शिक्षण मंत्रालय

जेईई मेन -सत्र 3:महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या विदयार्थ्यांना परीक्षेसाठी आणखी एक संधी मिळणार

Posted On: 24 JUL 2021 10:01PM by PIB Mumbai

मुंबई, 24 जुलै 2021

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे जे विद्यार्थी 25 आणि 27 जुलै रोजी होणारी जेईई परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांना ही परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जाईल, अशी घोषणा राष्ट्रीय चाचणी यंत्रणा- एनटीए ने केली आहे. नव्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील.

कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या सात शहरांमध्ये  ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे आहेत, आणि जे  विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसाठी 25 आणि 27 जुलै रोजी पावसामुळे केंद्रांवर जाऊ शकत नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना आणखी एकदा ही परीक्षा देण्याची संधी दिली जाईल.

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या सात शहरांमध्ये  ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे आहेत, आणि जे  विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसाठी या केंद्रांवर जाऊ शकत नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची सूचना एनटीए- म्हणजेच राष्ट्रीय चाचणी यंत्रणेला दिली आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज ट्विटर वरुन दिली.

या शहरांमध्ये ज्यांची परीक्षा केंद्रे आहेत, असे विद्यार्थी सद्य परिस्थितीत कदाचित उद्या म्हणजेच 25 आणि 27 जुलैला होणाऱ्या परीक्षांसाठी जाऊ शकणार नाहीत, मात्र म्हणून त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.त्यांना परीक्षेसाठी पुन्हा एक संधी दिली जाईल आणि या पर्यायी तारखा एनटीए लवकरच जाहीर करेल,असे प्रधान यांनी म्हटले आहे.

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या सत्रातील परीक्षा  देशभरात, 20,22 ,25 आणि 27 जुलै रोजी नियोजित केल्या आहेत.  देशातल्या आणि परदेशातील 334 शहरांमध्ये या परीक्षा होत आहेत. एनटीए ने याआधी 20 आणि 22 जुलै रोजी दोन परीक्षा घेतल्या आहेत.

या सर्व परीक्षार्थींना एनटीएच्या  (www.nta.ac.in) संकेतस्थळाकडे (jeemain.nta.nic.in) लक्ष देत राहावे, त्यावर त्यांना परीक्षेविषयीची ताजी माहिती मिळू शकेल, असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.

सविस्तर माहिती आणि स्पष्टीकरणासाठी JEE (Main) - 2021 चे परीक्षार्थी 011-40759000 या क्रमांकावर अथवा  jeemain@nta.ac.in या ईमेलवर संपर्क साधू  शकतात.

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738720) Visitor Counter : 182


Read this release in: English