माहिती आणि प्रसारण मंत्रालय

देशाच्या प्रगतीसाठी संशोधन आणि नावीन्यता क्षेत्रांवर भर देण्यासोबतच युवा प्रतिभा आणि मेहनतीला प्रोत्साहित करण्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आवाहन

Posted On: 20 MAR 2021 9:45PM by PIB Mumbai

मुंबई, 20 मार्च 2021

 

देशाच्या प्रगतीसाठी संशोधन आणि नावीन्यता क्षेत्रांवर भर देण्यासोबतच युवा प्रतिभा आणि मेहनतीला प्रोत्साहित करण्याचे आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. एका खासगी वृत्त समूहाच्या वतीने विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या तरुणाईचा गौरव करणारा पुरस्कार सोहळा आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

तरुणांना योग्य वेळेला प्रेरणा देऊन त्यांना पुरस्कृत करून त्यांचा उत्साह वाढवणं हे फार महत्त्वाचं काम असून ते समाजाने केलं पाहिजे, असे आवाहन जावडेकर यांनी यावेळी केले.

नव नवे शोध लावणारा युवा वर्ग आपल्याकडे आहे पण त्यांना आत्मसात करून त्यांचा स्वीकार करण्याची मानसिकता आपल्या समाजात येणे महत्वाचे आहे असे त्यांनी नमूद केले.

विकसित देशात नावीन्यतेला वाव देऊन त्याचा उपयोग केला जातो म्हणून ते देश समृद्ध होतात. शोधाने देश समृद्ध होतात हा धडा आपणही घेतला पाहिजे आणि म्हणूनच पंतप्रधानांनी मेक इन इंडिया ही कल्पना मांडली, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी होणाऱ्या ऑलिम्पियाडमध्ये अटल टिंकरिंग लॅबमधून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी नवनवीन, चांगल्या कल्पना घेऊन येतात याचा प्रत्यय येतो, ही आमच्या देशाची संपत्ती आहे. बुद्धिमत्ता ही आमची ताकद आहे, फक्त तिचा वापर जो दुसरीकडे होतो आहे तो आपल्या देशात झाला पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

आपल्या कौशल्याने आणि प्रगल्भतेने संशोधन, सामाजिक कार्य, नवउद्यमी, व्यवसाय, कला आणि मनोरंजन, कायदा सुशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या युवकांचा केंद्रीय पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला.

R.Tidke/S.Tupe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1706353) Visitor Counter : 111


Read this release in: English