नौवहन मंत्रालय

खलाशांच्या सर्व समस्या सोडवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करेल- केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक


केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते खलाशांना कोविड केअर किट्सचे वाटप

Posted On: 14 JUL 2021 4:42PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकार खलाशांच्या सर्व समस्या लवकरात लवकार सोडवण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन, केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी  आज गोवन सी मेन असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींना दिले. गोव्यात मडगांव इथे आज नाईक यांच्या हस्ते खलाशांना कोविड केअर किट्स चे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कोविड-19 च्या संकटकाळात, मानवतेच्या दृष्टीने अशी मदत करणे आवश्यक असते, असे नाईक म्हणाले.

देशाच्या प्रगतीत खलाशांचे महत्वाचे योगदान असते, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी आपल्याकडे बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग तसेच पर्यटन या खात्यांची जबाबदारी दिली आहे. या संधीचा उपयोग खलाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी करु अशी ग्वाही त्यांनी दिली. खलाशांना दिलेल्या कोविड केअर कीट मध्ये मास्क, सॅनिटायझर, पल्स मीटर, ऑक्सिमीटर आणि प्रथमोपचार औषधांचा समावेश आहे. सीफेअर्र्स इंटरनैशनल रिलीफ फंड मधून या किट्स देण्यात आल्या आहेत. यावेळी, गोवा सी मेन असोसिएशन ऑफ इंडिया च्या प्रतिनिधींनी त्यांच्या निवृत्तीवेतनाच्या मागणीबाबतचे एक निवेदन नाईक यांना सादर केले.

पर्यटन मंत्री या नात्याने, गोव्यातील, वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आणि कॅटरिंग कॉलेजचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याला प्राधान्य देऊ, अशी माहिती नाईक यांनी यावेळी दिली.

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1735409) Visitor Counter : 78


Read this release in: English