संरक्षण मंत्रालय
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन
यंदाच्या मर्चंट नेव्ही सप्ताहात नौवहन उद्योगाची भूमिका अधोरेखित करणे तसेच नौवहन उद्योगाच्या विकासास चालना यावर भर दिला जाईल: नौवहनचे महासंचालक व एन.एम.डी.सी.चे अध्यक्ष
प्रविष्टि तिथि:
01 APR 2021 12:46PM by PIB Mumbai
मुंबई, 1 एप्रिल 2021
नौवहनचे महासंचालक व एन.एम.डी.सी. समितीचे अध्यक्ष अमिताभ कुमार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय राष्ट्रीय मेरीटाईम दिन सोहोळा समितीच्या (एनएमडीसी) प्रतिनिधी मंडळाने फ्लॅग पिनिंग समारंभासाठी व 31 मार्च ते 05 एप्रिल 2021 दरम्यान साजऱ्या होणाऱ्या मर्चंट नेव्ही सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली.

अमिताभ कुमार यांनी राज्यपालांच्या पोशाखावर पहिला लघु ध्वज लावून त्यांचा सत्कार केला आणि सप्ताहभर चालणाऱ्या या उत्सवासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.
प्रतिनिधींशी संवाद साधताना, माननीय राज्यपालांनी भारताच्या विशाल सागरी इतिहासाचे तपशीलवार वर्णन केले आणि कोविडच्या आव्हानात्मक काळातही भारतामध्ये पुरवठा साखळी राखण्यासाठी मर्चंट नेव्हीच्या महत्वावर भर दिला. त्यांनी भारतातील सागरी शिक्षण आणि सागरी पर्यटकांची सुरक्षा व बचावाच्या सद्यस्थितीविषयी गंभीर चिंता व्यक्त केली. मर्चंट नेव्ही सप्ताह सोहोळ्यासाठी त्यांनी एनएमडीसी (केंद्रीय) समिती, सागरी उद्योगातील सर्व हितधारक आणि सागरी पर्यटक यांना शुभेच्छा दिल्या आणि अभिष्टचिंतन केले.

कुमार यांनी माहिती दिली की, 1964 पासून, राष्ट्रीय समुद्री दिवस हा 5 एप्रिल रोजी साजरा केला जातो, कारण या दिवशी 1919 मध्ये प्रथम मुंबईच्या मेसर्स सिंधिया स्टीम, नॅव्हिगेशन कंपनी लिमिटेडच्या “एस.एस. लॉयल्टी ” या जहाजाने मुंबई ते लंडन (यूके) हा पहिला आंतरराष्ट्रीय जलप्रवास केला. यावर्षी मर्चंट नेव्ही सप्ताह नौवहन उद्योगाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी तसेच नौवहन उद्योगाच्या विकासास चालना देण्यासाठी आणि या क्षेत्रातील सर्व बाबींची जनतेला माहिती करून देण्यासाठी तसेच समुद्री जलवाहतूक करणाऱ्या आणि राष्ट्रीय नौवहन उद्योग आणि इतर संबंधित घटकांच्या विकासास प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत व्यक्तींच्या सेवेचे मोल जाणण्यासाठी साजरा केला जाईल.
भारतातील व्यापारी समुद्री पायाभूत सुविधा तसेच सागरी क्षेत्रात झालेल्या अलीकडील घडामोडी व प्रगतीची सविस्तर माहितीही कुमार यांनी दिली. त्यांनी सांगितले की ‘कोविड 19 च्या नंतरचे शाश्वत नौवहन’ आणि ‘भारतीय समुद्री इतिहास’ या विषयावरील वेबिनार अनुक्रमे 1 आणि 3 एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. 5 एप्रिल 2021 रोजी भव्य समारोप सोहोळा साजरा केला जाईल. या उत्सवा दरम्यान मेरीटाईम क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती आणि संस्था यांना विविध पुरस्कार प्रदान केले जातील.

नौवहनचे महासंचालक, भारतीय नौवहन महामंडळ आणि सागरी क्षेत्रातील विविध संघटनांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राष्ट्रीय समुद्री दिवस / मर्चंट नेव्ही ध्वज दिन साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन व सहकार्य करण्यासाठी एनएमडीसीची स्थापना केली आहे. समितीमध्ये जहाज मालक, सीफेअरर्स, पोर्ट ट्रस्ट, सागरी राज्य सरकारे आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.
Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1708958)
आगंतुक पटल : 177
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English