संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी: 140 व्या एनडीए तुकडीचे दीक्षांत संचलन
Posted On:
29 MAY 2021 7:17PM by PIB Mumbai
पुणे, 29 मे 2021
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएच्या 140 व्या तुकडीचा दीक्षांत पथसंचलन सोहळा आज 29 मे 2021 रोजी, एनडीएच्या खडकवासला येथील खेत्रपाल मैदानावर पार पडला. नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, PVSM, AVSM, ADC यांनी या पथसंचलनाची मानवंदना स्वीकारली.
कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी या पथसंचलनाच्या नेहमीच्या स्वरूपात बदल करण्यात आला होता, मात्र तरीही, दीक्षांत पथसंचलनाची शान आणि भव्यता यावेळीही अबाधित होती.
या पथसंचलनात एकूण 696 छात्रांनी सहभाग घेतला होता त्यापैकी 311 छात्र 140 व्या तुकडीचे होते. त्यामध्ये लष्करातील 215 छात्र, नौदलाचे 44 आणि हवाई दलाच्या 52 छात्रांचा समावेश होता. यात, 18 छात्र मित्रदेशांचेही होते (श्रीलंका, अफगाणिस्तान, व्हिएत्नाम, मालदीव, भूतान, टांझानिया, तुर्कमेनिस्तान, फिजी, तझाकिस्तान आणि म्यानमार)
सध्या कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती आणि प्रवासावर असलेले निर्बंध यामुळे, या कार्यक्रमाला या पालकांना आमंत्रण देता आले नव्हते. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेले कॅडेट्स आता आपापल्या नियोजित प्रशिक्षण अकादमीमध्ये पाठवले जातील.
आजच्या दीक्षांत सोहळ्यात, ज्यांना पुरस्कार मिळाला त्यात, मौसम वत्स यांना एकूण गुणवत्तेत प्रथम स्थान पटकावल्याबद्दल, राष्ट्रपतींचे सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. डीव्हीजनल कॅडेट कॅप्टन, जयवंत ताम्रकर यांना एकूण गुणवत्तेत दुसरे स्थान पटकावल्याबद्दल, त्यांचा राष्ट्रपतींचे रौप्यपदक देऊन सन्मान करण्यात आला. तर, बटालियन कॅडेट कॅप्टन निर्ज सिंग पापोला याने राष्ट्रपतींचे कांस्य पदक पटकावले. गोल्फ स्क्वार्डन ने प्रतिष्ठेचा ‘चिफ्स ऑफ स्टाफ बॅनर स्प्रिंग टर्म 2021’ हा पुरस्कार पटकावला.
या सोहळ्याला उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व कॅडेट्सच्या अचूक आणि दिमाखदार पथसंचलनाचे कौतुक केले. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे तसेच विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. एनडीए ही एकमेवाद्वीतीय लष्करी प्रबोधिनी असून, देशभरातले तसेच मित्र देशांमधले सवोत्तम युवक इथे प्रशिक्षणासाठी येतात. एनडीए चे घोषवाक्य “ सेवा परमो धर्मः” तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांना आणि जवानांना पिढ्यानपिढ्या, ‘लढण्यासाठी प्रशिक्षण,’ आणि ‘लढता लढता प्रशिक्षण’ ही प्रेरणा देत आहे, असे अॅडमिरल करमबीर सिंग म्हणाले. सर्व कॅडेट्स नी पुढेही आपल्या करियरमध्ये एकत्रित आणि समन्वयाने काम करण्याची वृत्ती कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. आज युद्धाचे स्वरूप बदलले असून, भूमी, हवा, सागर अवकाश आणि सायबर अशा अनेक मैदानांवरील युद्धाने नवे स्वरूप धारण केले आहे. कॅडेट्सनी व्यावसायिक ज्ञान, प्रामाणिकपणा, देशाप्रतीची एकात्मता आणि बौद्धिक कुतूहल यावर कायम भर द्यावा, असेही ते म्हणाले.तीन वर्षांच्या या कष्टप्रद प्रशिक्षण काळात, सर्व कॅडेट्सना त्यांच्या पालकांनी दिलेल्या भक्कम पाठींब्याबद्दल त्यांनी पालकांचेही आभार मानले. तसेच, कोविडचे आव्हान समोर असतांनाही एनडीए चे अधिकारी आणि कर्मचार्यानी कठीण काळात सुरु ठेवलेल्या प्रशिक्षणाचेही त्यांनी कौतुक केले.
* * *
M.Iyengar/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722744)
Visitor Counter : 194