माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मौखिक इतिहासाचे संपन्न भांडार आता भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संकेतस्थळावर


8,000 मिनिटे इतक्या  कालावधीच्या श्राव्य मुलाखती ऑनलाइन उपलब्ध

Posted On: 30 APR 2021 5:17PM by PIB Mumbai

 

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचे औचित्य साधून एन.एफ.ए.आय. म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने श्राव्य ध्वनिमुद्रणांचे समृद्ध भांडार प्रसिद्ध केले आहे. भारतीय सिनेक्षेत्रातील नामवंत चित्रपट कलाकारांच्या जवळपास 8,000 मिनिटे कालावधीच्या मुलाखती आता एन.एफ.ए.आय.च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भारतीय मूकपटांपासून सुरु झालेल्या प्रवासाचे साक्षीदार असणारे  अभिनेते, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक आणि स्टुडिओ-मालकांच्या झपाटून टाकणाऱ्या अनेक गोष्टी या संग्रहामध्ये समाविष्ट आहेत. यातील बहुतेक मुलाखती 1980 च्या दशकात घेतलेल्या आहेत. एन.एफ.ए.आय.च्या संशोधन कार्यक्रमाच्या मौखिक इतिहास प्रकल्पाचा एक भाग म्हणून या मुलाखती ध्वनिमुद्रित करण्यात आल्या होत्या. सिनेजगतात अनेक गोष्टी प्रथम करणाऱ्या आद्य कलावंतांच्या प्रदीर्घ मुलाखती यात असून त्यात त्यांच्या जीवनातील अनुभव आणि चित्रसृष्टीतील विविध किस्से, रंजक प्रसंग या साऱ्यांचे कथन केलेले आहे.

"भारतीय चित्रपटाचा अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना संदर्भसाहित्य म्हणून उपयोगी पडू शकेल असा हा प्रचंड मोठा खजिना उपलब्ध करून देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतीय चित्रपटांविषयीची माहिती प्रसारित करणे, त्यासंबंधीचे ज्ञान वितरित करणे हा एन.एफ.ए.आय.च्या प्रमुख उद्देशांपैकी एक आहे. तसंच, भूतकाळातले हे आवाज आता जगभर ऐकले जाऊ शकतील, याचा मला आनंद आहे." अशी भावना, एन.एफ.ए.आय.चे संचालक प्रकाश मगदूम यांनी व्यक्त केली.

मराठी, तामिळ, तेलगू, इंग्लिश आणि बंगाली या पाच भाषांमध्ये घेतलेल्या या 53 मुलाखती म्हणजे या चित्रपट कलाकारांचे जवळपास 8,000 मिनिटांचे ध्वनिमुद्रण आहे. यामध्ये भारतीय चित्रपटजगतातील अनेक मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे- जे.बी.एच.वाडिया, अक्किनेनी नागेश्वर राव, विजय भट्ट, पी.भानुमती, एस.डी.सुब्बुलक्ष्मी, एम.के.राधा, पी.लीला, सी.होणाप्पा भागवथार, झुंझारराव पवार, दादा साळवी, चंद्रकांत गोखले, आर.एम.कृष्णस्वामी, एस.व्ही.वेंकटरमण, आर.राममूर्थी, के.एस.प्रकाश, व्ही.गोपालकृष्णन, आर.बी.लक्ष्मीदेवी, शाहू मोडक, इ.मोहम्मद, व्ही.व्ही.बापट, विवेक, विष्णुपंत जोग, नानासाहेब साठे, गणपतराव बोन्द्रे, निळू फुले, शरद तळवलकर, शोभा सेन, सूर्यकांत मांढरे, चित्तरंजन कोल्हटकर, सौमित्र चॅटर्जी अशा अनेक नामवंतांच्या मुलाखती त्यात आहेत. यात सर्वात मोठी मुलाखत आहे ती- सौमित्र चॅटर्जी या बंगाली अभिनेत्याची. अनसूया रॉय चौधरी यांनी घेतलेली ही मुलाखत तब्बल 584 मिनिटांची आहे. अशा प्रदीर्घ मुलाखतींतून केवळ त्या कलाकाराच्या प्रवासावरच प्रकाश पडतो असे नव्हे तर भारतीय सिनेसृष्टीत काळाच्या ओघात होत गेलेल्या बदलांचेही दर्शन घडते. 

