माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मराठी चित्रपट आनंदी गोपाळला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019

Posted On: 22 MAR 2021 10:44PM by PIB Mumbai

 

दिग्दर्शक समीर विद्वंस यांच्या आनंदी गोपाळ या चरित्रात्मक चित्रपटाने सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला आहे.  या चित्रपटाची कथा ही आनंदी गोपाळ आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी यांच्याभोवती फिरते ज्यांनी तिला वैद्यकीय अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात पेनसिल्व्हेनियाच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेल्या 1886 मध्ये त्यांनी एमडी पदवी प्राप्त केली. भाग्यश्री मिलिंद हिने आनंदी गोपाळ यांची तर ललित प्रभाकर याने तिच्या पतीची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनचा पुरस्कारही मिळाला आहे. सुनील निगवेकर आणि निलेश वाघ यांनी या चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझाइन केले आहे.

बार्डो हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक भीमराव मुडे यांचा हा चित्रपट म्हणजे काळाच्या चौकटीतून एखाद्या व्यक्तीचे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ यांचे अवलोकन करणारी कलाकृती आहे. चित्रपटाची निर्मिती रितू फिल्म कट यांनी केली आहे. या चित्रपटातील रान पेटले.... या गाण्यासाठी सावनी रवींद्र हिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

नियाज मुजावर लिखित ताजमहाल या चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाची निर्मिती ट्युलिन स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड नी केली आहे. हा चित्रपट भीमा कोनाडे या गरीब शेतकऱ्याच्या जीवनाविषयी आहे, जो आपला एकुलता एक मुलगा बाळ याच्या कल्याणासाठी त्याच्या ताजमहालनावाच्या बकरीचा आपल्या कुलदेवतेला बळी देण्याचा निर्णय घेतो. परंतु बाळला आपल्या जिवापेक्षा त्या ताजमहाल नावाच्या बकरीच्या जीवाचे संरक्षण करायचे असते.

मराठीत दोन विशेष उल्लेखनीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. एक लता भगवान करे या चित्रपटासाठी ज्यात लता करे यांनी स्वत: ची भूमिका साकारली आहे. आपल्या पतीला जीवघेण्या स्थितीतून वाचवण्यासाठी  प्रबळ इच्छाशक्ती असलेली एक 65 वर्षीय महिला मॅरेथॉन धावते आणि जिंकते.

दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्या पिकासो या चित्रपटाला दुसरा उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट महाराष्ट्राच्या कोकणातील एका दुर्गम खेड्यातील सातवी इयत्तेच्या विद्यार्थ्याची कथा आहे ज्याची पिकासो कला शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. स्पर्धेतील विजेत्याला पिकासोचे जन्मस्थान - स्पेन - ला जाण्याची संधी मिळणार असते.

साउंड डिझायनर मंदार कमलापूरकर यांना मराठी चित्रपट, त्रिज्या साठी सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्रिज्या चित्रपटात अवधूतचा प्रवास चित्रित केला आहे, ग्रामीण भागातल्या त्याच्या मूळ गावापासून आणि भारतातल्या एका मोठ्या शहरात  आपल्या आयुष्यातील स्वप्नांच्या आणि आकांक्षांच्या वास्तवाचा कसा सामना करतो याचा शोध घेतला आहे.

कथाबाह्य चित्रपट विभागात उत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण पुरस्कार खिसा या मराठी चित्रपटासाठी, दिग्दर्शक राज प्रीतम मोरे यांना जाहीर झाला आहे. या चित्रपटात महाराष्ट्रातील दुर्गम गावात राहणाऱ्या एका लहान मुलाची कहाणी आहे. शाळेच्या शर्टसाठी एक मोठा खिशा शिवण्याचा तो निर्णय घेतो व त्याचा हा खिसा लवकरच खेड्यातील वडिलधाऱ्या मंडळींमधील वादाचा मुद्दा ठरतो. पी पी सिने प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

उत्कृष्ट तपास चित्रपट म्हणून दिग्दर्शक विवेक वाघ यांच्या जक्कल या मराठी  चित्रपटाने मान पटकावला आहे. या चित्रपटाची निर्मिती निओन रीळ क्रिएशन यांनी केली आहे.

अशोक राणे द्वारा लिखित सिनेमा पाहणारा माणूस या पुस्तकाला चित्रपटावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार मिळाला आहे.

***

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706766) Visitor Counter : 243


Read this release in: English