संरक्षण मंत्रालय

एएफएमसीचे 110 पदवीधर सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवेत दाखल

Posted On: 15 MAY 2021 12:27PM by PIB Mumbai

पुण्यातील एएफएमसी अर्थात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून 55व्या( सी3) तुकडीच्या 21 महिला कॅडेट्ससह 110 वैद्यकीय कॅडेट्सना सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवांमध्ये( एएफएमएस) वैद्यकीय अधिकारी म्हणून 15 मे 2021 रोजी

रुजू करून घेण्यात आले. मात्र, एएफएमसीच्या वैद्यकीय कॅडेट्सना सेवेत रुजू करून घेण्यासाठी होणारे दीक्षांत संचलन पहिल्यांदाच सध्याच्या कोविड-19 विषयक निर्बंधांमुळे रद्द करावे लागले. लेफ्टनंट जनरल नरदीप नैथानी, पीव्हीएसएम, कमांडट एएफएमसी यांच्या हस्ते एका छोटेखानी परंतु सुनियोजित कार्यक्रमात वैद्यकीय कॅडेट्सना सेवेत रुजू करून घेण्यात आले. 94 कॅडेट्सना लष्कराच्या, 10 कॅडेट्सना भारतीय हवाई दलात आणि 6 कॅडेट्सना भारतीय नौदलात  नियुक्त( कमिशन्ड) करण्यात आले. नव्याने नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना एएफएमसीचे प्रशिक्षक

कर्नल ए के शाक्य यांनी भारतीय संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली.  नैथानी यांनी नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे देशातील सर्वोत्तम एकात्मिक वैद्यकीय संघटना असलेल्या एएफएमएसमध्ये  दाखल होत असल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी त्यांनी या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांच्या पालकांचे देखील अभिनंदन केले. सी3 या तुकडीने विशेष उल्लेखनीय यश मिळवले असून 2016 मध्ये प्रवेश घेतलेल्या या तुकडीतील सर्वच सर्व विद्यार्थ्यांनी पदवी मिळवून 100 टक्के यशाची नोंद केली. एका अर्थाने एएफएमसीच्या अध्यापकांना दिलेली ही सर्वोत्तम गुरुदक्षिणा आहे. पदवी प्राप्त करणारी ही तुकडी, देश अतिशय खडतर कालखंडातून वाटचाल करत असताना, वैद्यकीय व्यवसायात दाखल होत असल्याची आठवण त्यांनी करून दिली.कोविड19 विरोधात देशाचा लढा सुरू असताना, हे विद्यार्थी कोविड योद्धे म्हणून सेवेत दाखल होत असल्याने,  एएफएमसीमध्ये मिळालेले ज्ञान आणि कौशल्य यांचा वापर रुग्णांना सर्वोत्तम उपचार पुरवण्यासाठी करावा, असे आवाहन नैथानी यांनी केले. या संस्थेमध्ये अतिशय उत्तम शिक्षण आणि खडतर प्रशिक्षण यांचा अनुभव घेतल्यामुळे  नव्याने सेवेत दाखल होणारे हे अधिकारी लष्करी डॉक्टर म्हणून सर्वोच्च मापदंड प्रस्थापित करण्याच्या अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लेफ्टनंट जनरल नरदीप नैथानी हे देखील याच महाविद्यालयाच्या 17व्या( क्यू) तुकडीचे माजी विद्यार्थी आहेत. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात त्यांनी ट्रॉफी, पदके आणि पारितोषिके प्रदान केली.

विनीता रेड्डी ही वैदयकीय कॅडेट पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकाची त्याच बरोबर कलिंगा ट्रॉफीची आणि डीजीएएफएमएस सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. कॉलेज कॅडेट कॅप्टन राहिलेल्या सुयश सिंग या वैद्यकीय कॅडेटला दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल मेजर जनरल एनडीपी करणी ट्रॉफी  देऊन सन्मानित करण्यात आलं. एमबीबीएस परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवल्याबद्दल निकिता दत्ता या कॅडेटला लेफ्टनंट जनरल थापर सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या कमिशनिंगसाठी तयारीचा कालावधी पूर्वी चार ते पाच आठवडे असायचा, तो आता केवळ दोन आठवडे करण्यात आला आहे. या दोन आठवड्यांचा वापर या विद्यार्थ्यांना विशेषत्वाने कोविड केअर केंद्रांमध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने अतिशय काटेकोर प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी अमेरिकन हार्ट असोसिएशनचे बेसिक लाईफ सपोर्ट आणि एसीएलएस (ऍडवान्स्ड कार्डियाक लाईफ सपोर्ट) प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील पूर्ण केले आहेत. आज कमिशन देण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी देशभरातील  सशस्त्र सेवा दलांच्या 31 रुग्णालयांमध्ये इंटर्न म्हणून काम करण्यासाठी तात्काळ रवाना होणार आहेत. ही रुग्णालये सशस्त्र सेवा दलांच्या कर्मचारी आणि त्याचबरोबर सामान्य नागरिकांसाठी विशेषत्वाने कोविड रुग्णालये म्हणून निश्चित करण्यात आली आहेत.

***

PIB (DEFENCE WING) PUNE/MI/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718793) Visitor Counter : 176


Read this release in: English