युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवीण जाधव या महाराष्ट्रातील खेळाडूसह साधला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी संवाद
Posted On:
13 JUL 2021 7:25PM by PIB Mumbai
मुंबई, 13 जुलै 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्च्युअल माध्यमातून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या सर्व भारतीय खेळाडूंशी संवाद साधून त्यांचे मनोबल उंचावले. पंतप्रधानांनी संवाद साधलेल्यांमध्ये आज तिरंदाज प्रवीण जाधव यांचा समावेश होता. केंद्रीय युवा व्यवहार तसेच क्रीडामंत्री श्री अनुराग ठाकूर यावेळी उपस्थित होते.
समाजमाध्यमांपासून ते देशाच्या कानाकोपऱ्यात संपूर्ण देश ऑलिम्पिक खेळाडूंच्या पाठिंब्यासाठी उभा आहे. अलीकडेच #Cheer4India या हॅशटॅगसह शुभेच्छा देणारी अनेक छायाचित्र मी पाहिली आहेत. खेळाच्या मैदानात उतरण्यापूर्वी 135 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या खेळाडूंसाठी देशाचा आशीर्वाद आहेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
“इतक्या मोठ्या संख्येने भारतीय खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत आणि इतक्या मोठ्या संख्येने भारताचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सहभागी होत आहेत असे पंतप्रधान म्हणाले . काही क्रीडाप्रकार आहेत ज्यात भारतीय खेळाडू पहिल्यांदाच पात्र ठरले आहेत”, याचा पंतप्रधांनानी आवर्जून उल्लेख केला.
खेळाडूंना चांगल्या प्रशिक्षण शिबीरांसाठी, चांगली सामग्री उपलब्ध होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आज खेळाडूंना जास्त्तीत जास्त आंतराष्ट्रीय संधीही दिल्या जात आहेत. क्रीडासंबंधित संस्थांनी आपल्या सगळ्यांच्या सूचना सर्वोतोपरी स्वीकारल्या त्यामुळेच इतक्या कमी वेळात इतके बदल होऊ शकले असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
देशातील खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधानांचे आणि खेळाशी संबंधित सर्व जणांचे केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहारमंत्री अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन केले. जाती, धर्म किंवा इतर कुठलाही भेदभाव न बाळगता 135 कोटी भारतीयांना जोडणारे खेळ हे एक सुत्र आहे असे देखील यावेळी क्रीडा मंत्री म्हणाले. कोरोना काळातदेखील खेळाडूंचे मनोबल उंचावून ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनी दिलेला Cheer4India हा मंत्र देशाच्या कानाकोपऱ्यात गुंजतो आहे असे यावेळी ठाकूर म्हणाले.
आज खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान तुम्हा खेळाडूंसोबत आहेत आणि त्याच्या रूपाने हा संदेश दिला गेला आहे 130 कोटी भारतीय तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही पुढे चालत राहा आणि देशासाठी पदक मिळवून आणा असे आवाहन ठाकूर यांनी केले.
पंतप्रधांनांनी महाराष्ट्रातील तिरंदाज प्रवीणकुमार जाधवशी कसे काय प्रवीणजी! असे मराठीतून म्हणत , जाधव यांचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेतला. आधी धावपटू म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या मात्र आता ऑलिम्पिकमध्ये तिरंदाज म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीणच्या प्रवासातील परिवर्तनाविषयी पंतप्रधानांनीं विचारले असता प्रवीणकुमार म्हणाले, पहिल्यांदा मी धावायचो त्यामुळे सरकारच्या अकादमीत धावपटू म्हणून माझी निवड झाली , मात्र शरीर कमजोर असल्यामुळे तिथल्या प्रशिक्षकांनी तिरंदाजीत प्रयत्न करायला सांगितले मग मी अमरावतीत तिरंदाजीसाठी प्रशिक्षण घेऊ लागलो. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे पुढे जाऊन काहीतरी चांगले करण्यासाठी मी तिरंदाजीत सातत्य ठेवले असे प्रवीण पुढे म्हणाले.
