संरक्षण मंत्रालय

तौते चक्रीवादळ- अद्ययावत माहिती- भारतीय नौदलाकडून शोध आणि बचाव मोहीम सुरूच

Posted On: 19 MAY 2021 9:47PM by PIB Mumbai

मुंबई, 19 मे 2021

भारतीय नौदलाकडून मुंबई आणि गुजरात किनाऱ्यांजवळ सुरु असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेचा आज तिसरा दिवस. भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने सध्या P-305 या नौकेवरील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या शोध आणि बचावासाठी कार्यरत आहेत. ही नौका 17 मे रोजी मुंबईपासून 35 मैलांवर बुडाली होती. या शोध आणि बचाव मोहिमेत आयएनएस कोची, कोलकाता, बियास, बेतवा, तेग या जहाजांसह P8I हे सागरी गस्ती विमान, चेतक, एएलएच आणि सीकिंग ही हेलिकॉप्टर्स कार्यरत आहेत.

बचावलेल्या 125 जणांना सोडण्यासाठी आणि चार कर्मचाऱ्यांचे मृतदेह पोहोचविण्यासाठी 19 मे रोजी बंदरात दाखल झालेले आयएनएस कोची हे जहाज लगेचच संध्याकाळी पुन्हा शोधमोहिमेसाठी समुद्रात नेण्यात आले. आयएनएस कोलकाता हे जहाज 19 मे च्या रात्री मुंबई बंदरात पोहोचणार असून P-305 नौकेवरील तसेच 'वरप्रदा' या कर्षक नौकेवरील बचावलेल्या व्यक्तींना ते बंदरावर सोडणार आहे. तसेच या मोहिमेदरम्यान हाती लागलेले 18 कर्मचाऱ्यांचे मृतदेहही यावेळी बंदरात पोहोचवले जाणार आहेत.

गुजरात किनाऱ्याजवळील सागरी भागातील मोहीम संपवून आयएनएस तलवार हे जहाजही आता, मुंबईजवळ P-305 नौकेवरील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी कार्यरत नौदलाच्या तीन जहाजांच्या ताफ्यात सामील होण्यासाठी पाठवण्यात आले आहे. अगोदर दिलेल्या माहितीनुसार, आयएनएस तलवार या जहाजाने गुजरातच्या किनाऱ्याजवळील सागरी भागात समन्वयाची जबाबदारी सांभाळली. सपोर्ट स्टेशन-3 आणि ड्रिल शिप सागर भूषण यांना या जहाजाची मदत झाली. या दोन्हींना आता ओएनजीसीच्या मदत-जहाजांकरवी मुंबईकडे खेचून आणण्यात येत आहे. या संकटग्रस्त जहाजांवरील जवळपास 300 कर्मचाऱ्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्थाही नौदलाने मुंबईहून पाठवलेल्या हेलिकॉप्टर्सनी केली.

आतापर्यंत P-305 या निवासी नौकेवरील 186 कर्मचाऱ्यांची आणि 'वरप्रदा' या कर्षक नौकेवरील दोघांची भारतीय नौदलाच्या जहाजांनी व विमानांनी सुखरूप सुटका केली आहे. तर P305 वरील व्यक्तींपैकी एकूण 26 जणांचे मृतदेह आतापर्यन्त हाती लागले आहेत.

 

M.Chopade/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720100) Visitor Counter : 114


Read this release in: English