आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

महाराष्ट्रासाठी 1121 व्हेंटिलेटर येत्या तीन ते चार दिवसात येतील- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर


ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहाय्य करणार आहे- केंद्रीय मंत्री

करोनाची साखळी तोडण्यासाठी उपाय योजनांचे पालन करणे आवश्यक

Posted On: 10 APR 2021 9:06PM by PIB Mumbai

पुणे 10 एप्रिल 2021

 

करोनाची साखळी तोडण्यासाठी जे उपाय योजले जात आहेत त्याचे आपण पालन केले पाहीजे. पुणेकर नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. हा कालावधी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची बंधने पाळली जावीत. अ‍से मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात व्य्क्त केले. विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत' आढावा बैठक घेण्यात आली.

 

यावेळी बोलताना ते म्हणाले की, चाचण्यांची क्षमता वाढविण्याची गरज असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक संपर्क शोधून त्यांचे विलीगीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. सर्व मिळून कोरोनाचा संसर्ग निश्चितपणे दूर करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यानंतर प्रसार माघ्यमांशी बोलताना श्री जावडेकर म्हणाले की, महाराष्ट्रासाठी व्हेंटिलेटर मिळण्याबाबत आपण केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी, मंत्र्यांशी  बोलणे केले असून 1121 व्हेंटिलेटर येत्या तीन ते चार दिवसात येतील . तसेच ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहाय्य करणार आहे असे त्यांनी सांगितले.

करोना रुग्णांचे ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करण्यासाठी जे मनुष्यबळ लागणारआहे त्यासाठी नॅशनल हेल्थ मिशन मधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्हयासाठी पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा. बेड व्यवस्थापन तसेच रेमडेसिवरबाबत कडक धोरण राबवा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. आरोग्य सुविधा वाढविण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त संतोष पाटील, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, डॉ. दिलीप मोहीते आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ट्रॅकिंग व टेस्टिंग, कंटेनमेंट झोन, लसीकरण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णसंख्येचा तपशील, पुणे ग्रामीण भागातील रुग्णवाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, ऑक्सिजन मागणी, रेमडेसिवर मागणी व सद्यस्थिती तसेच पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती पीपीटी सादरीकरणाद्वारे दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोविड-19 ची सद्यस्थितीची माहिती देऊन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

*****

MI/DIO/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1710937) Visitor Counter : 170


Read this release in: English