अर्थ मंत्रालय

भारतीय आयुर्विमा महामंडळाने विम्याची रक्कम देण्यासाठीच्या काही आवश्यक नियमांमध्ये शिथिलता आणली


आजपासून महामंडळाच्या कार्यालयांमध्ये आठवड्यातून पाच दिवस कामकाज होणार

Posted On: 10 MAY 2021 5:20PM by PIB Mumbai

गोवा, 10 मे 2021

 

सध्याच्या महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत, ग्राहकांच्या संरक्षणाची बाब लक्षात घेत एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाने ग्राहकांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठीची प्रक्रिया सुलभ आणि मतभेदमुक्त पद्धतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून या प्रक्रीयेसाठी आवश्यक असलेल्या काही नियमांमध्ये खालीलप्रमाणे शिथिलता आणली आहे:

सध्याच्या परिस्थितीत विमेदाराचा मृत्यू रुग्णालयात झाला असेल तर त्याच्या वारसदारांना विम्याची रक्कम जलद गतीने मिळणे सोपे व्हावे म्हणून महानगरपालिकेच्या मृत्यू प्रमाणपत्राऐवजी एलआयसीने आता विमेदाराच्या मृत्यूचा पुरावा म्हणून खालील प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे:

सरकारी अथवा कर्मचारी राज्य विमा योजना अथवा संरक्षण दलांच्या किंवा कॉर्पोरेट रुग्णालयाने दिलेले आणि मृत्यूची तारीख आणि वेळ स्पष्टपणे नमूद केलेले मृत्यू प्रमाणपत्र/डिस्चार्ज सारांश/मृत्यू माहितीचा सारांश, ज्यावर एलआयसीच्या सेवेत 10 वर्षे कार्यरत असणाऱ्या  वर्ग 1 दर्जाच्या अधिकाऱ्याची अथवा विकास अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेली असेल आणि त्यासोबत विमेदाराचा अंत्यसंस्कार अथवा दफनविधी झाल्याची किंवा संबंधित अधिकाऱ्याने त्याच्या ओळखीबाबत जारी केलेली पावती जोडलेली असेल.

इतर प्रसंगी मृत्यूदाव्याची रक्कम मिळण्यासाठी महानगरपालिकेने दिलेले विमेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते.

मूळ रक्कम परत मिळण्याचा पर्याय निवडलेल्या निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी ग्राहकांना हयातीचा दाखला सादर करण्याच्या नियमात 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत सूट देण्यात आली आहे, तसेच इतर प्रकरणांमध्ये, ईमेल द्वारे पाठविलेले जीवित असल्याचे प्रमाणपत्र स्वीकारण्यात येणार आहे. हयातीचा दाखला सादर करण्यासाठी एलआयसीने व्हिडीओ कॉल पद्धतीचा वापर देखील सुरु केला आहे.

महामारी आणि निर्बंधांच्या सध्याच्या परिस्थितीत, दाव्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, जिथून विमा काढला त्याच शाखेत जमा करण्यात ग्राहकांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, देय असलेले परिपक्वता दावे किंवा ठराविक मुदतीनंतर मिळणाऱ्या लाभाच्या दाव्यांसाठी ग्राहकांना त्यांच्या जवळच्या शाखेत कागदपत्रे जमा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दाव्याची रक्कम जलद गतीने मिळण्यासाठी ग्राहकांच्या बॅंक खात्यात थेट रक्कम जमा होण्यासाठी आवश्यक बॅंक खात्याचे तपशील इत्यादीची नोंद एलआयसी संकेतस्थळावरील ग्राहक पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा देखील एलआयसी सुरु केली आहे.

याशिवाय, आता एलआयसीच्या सर्व कार्यालयांचे कामकाज आज, 10 मे 2021 पासून येत्या प्रत्येक आठवड्यात, सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत सुरु राहील तसेच प्रत्येक शनिवारी एलआयसी कार्यालयांना साप्ताहिक सुटी असेल असे 15 एप्रिल 2021 ला जारी केलेल्या S.O. 1630(E) या अधिसूचनेत म्हटले आहे.

विमा पॉलिसी विकत घेणे, विमा हप्त्याचा भरणा करणे, कर्जासाठी अर्ज करणे, कर्ज आणि त्यावरील व्याज फेडण्यासाठी पैशांचा भरणा करणे, विमा पॉलिसी घेताना अर्जात भरलेल्या पत्त्यात नंतर बदल करणे, NEFT विनंती नोंदणी करणे, पॅन कार्ड क्रमांकाचे तपशील अद्ययावत करणे इत्यादी ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी विमा ग्राहकांना www.licindia.in. या संकेतस्थळाला भेट देता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधावा:

कार्यकारी संचालक (CC)
भारतीय आयुर्विमा महामंडळ, केंद्रीय कार्यालय, मुंबई.
ईमेल  : ed_cc@licindia.com
संकेतस्थळ : www.licindia.in.

* * *

S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1717453) Visitor Counter : 422


Read this release in: English