संरक्षण मंत्रालय

लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन यांनी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. कारगिल युद्धातील अनुभवी सेनानी देशासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत असे त्यांनी सांगितले.

Posted On: 26 JUL 2021 4:04PM by PIB Mumbai

 

पुणे 26 जुलै 2021

भारतीय सशस्त्र दलांनी 1999 मध्ये कारगिल येथे पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने आज कारगिल विजय दिवस साजरा केला. अतिउंच बर्फाळ प्रदेशात शौर्याने लढा देऊन शत्रूला नामोहरम करणाऱ्या भारतीय जवानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दर वर्षी 26 जुलै हा दिवस देशभरात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पुण्यातील राष्ट्रीय युध्द स्मारक येथे  झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात,  दक्षिण कमांड चे जिओसी -इन-सी लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन यांनी देशाची प्रादेशिक अखंडता कायम राखण्यासाठी सर्वोच्च त्यागाचे आदर्श उभे करत कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. पुणे येथील सर्वात ज्येष्ठ सेनानी, मेजर जनरल हुक्कुर ए.के. (निवृत्त) यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून कारगिल  श्रद्धांजली वाहिली. लष्कराच्या दक्षिण कमांडमधील सर्व लष्करी ठाण्यांवर आठवडाभर अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले, यामध्ये विविध सोहोळ्यात, शौर्य पुरस्कार विजेते, सेनेतील माजी अधिकारी आणि वीर नारी यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

   

 “कारगिल युद्धातील अनुभवी सेनानी हे संरक्षण दलातील आपल्या सर्वांसाठी तसेच संपूर्ण देशासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत, त्यांचा सर्वोच्च त्याग आणि देशसेवा कधीच विसरता येणार नाही,” असे उद्गार आर्मी कमांडर यांनी काढले. राष्ट्रीय युध्द स्मारक येथे उपस्थित असलेल्या सर्व निवृत्त सेनानींचा त्यांनी सन्मान केला. या सर्वांनी आखून दिलेल्या मार्गावरून भारतीय सेना मोठ्या ताकदीने योग्य दिशेने प्रगती करत आहे आणि भारतीय सैन्यदल देशासेवेप्रती संपूर्णतः कटिबद्ध आहे तसेच  कोणत्याही संभाव्य घटनेला तोंड देण्यासाठी सुसज्ज आहे अशी खात्री त्यांनी या अनुभवी सेनानींना दिली.

हा कार्यक्रम, कोविड-अनुरूप नियमावलीचे कठोर पालन करून मर्यादित उपस्थितांसह साजरा करण्यात आला.

***

M.Iyengar/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1739073) Visitor Counter : 274


Read this release in: English