माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुण्यातील आगा खान पैलेस इथे “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार
प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते दिल्लीसह सात ठिकाणी प्रदर्शनांचे उद्घाटन
‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा’निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे वार्तांकन करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची व्यापक व्यवस्था
Posted On:
11 MAR 2021 2:56PM by PIB Mumbai
मुंबई, 11 मार्च 2021
पुढच्या वर्षी देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत असून हा अमृतमहोत्सव असा उत्सव व्हायला हवा ज्यात स्वातंत्र्यलढयाची प्रेरणा, हुतात्म्यांना श्रद्धांजली आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीचा त्यांचा संकल्प याची प्रत्यक्ष अनुभूती आजच्या पिढीला व्हायला हवी, असे मत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” साजरा करण्यासाठी आयोजित राष्ट्रीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.या उत्सवात सनातन भारताच्या वैभवाचे प्रतिबिंब असायला हवे तसेच आधुनिक भारतातील समृद्धीचेही दर्शन व्हायला हवे. या उत्सवात, देशातील साधूसंतांच्या आध्यात्मिकतेचे दर्शन असावे त्यासोबतच, आपल्या वैज्ञानिकांची ताकद आणि गुणवत्ताही जगापुढे यावी, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. यानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांमधून गेल्या 75 वर्षातील भारताच्या उपलब्धी जगासमोर याव्यात, तसेच आगामी 25 वर्षांच्या आपल्या संकल्पांचा आराखडाही त्यातून मांडला जावा, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी खालील पाच स्तंभ निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
- स्वातंत्र्यलढा
- 75 व्या वर्षीच्या कल्पना
- 75 व्या वर्षापर्यंतच्या उपलब्धी
- 75 व्या वर्षी अपेक्षित कार्य आणि कृती
- 75 व्या वर्षीचा संकल्प
‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सुरुवात 2022 च्या स्वातंत्र्यदिनाच्या 75 आठवडे पूर्वीपासून सुरु होईल आणि हे कार्यक्रम 2023 च्या स्वातंत्र्यदिनापर्यंत सुरु राहतील. या संपूर्ण उपक्रमाची सुरुवात 12 मार्च 2021 पासून म्हणजेच दांडी यात्रेच्या वर्धापन दिनापासून होईल, यानिमित्त 25 दिवसांचे कार्यक्रम आयोजित केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, गुजरात मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि सांगता 5 एप्रिल 2021 रोजी होईल( दांडी यात्रेच्या सांगतेला)
पंतप्रधानांच्या या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने आणि या महोत्सवात सहभागी होण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देखील या संपूर्ण सोहळ्यांचे वार्तांकन करण्याची जबाबदारी घेतली असून, त्यासाठी देशभरात व्यापक तयारी करण्यात येत आहे.
- दूरदर्शन वृत्तविभाग आणि वृत्त सेवा विभाग आकाशवाणी यांच्या वतीने गुजरात मध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच देशातल्या विविध राज्यात होणाऱ्या कार्यक्रमांचे वार्तांकन आणि प्रसारण त्या त्या राज्यांतील प्रादेशिक वृत्त विभागामार्फत केले जाईल. तसेच यानिमित्त प्राईम टाईम चर्चा आणि विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच उद्घाटनाच्या कार्यक्रमांनंतर राष्ट्रीय पातळीवर देखील कार्यक्रम केले जातील.
- जनसंवाद विभाग आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश संयुक्तपणे देशभरात स्वातंत्र्याची 75 वर्षे या संकल्पनेवर आधारित प्रदर्शने आयोजत करतील. मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते गांधीनगर येथे साबरमती आश्रमात होईल. त्यासोबतच, सात राज्य स्तरीय प्रदर्शनांचे उद्घाटन त्याचदिवशी दुपारी 12 नंतर मान्यवरांच्या हस्ते होईल. या प्रदर्शनांमध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाच्या घटनांचे चित्रण असेल, जसे की असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, चलेजाव चळवळ इत्यादी. यात दांडी यात्रा, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल आणि स्वातंत्र्यलढ्यातील इतर थोर सेनानींच्या कार्याला उजाळा दिला जाईल.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते 13 मार्च 2021 रोजी या तीसपैकी खालील सात ठिकाणच्या प्रदर्शनाचे आभासी पद्धतीने उद्घाटन होईल.
- सांबा जिल्हा, जम्मू काश्मीर
- बंगळूरु, कर्नाटक
- पुणे, महाराष्ट्र
- भुवनेश्वर, ओडिशा
- मोईरंग जिल्हा, बिश्नुपुर , मणिपूर
- पटना, बिहार
त्याशिवाय नवी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्रात आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते 13 मार्च ला होईल.
महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रदर्शने
पुण्यातील आगा खान पैलेस येथे येत्या 13 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आभासी पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. हे प्रदर्शन 15 मार्चपर्यंत चालणार आहे. भारतीय पुरातत्व विभागातर्फे स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. यात, 30 पॅनल्सच्या माध्यमातून महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल,सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान दर्शवले जाणार आहे.
वर्धा येथे 19-23 मार्च दरम्यान आणि मुंबईत 26 ते 30 मार्च दरम्यान ही प्रदर्शने भरवली जाणार आहेत.
त्याचप्रमाणे, गोव्यातील आझाद मैदान येथेही 12 ते 15 मार्च दरम्यान प्रदर्शन आयोजित केले जाणार असून, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
या कार्यक्रमांविषयी माहिती देतांना जावडेकर यांनी सांगितले की सर्व राज्यांनी या कार्यक्रमांच्या आयोजनात रस दाखवला आहे.12 मार्चपासून सुरु होणारे हे कार्यक्रम पुढे जवळपास दीड वर्ष चालणार असून, त्यातून देशभरात उत्सवी आणि चैतन्यमय वातावरण निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानिमित्त प्रकाशन विभाग, स्वातंत्र्यलढ्यातील अपरिचित सेनानी, माहित नसलेल्या लढे तसेच ईशान्य भारतातील स्वातंत्र्यसैनिक, लाल किल्ल्यामधील भारतीय लष्कराची ट्रेन, स्वातंत्र्यलढ्यात प्रसारमाध्यमांची भूमिका, असा विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित करेल. ही पुस्तके येत्या दोन वर्षात प्रकाशित केली जातील.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704122)
Visitor Counter : 423