अल्पसंख्यांक मंत्रालय
पणजी इथल्या कला अकादमीत 28 व्या ‘हुनर हाट’चे आयोजन
Posted On:
26 MAR 2021 2:43PM by PIB Mumbai
पणजी, 26 मार्च 2021
‘हुनर हाट’हा स्वदेशी कला आणि हस्तकला यांच्यासाठी अतिशय योग्य, लोकप्रिय आणि अभिमानास्पद असा मंच असल्याचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.
स्वदेशी कलात्मक आणि हस्तकला उत्पादनांच्या 28 व्या ‘हुनर हाट’ चे गोव्यातल्या पणजी, कांपाल इथल्या कला अकादमीत आजपासून आयोजन करण्यात येत आहे. 4 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या हुनर हाटचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत उद्या 27 मार्चला, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या प्रमुख उपस्थितीत औपचारिक उद्घाटन करणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र्य कार्यभार) श्रीपाद नाईक; राज्यसभेचे खासदार विनय दिनू तेंडुलकर; लोकसभेचे खासदार फ्रान्सिस्को सार्दीन्हा; गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर; केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाचे सचिव पी.के. दास; वरिष्ठ अतिरिक्त सचिव एस. के. देव वर्मन; मानसचे अध्यक्ष पी. के. ठाकूर आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पने अंतर्गत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय 4 एप्रिल पर्यंत 28 वा हुनर हाट आयोजित करत आहे. गोव्यात पणजी इथे होणाऱ्या या हुनर हाट मध्ये 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले 500 पेक्षा कारागीर सहभागी होत आहेत.
आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, दिल्ली, गोवा, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, नागालँड, ओडिशा, पुडुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतल्या कारागीरांच्या स्वदेशी आणि हस्तकलेचे दर्शन घडवणाऱ्या अनोख्या वस्तू आणि उत्पादने या हुनर हाट मध्ये विक्री आणि आणि प्रदर्शनासाठी उपलब्ध आहेत.
कलमकारी, बिद्री, उदाईगिरी लाकडी कटलरी, बांबू,ताग यापासून बनवलेली उत्पादने, मधुबनी चित्रकलेचा आविष्कार घडवणाऱ्या चित्र कृती, मुंगा सिल्क, टसर सिल्क, चामड्याची उत्पादने, संगमरवरी वस्तू, चंदन उत्पादने, कशिदा काम, चंदेरी साड्या, कुंदन काम केलेले दाग दागिने, काचेच्या वस्तू, लाकडी, मातीच्या वस्तू, पितळी वस्तू, हातमाग उत्पादने अशी वैविध्यपूर्ण उत्पादने या हुनर हाट मध्ये मांडण्यात येत आहेत.
हुनर हाट मधल्या बावर्चीखाना’ मध्ये मोगलाई, दक्षिण भारतीय, गोवा, मल्याळी, पंजाबी, बंगाली अशा पारंपारिक खाद्य संस्कृतीचा आस्वादही इथे येणाऱ्या लोकांना घेता येणार आहे.
याबरोबरच रेखा राज आणि मोहित खन्ना (26 मार्च), रूपसिंग राठोड (27 मार्च), सुदेश भोसले (28 मार्च), अल्ताफ राजा आणि राणी इंद्राणी (29 मार्च); निजामी ब्रदर्स (30 मार्च), गुरदास मान ज्युनियर (31 मार्च), प्रेम भाटिया (1 एप्रिल), विनोद राठोड आणि विनोदवीर सुदेश लेहरी (2 एप्रिल), गुरु रंधावा (3 एप्रिल), शिबानी कश्यप (4 एप्रिल) “हुनार हाट” येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.
देशाच्या विविध भागात आयोजित करण्यात येत असलेल्या हुनर हाटला प्रचंड प्रोत्साहन लाभत असून या माध्यमातून 5 लाख 50 हजार कारागीर आणि संबंधिताना रोजगार आणि रोजगाराच्या संधी प्राप्त होत असल्याचे नक्वी यांनी म्हटले आहे.
आभासी तसेच ऑनलाईन मंचावर http://hunarhaat.org आणि जीईएम पोर्टलवर हुनर हाट उपलब्ध आहे. याद्वारे देशातले आणि परदेशातले लोकही या कारागीरांच्या स्वदेशी वस्तू डिजिटल आणि ऑनलाईन खरेदी करू शकतात.
यापुढचा 'हुनर हाट' डेहरादूनमध्ये (16 एप्रिल ते 25 एप्रिल), सुरत (26 एप्रिल ते 5 मे) या काळात आयोजित केला जाईल. याशिवाय कोटा, हैदराबाद, मुंबई, जयपूर, पाटणा, प्रयागराज, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, जम्मू-काश्मीर या ठिकाणीही या वर्षी हुनर हाट आयोजित केले जाणार आहेत.
S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707757)
अभ्यागत कक्ष : 269