विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात मांडवी नदीच्या खाडी क्षेत्रातील विविध मानवी हस्तक्षेप कृती कमी झाल्यामुळे नदीच्या पाण्यातील प्रदूषणाला कारणीभूत असणारे घटक कमी झाल्याचे निष्पन्न
Posted On:
22 MAY 2021 8:17PM by PIB Mumbai
पणजी, 22 मे 2021
जलाशयांचे आरोग्य तपासणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणे अत्यावश्यक असते. पाण्याचे दृश्य भौतिक स्वरूप तसेच रासायनिक, जैविक आणि सूक्ष्मजैविक गुणधर्म तपासून त्यानुसार, त्याची गुणवत्ता तपासली जाऊ शकते. पाण्याची शुद्धता तपासण्याचा एक महत्वाचा रासायनिक निकष म्हणजे, पाण्यात विरघळलेल्या जैविक घटकांचे प्रमाण (DOM) होय, कारण जलसृष्टीतील सर्वाधिक जैविक कार्बन अशा जलाशयांमध्ये साठवलेला असतो. याच जैविक कार्बनपैकी काही भाग, प्रकाश शोषून घेतो आणि त्यातूनच पाण्याचा रंग ठरत असतो. त्यामुळेच त्याला, पाण्यात विरघळलेले रंगीत जैविक घटक (CDOM) म्हटले जाते. या CDOM ची निर्मिती नैसर्गिक अथवा, प्रदूषणकारी घटकांद्वारे होऊ शकते. सूर्यमालेच्या वर्णपटलातील अति नील आणि नील किरणातून CDOM मोठ्या प्रमाणात प्रकाश शोषून घेतो. त्याचा पाण्याच्या परिसंस्थेवर नकारात्मक किंवा सकारात्मक परिणाम होत असतो. जर पाण्यात CDOMचे प्रमाण खूप जास्त असेल, तर त्यामुळे, पाण्यातून प्रकाश परावर्तीत होणार नाही, ज्याचा विपरीत परिणाम सागरी जीवसंस्थेवर होईल. गोव्यातल्या मांडवी आणि झुआरी या दोन मुख्य नद्या समुद्रात मिसळून, व्यापक खाडी तयार झाली आहे. विविध प्रदूषणकारी घटकांमुळे गेल्या काही वर्षात या नद्यांचे पाणी आणि जैवविविधते चे मोठे नुकसान झाले आहे. 2014 पासून मांडवी नदीतील CDOM च्या प्रमाणावर देखरेख ठेवली जाते आहे. त्यानुसार, दरवर्षी उन्हाळ्यात, या खाडीत प्रदूषणामुळे CDOM चे प्रमाण नेहमीच अधिक आढळले आहे.
2020 साली केंद्र सरकारने कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या ताळेबंदीच्या काळात ( 24 म्राच ते 8 जून) CDOM चे प्रमाण लक्षणीयरित्या म्हणजे दुपटीने कमी झाल्याचे आढळले आहे.
सेंटीनेल-2 या उपग्रहाने देखील हे प्रमाण कमी झाल्याची नोंद केली आहे. त्याशिवाय, पाण्यात विरघळलेल्या पोषक द्रव्यांचे प्रमाण देखील कमी झाले आहे. या काळात, क्रुझ, पाण्यातून होणारी तराफे आणि जहाजांची वाहतूक, जहाजबांधणी आणि इतर व्यवसायिक आस्थापना अशा मानवी कृती पूर्णपणे बंद असल्यामुळे CDOM आणि विविध प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण कमी झाले असावे.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1720964)
Visitor Counter : 185