अल्पसंख्यांक मंत्रालय
28 व्या ‘हुनर हाट’चे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
‘हुनर हाट’मुळे साडेपाच लाख कारागिर आणि इतर व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध- केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी
Posted On:
27 MAR 2021 6:55PM by PIB Mumbai
पणजी, 27 मार्च 2021
28 व्या ‘हुनर हाट’ चे आज मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमासाठी राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, लोकसभेचे खासदार फ्रान्सिस्को सार्दीन, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाचे सचिव पी.के. दास यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
‘हुनर हाट’ मुळे देशातील कारागिरांबरोबरच गोव्यातील कारागिरांनाही मोठे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे मुख्यमंत्री डॉ सावंत म्हणाले. जास्तीत जास्त लोकांनी हुनर हाट ला भेट देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
‘हुनर हाट’ हा स्थानिक कलाकार, कारागिर आणि व्यवसायाशी निगडीत इतरांना रोजगार पुरवणारा यशस्वी उपक्रम ठरल्याचे केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले. ‘हुनर हाट’मुळे आतापर्यंत साडेपाच लाख लोकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘हुनर हाट’ हा स्वदेशी कलाकारांना प्रोत्साहन देणारा मंच असल्याचे ते म्हणाले.
स्वदेशी कलात्मक आणि हस्तकला उत्पादनांच्या 28 व्या ‘हुनर हाट’ चे गोव्यात 4 एप्रिलपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, दिल्ली, गोवा, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, नागालँड, ओडिशा, पुडुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतल्या कारागीरांच्या स्वदेशी आणि हस्तकलेचे दर्शन घडवणाऱ्या अनोख्या वस्तू आणि उत्पादने या ‘हुनर हाट’ मध्ये विक्री आणि आणि प्रदर्शनासाठी उपलब्ध आहेत.
कलमकारी, बिद्री, उदाईगिरी लाकडी कटलरी, बांबू,ताग यापासून बनवलेली उत्पादने, मधुबनी चित्रकलेचा आविष्कार घडवणाऱ्या चित्र कृती, मुंगा सिल्क, टसर सिल्क, चामड्याची उत्पादने, संगमरवरी वस्तू, चंदन उत्पादने, कशिदा काम, चंदेरी साड्या, कुंदन काम केलेले दाग दागिने, काचेच्या वस्तू, लाकडी, मातीच्या वस्तू, पितळी वस्तू, हातमाग उत्पादने अशी वैविध्यपूर्ण उत्पादने या हुनर हाट मध्ये मांडण्यात येत आहेत.
हुनर हाट मधल्या बावर्चीखाना’ मध्ये मोगलाई, दक्षिण भारतीय, गोवा, मल्याळी, पंजाबी, बंगाली अशा पारंपारिक खाद्य संस्कृतीचा आस्वादही इथे येणाऱ्या लोकांना घेता येणार आहे.
याबरोबरच रूपसिंग राठोड (27 मार्च), सुदेश भोसले (28 मार्च), अल्ताफ राजा आणि राणी इंद्राणी (29 मार्च); निजामी ब्रदर्स (30 मार्च), गुरदास मान ज्युनियर (31 मार्च), प्रेम भाटिया (1 एप्रिल), विनोद राठोड आणि विनोदवीर सुदेश लेहरी (2 एप्रिल), गुरु रंधावा (3 एप्रिल), शिबानी कश्यप (4 एप्रिल) “हुनार हाट” येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.
आभासी तसेच ऑनलाईन मंचावर http://hunarhaat.org आणि जीईएम पोर्टलवर हुनर हाट उपलब्ध आहे. याद्वारे देशातले आणि परदेशातले लोकही या कारागीरांच्या स्वदेशी वस्तू डिजिटल आणि ऑनलाईन खरेदी करू शकतात.
यापुढचा 'हुनर हाट' डेहरादूनमध्ये (16 एप्रिल ते 25 एप्रिल), सुरत (26 एप्रिल ते 5 मे) या काळात आयोजित केला जाईल. याशिवाय कोटा, हैदराबाद, मुंबई, जयपूर, पाटणा, प्रयागराज, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, जम्मू-काश्मीर या ठिकाणीही या वर्षी हुनर हाट आयोजित केले जाणार आहेत.
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708093)
Visitor Counter : 201