माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘पवनाकाठचा धोंडी’आणि ‘ताई तेलीण’ या दुर्मिळ चित्रपटांसह मराठी चित्रपटांचा खजिना भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त


मराठी चित्रसृष्टीच्या 1950 ते 1970 या सुवर्ण काळातल्या अनेक चित्रपटांचा यात समावेश

हिंदी चित्रपट संग्रहाचाही समावेश

Posted On: 26 MAR 2021 6:28PM by PIB Mumbai

मुंबई, 26 मार्च 2021

एनएफएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने 16 एमएम आणि 35 एमएमच्या 89 चित्रपटांच्या प्रतींची आपल्या खजिन्यात भर घातली आहे. मराठी चित्रसृष्टीच्या 1950 ते 1970 या सुवर्ण काळातल्या अनेक  चित्रपटांसह  महत्वाच्या काही हिंदी चित्रपटांचाही यामध्ये समावेश आहे. 23 कृष्ण धवल चित्रपट प्राप्त झाल्याने भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण युगातला अनमोल ठेवा प्राप्त झाला आहे.

मराठी चित्रपटांच्या सुवर्ण काळातले महत्वाचे चित्रपट आणि गाजलेले काही हिंदी चित्रपट प्राप्त झाल्याने आनंद झाल्याची भावना एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी व्यक्त केली. 1953 मधला ताई तेलीण आणि 1966 मधला पवनाकाठचा धोंडी हे अतिशय दुर्मिळ चित्रपट लुप्त झाले आहेत असे वाटत असतानाच हे चित्रपट एनएफएआयच्या खजिन्यात आले आहेत याचा अतिशय आनंद झाला आहे. चित्रपट संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचे जतन करण्यासाठी चित्रपट निर्माते, वितरक आणि वैयक्तिक संग्रह करणाऱ्या व्यक्तींनी, चित्रपट आणि चित्रपट प्रसिद्धीचे साहित्य घेऊन पुढे येण्याचे आवाहन मगदूम यांनी केले.

1953 मधला ताई तेलीण आणि 1966 मधला पवनाकाठचा धोंडी हे अतिशय दुर्मिळ चित्रपट लुप्त झाले आहेत असे समजले जात असतांनाच हे चित्रपट प्राप्त झाले आहेत. ताई तेलीण हा आर्यन फिल्म कंपनीचा ऐतिहासिक चित्रपट असून शांत आपटे, सुधा आपटे, नलिनी बोरकर आणि झुंजारराव पवार या  प्रसिद्ध कलाकारांच्या यात भूमिका आहेत. केपी भावे आणि अंतो नरहरी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला मास्टर कृष्णराव यांचे संगीत होते.

अनंत ठाकूर यांचा ‘पवनाकाठचा धोंडी’ हा आणखी एक महत्वाचा चित्रपट असून 1966 मध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला होता.दिग्दर्शक म्हणून मराठीमधला हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ठाकूर यांनी राज कपूर यांची भूमिका असलेला चोरी चोरी या 1956 मधल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. पवनाकाठचा धोंडी या चित्रपटाची निर्मिती उषा मंगेशकर यांनी श्री महालक्ष्मी बॅनर अंतर्गत केली. जयश्री गडकर,चंद्रकांत आणि सुर्यकांत या प्रख्यात कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. प्रत्यक्ष जीवनात भाऊ-भाऊ असणारे चंद्रकांत आणि सुर्यकांत यांनी पडद्यावरही भावांची भूमिका साकारली होती, असा प्रसंग तसा दुर्मिळच.

पडद्यावर भावंड म्हणून भूमिका साकारणे हा आपणा दोघा भावंडांसाठी भावनिक क्षण असल्याचे स्मरण  सुर्यकांत यांनी एनएफएआयच्या श्राव्य  इतिहास प्रकल्पाचा भागात केले.प्रसिद्ध लेखक गो. नी दांडेकर यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत होते.

या संग्रहातला आणखी एक महत्वाचा चित्रपट म्हणजे राम गबाले यांचा 1950 मधला ‘देव पावला’ हा चित्रपट. दामुअण्णा मालवणकर आणि विष्णूपंत जोग  यांनी या चित्रपटात भूमिका सरल्या होत्या, पुण्यातल्या प्रभात स्टुडीओमध्ये याचे चित्रीकरण झाले होते.

1955 मधला राजन कुमार यांचा भाऊबीज, माधव शिंदे यांचा ‘अंतरीचा दिवा’ (1960), दत्ता धर्माधिकारी यांचा सुभद्राहरण (1963), वसंत पिंतर यांचा बारा वर्षे सहा महिने तीन दिवस(1967),राज दत्त यांचा धाकटी बहिण (1970),केशव तोरो यांचा पुढारी (1972),गोविंद कुलकर्णी यांचा बन्या बापू (1977), राजा बारगीर यांचा दीड शहाणे (1979), सुशील गजवानी यांचा राखणदार (1982), कांचन नायक यांचा कळत नकळत (1989) या चित्रपटांचा  यात समावेश आहे. भालजी पेंढारकर यांचा साधी माणसं(1965), राजा ठाकूर यांचा राजमान्य राजश्री (1959),एकटी  (1968)आणि घरकुल   (1970), आणि रमेश देव यांचा छंद प्रीतीचा (1968)आणि  जीवा सखा  (1991) या गाजलेल्या मराठी चित्रपट निर्मात्यांच्या चित्रपटांचाही यात समावेश आहे.

यासमवेत काही महत्वाचे हिंदी चित्रपटही यामध्ये आहेत. शक्ती सामंत यांचा नॉटी बॉय (1962), नायकाच्या भूमिकेत किशोर कुमार असलेला मिहान कुमार यांचा अमन (1967),रवींद्र दवे यांचा  गेस्ट हाउस (1959). एम सादिक यांचा ताजमहल(1963), महमद हुसेन यांचा शिकारी   (1963), केवळ मिश्र यांचा दो यार  (1972)  आणि उत्तम कुमार अभिनित अलो सरकार दिग्दर्शित (1978) मधला बंदी चित्रपटांचाही यात समावेश आहे.

Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1707904) Visitor Counter : 336


Read this release in: English