संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या आयएनएएस 330 या लढाऊ हेलिकॉप्टर तुकडीचा सुवर्णमहोत्सव आज साजरा
Posted On:
17 APR 2021 5:28PM by PIB Mumbai
मुंबई, 17 एप्रिल 2021
भारतीय नौदलातील आयएनएएस 330 अर्थात “हार्पन्स” या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या तुकडीचा सुवर्णमहोत्सव आज 17 एपिल 2021 ला साजरा होत आहे. ही तुकडी 17 एप्रिल 1971 रोजी नौदलात दाखल झाली होती आणि 1971 सालच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान या तुकडीने पहिल्यांदा नावलौकिक मिळविला. सुरुवातीला या तुकडीत ब्रिटीश वेस्टलँड कंपनीने निर्मिलेल्या सी किंग Mk 42 ASW या प्रकारच्या हेलिकॉप्टर्सचा समावेश होता, सध्या ह्या तुकडीत Mk 42 B या प्रकारची हेलिकॉप्टर्स कार्यरत आहेत. “फ्लाइंग फ्रिगेट” अर्थात “उडते लढाऊजहाज” या नावाने प्रसिध्द असलेल्या या हेलिकॉप्टर्समध्ये, नौदलाच्या यादीतील सर्वात शक्तिशाली अस्त्रांच्या वापरासाठी आवश्यक अशा सर्व सोयी उपलब्ध आहेत ज्यांच्या सहाय्याने जहाज-विरोधी क्षेपणास्त्रे, पाणबुडी-विनाशक टॉर्पेडो आणि युद्धात पाणबुडीचा नाश करण्यासाठी वापरले जाणारे अस्त्र यांचा सहजतेने मारा करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.
भारतीय नौदलाच्या विक्रांत या जहाजावर 26 जुलै 1971 रोजी सी किंग हेलिकॉप्टर सर्वात पहिल्यांदा उतरले आणि त्या दिवसापासून विक्रांत हे विमानवाहू जहाज आणि हार्पन्स हेलिकॉप्टर्सची अजिंक्य जोडी हे अशा अनेक प्रथम घडणाऱ्या घटनांच्या मालिकेचे साक्षीदार झाले. 18 ऑक्टोबर 1971 ला पाणबुडी-विरोधी लढाऊ अभियानाचे सर्वात प्रथम परिचालन करण्यात आले तर 30 नोव्हेंबर 1971 रोजी संशयित पाणबुडीवर पहिला सदिश हल्ला करण्यात आला.
ऑक्टोबर1995 मध्ये ही तुकडी आयएनएस गरुड या जहाजावरून एनएएस कुंजाली (सध्या मुंबई येथे असलेले आयएनएस शिक्रा) या जहाजावर हलविण्यात आली आणि तेव्हापासून ती याच जहाजावर स्थापित आहे. या तुकडीने अनेक प्रसंगी “आघाडीवरील सर्वोत्तम तुकडी” आणि “सर्वोत्तम नौदल हवाई तुकडी” ही अत्यंत मानाची पारितोषिके मिळवली आहेत आणि नौदल ताफ्याचे डोळे आणि कान असण्याचे कार्य ते अत्यंत निष्ठेने बजावत आहेत. सी किंग हेलिकॉप्टरच्या कोणत्याही ऋतूत, अहोरात्र काम करण्याच्या क्षमतेमुळे या तुकडीने नौदलाची क्षमता अनेक पटींनी वाढविली आहे. या तुकडीच्या “कोणताही समुद्र, कोणतीही मोहीम, कोणतेही जहाज” या ध्येयवाक्यामध्ये या तुकडीची पराकोटीच्या बांधिलकीची भावना अत्यंत योग्यपणे ध्वनित झाली आहे.
* * *
Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712436)
Visitor Counter : 161