माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अभिनेते दिलीपकुमार यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिग्गज अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
Posted On:
07 JUL 2021 6:37PM by PIB Mumbai
मुंबई, 7 जुलै 2021
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि चित्रपट क्षेत्रातील आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
दिलीप कुमार यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत राष्ट्रपती म्हणाले की, त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना मोहित केले आणि भारतीय उपखंडात रसिकांनी त्यांच्यावर उदंड प्रेम केले. दिलीप साब कायम भारतीयांच्या हृदयात राहतील. "
उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. उपराष्ट्रपती म्हणाले की त्यांच्या निधनाने सिनेमा क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. "‘ट्रॅजेडी किंग ’ म्हणून ओळखले जाणारे, हे महान अभिनेते सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक होते आणि त्यांनी सामाजिक नाट्यापासून रोमँटिक नायकापर्यंत विविध भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्या."
अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले कि त्यांच्या निधनाने आपल्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी झाली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, दिलीपकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की दिलीपकुमार यांनी आपली कला ज्या पद्धतीने सादर केली ते अतुलनीय आहे.
महासंचालक (पश्चिम विभाग), माहिती व प्रसारण मंत्रालय, मनीष देसाई यांनी दिग्गज अभिनेत्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन त्यांची पत्नी सायरा बानो आणि कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली आणि पंतप्रधानांच्या वतीने तीव्र शोक व्यक्त केला.
भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल दिलीप कुमार यांना कला क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार (1994) देऊन गौरवण्यात आले. त्यांना पद्मविभूषण ( 2015) हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारही मिळाला होता .
2000 ते 2006 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.
दिलीप कुमार 98 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सायरा बानो आहेत.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733434)
Visitor Counter : 256