोटो फिट इंडिया पोर्टलवर https://fitindia.gov.in अपलोड करावेत, आणि त्यांच्या सोशल मिडीयावरूनही #Run4India आणि #AzadikaAmritMahotsav हे हॅशटॅग वापरून फ्रीडम रनला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रकाश कुमार मनुरे राज्य संचालक, नेहरू युवा केंद्र संघटन (महाराष्ट्र-गोवा) युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, श्री प्रतीक करंजकर सहाय्यक संचालक आणि श्री राहुल तिडके उपसंचालक पत्र सूचना कार्यालय मुंबई यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
***
S.Tupe/N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1745429)
Visitor Counter : 235