अर्थ मंत्रालय
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फिरत्या एटीएम गाडीला हिरवा कंदील, साखळी येथे ग्रामीण व्यापारी पेठेचे उद्घाटन, स्वयंसहाय्यता गटाच्या महिला सदस्यांचा गौरव
Posted On:
18 JUL 2021 6:11PM by PIB Mumbai
पणजी, 18 जुलै 2021
नाबार्डच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाद्वारे साखळी येथील रवींद्रभवन येथे 17 जुलै 2021 रोजी आयोजित कार्यक्रमात, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी फिरत्या एटीएम गाडीला हिरवा कंदील दाखवला आणि ग्रामीण व्यापारी पेठेचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नाबार्डच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाच्या महाव्यवस्थापक उषा रमेश, कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक व्ही.व्ही.देशपांडे, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, रवींद्रभवनाचे उपाध्यक्ष विठोबा घाडी आणि रवींद्रभवनाचे सदस्य सचिव दीपक वायंगणकर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात 40 व्या स्थापनदिनानिमित्त नाबार्डचे अभिनंदन केले. ग्रामीण पायाभूत सुविधांविषयक प्रकल्पांसाठी पतपुरवठा केल्याबद्दल तसेच राज्यात विविध विकासकामे हाती घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाबार्डच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाचे कौतुक केले. उषा रमेश यांनी त्यांच्या भाषणात नाबार्डच्या स्थापनेपासूनच इतिहास थोडक्यात विशद केला. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’ या दोन्ही अभियानांप्रती नाबार्डची वचनबद्धता त्यांनी प्रकट केली. उल्हास फळदेसाई यांनी बोलताना, नाबार्डकडून मिळालेल्या पाठबळाची प्रशंसा केली आणि फिरत्या एटीएम गाडीच्या सेवेचा लाभ अधिकाधिक ग्रामस्थ घेतील, अशी अशा व्यक्त केली.
तत्पूर्वी या कार्यक्रमात स्वयंसहाय्यता गटांच्या वीस महिला सदस्य आणि ग्रामीण संघटनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फिरत्या एटीएम गाडीला हिरवा कंदील दाखविला. नाबार्डच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाने बँकिंग तंत्रज्ञानाची गावोगावी ओळख पटावी या उद्देशाने गोवा राज्य सहकारी बँकेला ही फिरती एटीएम गाडी मंजूर केली आहे. आता ही गाडी उत्तर गोवा जिल्ह्यात काम सुरु करेल. बँकिंग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञाने- जसे- रूपे डेबिट कार्ड, रूपे किसान क्रेडिट कार्ड, पॉईंट ऑफ सेल यंत्रे, सूक्ष्म एटीएम वगैरे- अशा तंत्रज्ञानाचा परिचय करून देण्यासाठी या गाडीचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर वित्तीय समावेशनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुर्गम भागात वित्तीय साक्षरतेचा प्रसार करण्याचे कार्यही या गाडीमुळे करता येणार आहे. उत्तर गोव्यातील दुर्गम भागातील लोकांच्या दारापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचून त्यांना त्यांचा लाभ घेता यावा व विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांना बँकांविषयक कामे करणे सोपे व्हावे, या दृष्टीनेही ही गाडी महत्त्वपूर्ण काम करू शकेल. ग्रामस्थांच्या सोयीसाठी व अधिकाधिक सहभागासाठी या गाडीच्या प्रवासाचा मार्ग अगोदर घोषित केला जाईल.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी साखळी येथील ग्रामीण व्यापारीपेठेचेही उद्घाटन केले. व्यापारी पेठेच्या स्थापनेसाठी तसेच त्याच्या कार्यान्वयन खर्चासाठी नाबार्डच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाने गोवा महिला स्वयंसहाय्यता गट महासंघाला निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण कारागीर, उत्पादक, स्वयंसहाय्यता गटांचे सदस्य इत्यादींना त्यांची उत्पादने प्रभावीपणे विकता यावीत या उद्देशाने व्यापारीपेठा स्थापन करण्यासाठी नाबार्ड निधी पुरविते. अशा ग्रामीण व्यापारी पेठांमुळे उत्पादकांना बाजारपेठ मिळण्याबरोबरच स्वयंसहाय्यता गटांच्या उद्योजकतेस प्रोत्साहनही मिळते.
S.Thakur/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736607)
Visitor Counter : 163