शिक्षण मंत्रालय
'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात आज संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद
Posted On:
07 APR 2021 1:46PM by PIB Mumbai
Mumbai | New Delhi : 7 April 2021
‘परीक्षा पे चर्चा 2021’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संध्याकाळी सात वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’या कार्यक्रमाचा हा चौथा भाग असून,कोविड-19 महामारीमुळे यंदा पहिल्यांदाच हा कार्यक्रम आभासी स्वरूपात होणार आहे.
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात, पंतप्रधान विद्यार्थ्यांना, काहीही ताण-तणाव न घेता परीक्षेची तयारी कशी करावी, याविषयी उपयुक्त सूचना आणि काही युक्त्या सांगतील.
“ आभासी स्वरूपातल्या आजच्या पहिल्याच ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात, सर्वांशी संवाद साधणे अत्यंत रोचक ठरेल, यावेळी अनेकविध विषयांवर विस्तृत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. तुम्ही परीक्षेला सामोरे जाणारे योद्धे असा, पालक किंवा मग शिक्षक असा, आजच्या चर्चेत सर्वांसाठी काही ना काही निश्चित असेल. चला, आपण सगळे मिळून परीक्षा तणावमुक्त करुया.” असे पंतप्रधानांनी आज सकाळी आपल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, हिंदी भाषेत DD नॅशनल आणि DD न्यूज या वाहिन्यांवर बघता येईल. तसेच, DD सह्याद्री वर हा कार्यक्रम मराठी भाषेत उपलब्ध असेल.त्याशिवाय, आसामी, बांग्ला, उडिया, गुजराती, कन्नड, तेलगु, तमिळ आणि मल्याळम या भाषांमधेही या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाईल.
‘परीक्षा पे चर्चा’ हा मुख्य कार्यक्रम अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध असेल. EduMinofIndia, narendramodi, pmoindia, pibindia, DD National, MyGovIndia, DDNews, RajyaSabhaTV, SwayamPrabha या सर्व डिजिटल पोर्टलच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनल्सवरून संध्याकाळी सात वाजल्यापासून हा कार्यक्रम दाखवला जाईल.
***
MC/ Radhika / DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710066)
Visitor Counter : 185