लहानपणी झाडावरील आंबे बाणाने तोडून सुरू केलेला प्रवास पॅरिसमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकापर्यंत कसा गेला याची माहिती पंतप्रधानांनी तिरंदाज दीपिका कुमारी यांच्याकडून जाणून घेतली.
भारतीय लष्करामध्ये काम करत असताना आपल्या खेळाद्वारे ॲथलेटिक्स मध्ये यावर्षी राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या नीरज चोप्रा यांच्याशी देखील पंतप्रधानांनी हितगुज केले.
यावेळी कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता स्पर्धेमध्ये आपले सर्व कौशल्य झोकून देण्याचे पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंना आवाहन केले.
खेळाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या मुष्टियोद्धा अशिष कुमार यांना पंतप्रधानांनी तुम्ही बॉक्सिंग ची निवड कशी केली हा प्रश्न विचारून त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली तसेच यावेळी पंतप्रधानांनी अशिष कुमार यांना त्यांनी दिलेल्या कोरोना विरुद्धच्या लढ्याविषयी तसेच या कठीण काळामध्ये वडिलांना गमावण्याचे दुःख पचवून देखील आपली तयारी चालू ठेवण्याच्या त्यांच्या जिद्दी वृत्तीविषयी कौतुक केले .
मालिका सुरू असताना आपल्या वडिलांचे निधन झाल्याने झालेले दुःख पचवून देखील खेळाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देणार्या सचिन तेंडुलकर यांची यावेळी आठवण करत, आशिष कुमार यांची कहाणी देखील सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे पंतप्रधान म्हणले
खेळाशी संबंधित परवानग्या त्वरित मिळाल्यामुळे सराव सोपा झाल्याचे यावेळी पंतप्रधानांशी बोलतांना प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांनी सांगितले
यावेळी पंतप्रधानांशी बोलताना सिंधू यांनी खेळासाठी आवश्यक असलेल्या आहार नियंत्रणाची बाब सांगितली तर तिच्या वडिलांनी पंतप्रधानांशी बोलताना सांगितले की खेळामध्ये प्राविण्य असणाऱ्या मुलांचे आरोग्य चांगले राहील हा विचार करून अशा मुलांच्या पालकांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा द्यावा.
2015 पासून शूटिंग अकॅडमी मध्ये नेमबाजीचा सराव करणाऱ्या सौरभ चौधरी यांनी देखील पंतप्रधानांना आपल्या क्रीडा प्रवासाविषयी माहिती दिली. सौरभच्या एकाग्रचित्ततेची स्तुती करत पंतप्रधानांनी त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
टेबलटेनिसपटू मनिका बत्रा यांनी पुण्यामध्ये सराव करत असताना गरजू खेळाडूंसाठी केलेल्या प्रयत्नांविषयी पंतप्रधानांना यावेळी माहिती दिली. खेळाबरोबरच नृत्याची आवड असल्याचे सांगत, त्यामुळे तणावावर विजय मिळवणे सोपे जात असल्याचे तसेच आत्मविश्वास वाढत असल्याचे मनिका यांनी सांगितले .
खेळाचा वारसा आईकडून लाभलेल्या तसेच गंभीर दुखापतीनंतर सुद्धा पुन्हा जोमाने पुनरागमन करणाऱ्या साजन प्रकाश या जलतरणपटूशीही पंतप्रधानांनी संवाद साधला
पंचवीस वर्षांपूर्वी च्या परिस्थितीच्या तुलनेत आता खेळासाठीच्या सुविधा तसेच खेळाप्रती लोकांचा उत्साह यात खूप सुधारणा झाल्याचे टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी पंतप्रधानांना सांगितले.
यंदा मी दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करत आहे त्यामुळे मी अजिबात न घाबरता धावणार आहे. भारताचे सगळेच खेळाडू उत्तम आहेत महिलाही कमी नाहीत त्या देशाचे नाव उज्वल करतील असा आशादायी विश्वास धावपटू द्युती चंद यांनी या संवादादरम्यान व्यक्त केला.
कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता स्पर्धेमध्ये आपले सर्व कौशल्य दाखवत झोकून देण्याचे पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंना आवाहन केले.
* * *
Jaydevi PS/M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1735175)
Visitor Counter : 277