ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

भारतीय मानक ब्युरोच्या अंमलबजावणी पथकाने टाकलेल्या छाप्यात मुंबईतील अंधेरी पूर्व भागातून बनावट हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने जप्त

Posted On: 14 JUL 2021 3:46PM by PIB Mumbai

 

भारतीय मानक ब्युरो- बीआयएसच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी(12 जुलै, 2021) मुंबईतल्या अंधेरी भागात सोन्याच्या दागिन्यांवर बनावट बीआयएस हॉलमार्कचा गैरवापर शोधण्यासाठी छापे घातले. मेसर्स क्लासिक कॅरेट अॅसे लॅब प्रायव्हेट लिमिटेड, या अंधेरी पूर्व भागातील फर्मच्या कार्यालयात केलेल्या छापेमारी आणि जप्तीच्या कारवाईत, ही फर्म, बीआयएस हॉलमार्क चा सोन्याच्या दागिन्यांवर गैरवापर करत असल्याचे आढळले आहे. हे दागिने मेसर्स अमोरे ज्वेलर्स, मेसर्स अबांस ज्वेलर्स, मेसर्स ओम शिल्पी ज्वेलर्स  अँड जेम्स, मेसर्स सत्कार ज्वेलर्स, मेसर्स कलश गोल्डस अँड ऑरनामेंटस, मेसर्स कलश ज्वेलस, मेसर्स युनी डिझाईन ज्वेलरी, या सर्व दुकानांमधील असून, त्यांना भारतीय मानक ब्युरोची मान्यता प्राप्त नाही.

सोन्याचे दागिने आणि इतर कलाकुसरीच्या वस्तूंच्या हॉलमार्किंग बद्दल ग्राहक  व्यवहार विभागाने 2020 मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, 16 जून 2021 पासून सोन्याचे दागिने आणि इतर सर्व वस्तूंवर बीआयएस हॉलमार्क असणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या असलेल्या बीआयएस हॉलमार्क मध्ये तीन घटक समाविष्ट  आहेत- बीआयएसचा  लोगो, सोन्याच्या शुद्धतेची कॅरेट मध्ये माहिती आणि सहा अंकी अल्फा-न्यूमारिक हॉलमार्किंग युनिक आयडेंटीटी (HUID) क्रमांक, जो प्रत्येक वस्तूवर/दागिन्यावरचा वेगळा असतो. दागिने केवळ बीआयएस अंतर्गत नोंदणी कृत असलेल्या व्यापारी/दुकानदारांनाच विकता येतील. तसेच सर्व दागिने बीआयएस मान्यताप्राप्त मुल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्रांवरूनच हॉलमार्किंग केलेले असावेत.

हॉलमार्कसह बीआयएस प्रमाणित चिन्हाचा गैरवापर करणे गुन्हा असून त्यासाठी, दोन वर्षांची शिक्षा आणि किमान 2,00,000 पर्यंत  दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या अप्रमाणित  वस्तूंच्या किंमती लक्षात घेता, दंडाची रक्कम वाढूही शकते. आज झालेल्या जप्तीप्रकरणी प्राथमिक अहवाल दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अनेकदा ग्राहकांना बनावट हॉलमार्किंग ज्वेलरी विकून सराफ दुकानदार मोठ्या प्रमाणात नफा कमावत असल्याचे बीआयएसच्या तपासात आढळले आहे. म्हणूनच आज झालेल्या कारवाईनंतर, सर्व नागरिकांनी, सोने खरेदी करतांना बीआयएसचा संपूर्ण हॉलमार्क असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन भारतीय मानक ब्युरोने केले आहे.

प्रमाणित, नोंदणीकृत ज्वेलर्सची नावे, ‘बीआयएस केअरया मोबाईल अॅपवर बघता येईल. तसेच बीआयएसचे संकेतस्थळ, http://www.bis.gov.in  वर देखील ही यादी उपलब्ध आहे.

जर ग्राहकांन बनावट बीआयएस हॉलमार्क आढळला किंवा हॉलमार्कचा गैरवापर होत असल्याचे आढळले तर त्याची तक्रार किंवा माहिती : उपसंचालक, पश्चिम क्षेत्र कार्यालय, बीआयएस, मानकलया, ई-9, मरोळ टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, अंधेरी पूर्व, मुंबई-400 093  इथे द्यावी

अशा तक्रारी  ddgw@bis.gov.in   या ईमेल आयडी वरही पाठवता येतील. अशा माहितीचा स्त्रोत गुप्त राखला जाईल.

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1735365) Visitor Counter : 177


Read this release in: English