युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
जल्लोषात निरोप घेऊन ऑलिम्पिकसाठी दिल्ली विमानतळावरून निघालेली खेळाडूंची पहिली भारतीय तुकडी टोक्योत दाखल
Posted On:
18 JUL 2021 12:39PM by PIB Mumbai
टोक्यो ऑलिंपिकमध्ये चमकदार कामगिरी करत, भारताचा झेंडा दिमाखात फडकवण्यासाठी उत्सुक भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी आज सकाळी टोक्योच्या नारिटा विमानतळावर पोचली. त्यानंतर हा चमू ऑलिम्पिक ग्राम परिसराकडे रवाना झाला. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 54 खेळाडूंसह 88 सदस्यांचा समावेश असलेल्या या चमूला काल रात्री जल्लोषात निरोप देण्यात आला होता.

टोक्यो इथे पोचल्यावर, कुरोबे सिटीच्या प्रतिनिधींनी भारतीय खेळाडूंचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ, “कुरोबे सपोर्ट्स इंडियन ॲथलीट्स !! #ICheer4India.”असे फलक लावण्यात आले होते.

पहिल्या चमूमध्ये बॅडमिंटन, तिरंदाजी , हॉकी, ज्युडो, जलतरण, भारोत्तोलन , जिम्नॅस्टिक आणि टेबल टेनिस या आठ क्रीडाप्रकारांमधील खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक यांनी खेळाडूंना काल रात्री विमानतळावर निरोप दिला. यावेळी अनुराग ठाकूर यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत, त्यांच्याशी संवाद साधला.
“ जेव्हा तुम्ही ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करता, तेव्हा तो केवळ तुमच्यासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक महत्त्वाचा क्षण असतो. तुमची शिस्त, निर्धार आणि समर्पणामुळेच हे शक्य झाले आहे आणि म्हणूनच तुम्ही आज इथे टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करत आहात.” असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.
“ पंतप्रधान मोदींनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, कुठलेही दडपण न घेता, मुक्त मनाने स्पर्धेत सहभागी व्हा खुल्या मनाने जा. 135 कोटी भारतीय तुमच्यासोबत आहेत,त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत.” असे ठाकूर पुढे म्हणाले.
युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिकही यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते म्हणाले, “तुमचे आजवरचे प्रयत्न आणि तयारीमुळेच तुम्ही आज हा क्षण अनुभवता आहात.”

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर ध्रुव बत्रा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता यांनीही यावेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

भारतातून 119 खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये 18 क्रीडाप्रकारात आणि 69 सांघिक क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. यात तिरंदाजी, ॲथलीट्स , बॅडमिंटन , मुष्टीयुद्ध, एक्वेस्ट्रीयन, फेन्सिंग, गोल्फ, जिमनॅस्टिक्स हॉकी, जुडो, रोईंग, नौकानयन, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, भारोत्तोलन आणि कुस्ती या प्रकारांचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा भारताचा हा आजवरचा सर्वात मोठा चमू आहे.
***
/Radhika/Sushma/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736527)
Visitor Counter : 195