एन.एफ.ए.आय.च्या मौखिक इतिहास प्रकल्पाचा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे, दादासाहेब फाळके यांच्या अनेक निकटवर्तीय सहकाऱ्यांच्या मुलाखती. विविध ठिकाणांहून आणि विविध क्षेत्रांतून आलेल्या या कलाकारांनी, चित्रपटसृष्टी अगदी बाल्यावस्थेत असताना प्रवेश केला आणि फाळके यांच्या 'हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी'मध्ये आपापलय जागी महत्त्वाची कामगिरी बजावली. भारतातील पहिल्या बालकलाकार आणि दादासाहेब फाळके यांच्या कन्या मंदाकिनी फाळके (आठवले) यांची विस्तृत मुलाखत यामध्ये आहे. 'कालियामर्दन (1919)' चित्रपटात बालवयातील कृष्णाची भूमिका वठवतानाचे अनुभव त्यांनी यात सांगितले आहेत. मूकपटांच्या युगातील अनेक कलाकारांनी - जसे - गणपतराव तांबट, सहदेवराव तापकीरे, बाबुराव पाटील, नारायण तांबट, हरिभाऊ लोणारे आणि वसंत शिंदे- या कलाकारांनी फाळके यांच्या स्टुडिओमध्ये निरनिराळ्या जबाबदाऱ्या पेलल्या होत्या. दादासाहेबांच्या बरोबर काम करतानाचे अनुभव मांडताना त्यांनी 'दादासाहेब एक माणूस म्हणून कसे होते' आणि 'चित्रपटनिर्माते म्हणून ते कसे झपाटून जाऊन काम करत असत' अशा दोन्ही पैलूंवर प्रकाश टाकला आहे.

एन.एफ.ए.आय.च्या मौखिक इतिहास प्रकल्पाची सुरुवात 1983 मध्ये झाली. त्याकाळी मुलाखती फक्त ऑडिओ कॅसेटवरच ध्वनिमुद्रित केल्या जात. नन्तर तंत्रज्ञानाने झेप घेतल्यावर 2008 मध्ये हा प्रकल्प 'दृक्-श्राव्य इतिहास' या प्रकल्पात रूपांतरित झाला. यामध्ये मुलाखतीचे ध्वनिचित्रमुद्रण होऊन, संबंधित चित्रपटांच्या क्लिप्स, छायाचित्रे, पोस्टर इत्यादी गोष्टी त्यामध्ये घातल्या जाऊ लागल्या.

सदर प्रकल्पाचा भाग म्हणून या मुलाखती 80 आणि 90 च्या दशकांत विविध जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्तींनी घेतल्या. प्रभात फिल्म कंपनीचे एक कलाकार आणि चित्रपट इतिहासकार बापू वाटवे यांनी मराठीतील बहुतांश मुलाखती घेतल्या. आणखी एक प्रसिद्ध चित्रपट इतिहासकार आणि लेखक रँडॉर गूय यांनी तामिळ, तेलगू आणि इंग्लिशमधील अनेक प्रदीर्घ मुलाखती घेतल्या. मराठीत 26, तमिळमध्ये 10, इंग्लिशमध्ये 12, तेलगूमध्ये 3 आणि बंगालीमध्ये 2 मुलाखती या संग्रहात आहेत.

या ध्वनिमुद्रित मुलाखती ऐकण्यासाठी आपण https://nfai.gov.in/audio_interview.php  येथे क्लिक करू शकता. मुलाखत ऐकत असताना तेथेच शेजारी तिचे इंग्रजी भाषांतरही उपलब्ध असेल. जेथे जेथे शक्य असेल तेथे संबंधित कलाकारांची छायाचित्रे आणि त्या सिनेमाची पोस्टर्सही दिसू शकतील.

"यातील बहुतेक मुलाखती चार दशकांपूर्वीच्या असल्याने, आम्ही त्यांचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला. मुलाखतींच्या ध्वनिमुद्रणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी आम्ही एफ.टी.आय.आय.च्या ध्वनिविभागाची मदत घेतली आहे." अशी माहिती प्रकाश मगदूम यांनी दिली. "यातील बऱ्याच मुलाखती विविध भारतीय भाषांमध्ये असल्याने त्यांचे इंग्लिशमध्ये भाषांतरही केले आहे, जेणेकरून भारतीय सिनेमामध्ये स्वारस्य असणाऱ्या जगभरातील चित्रपटरसिकांना त्यांचा आस्वाद घेता येईल. दादासाहेब फाळके यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती सोहळ्याचा आज समारोप होत असताना हा मोठा डेटाबेस चित्रपटप्रेमींना उपलब्ध होत आहे. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब यांना निश्चितपणे ही उचित आदरांजली ठरेल !" अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

***

Jaydevi PS/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1715109) Visitor Counter : 195


Read this release in: English