माहिती आणि प्रसारण मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयच्या वतीने उद्यापासून ‘योगाभ्यास' वर आधारित  दोन डिजिटल माहितीपटांचे प्रसारण

Posted On: 20 JUN 2021 4:10PM by PIB Mumbai

 

सातव्या आंतराष्ट्रीय योग दिन 2021 निमित्त आयोजित कार्यक्रमांचा  एक भाग म्हणून , राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय  (एनएफएआय) उद्या (२१ जून 2021) पासून एनएफएआयच्या यूट्यूब वाहिनीवर 'योग फॉर हेल्थ' आणि 'समाधी' या दोन प्रथितयश  माहितीपट प्रसारित  करेल. हे दोन्ही चित्रपट एनएफएआयने डिजिटल केले आहेत.

ए. भास्कर राव दिग्दर्शित 'योग फॉर हेल्थ' हा माहितीपट 1950 मध्ये तयार करण्यात आला आहे.  योगाभ्यासाचे  महत्त्व अधोरेखित करणार्‍या त्यांच्या सुरुवातीच्या कामांपैकी हा माहितीपट आहे. 11-मिनिटांच्या या माहितीपटात योगाच्या पुरातन विज्ञानाची आपल्याला ओळख करुन देण्यात आली असून सामर्थ्य, तग धरण्याची क्षमता आणि मानसिक दक्षता वाढविण्यात साहाय्यकारी  काही विशिष्ट आसने  दाखविली आहेत. मुंबईतील सांताक्रूझ येथे असलेल्या योग संस्थेच्या देखरेखीखाली हा चित्रपट फिल्म्स डिव्हिजन / डॉक्युमेंटरी फिल्म्स ऑफ इंडियाने सादर केला होता.छायाचित्रणकार दारा मिस्त्री यांनी या माहितीपटाचे  छायांकन केले आहे. बार्कले हिल यांनी समालोचन केले असून व्ही. शिराली यांनी संगीत दिले आहे . माहितीपटाचे  संकलन प्रताप परमार यांनी केले आहे तर पी. के. विश्वनाथ या चित्रपटाचे ध्वनी प्रभारी होते.

1977 चा चित्रपट समाधीहा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चे माजी संचालक जॉन शंकरमंगलम यांनी तयार केला आहे. 22-मिनिटांचा हा चित्रपट प्रख्यात योग तज्ज्ञ बीकेएस अय्यंगार यांच्या जीवनाचा इतिहास दर्शवितो. या माहितीपटाच्या च्या माध्यमातून, 59 वर्षीय अयंगार आपल्या  विद्यार्थ्यांना योगासने शिकवत असल्याचे आणि पार्श्वसंगीतात संस्कृत सुभाषिते   वाजत असल्याचे दाखविण्यात आले आहे. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि सतारवादक  भास्कर चंदावरकर यांनी या चित्रपटाला  संगीत दिले होते. शांत चिंतन, संगीताची जोड  आणि पवित्र ग्रंथांमधील पठण या वातावरणात  व्यायामाच्या प्रात्यक्षिकांच्या विस्तृत माहितीसह.योग भावना आणि तत्त्वज्ञानाचा मधुर संगम साधल्याबद्दल या चित्रपटाने  25व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट प्रयोगशील चित्रपटासाठी रजत कमळ  पटकावले होते.

दोन्ही डॉक्यु-फिल्म्स उद्यापासून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या युट्यूब चॅनेल वर पाहता येतील.   (https://www.youtube.com/channel/UCIRA_1135D2YBUI1S2C8SIg    

***

M.Chopade/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1728777) Visitor Counter : 185


Read this release in: English