माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनी ‘नारी शक्ती’ चा गौरव करण्यासाठी गोवा पत्र सूचना कार्यालयाकडून वेबिनारचे आयोजन
नवीन भारतातील स्त्रिया आपल्या अंतर्मनातील आवाजाचा वेध घेऊन नवीन उंची गाठू शकतील : डॉ. प्रतिभा, नारी शक्ती पारितोषिक विजेत्या सामाजिक शास्त्रज्ञ
बदल घडवून आणण्यासाठी स्त्रियांनी धोरणप्रक्रियेत महत्वाच्या स्थानी असणे आवश्यक : दिव्या कपूर, उद्योजिका
Posted On:
08 MAR 2021 4:41PM by PIB Mumbai
पणजी, 8 मार्च 2021
गोवा पत्र सूचना कार्यालय आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो (ROB), महाराष्ट्र व गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी ‘नारी शक्ती’ साजरी करण्यासाठी एका वेबिनारचे आयोजन केले होते. नारीशक्ती परितोषिक विजेत्या आणि सामाजिक शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा तसेच उद्योजिका दिव्या कपूर यांनी ‘नेतृत्व करणाऱ्या स्त्रिया’ या विषयावर आपले विचार मांडले.
अगदी मूलभूत पातळीवर काम करणाऱ्या डॉ. प्रतिभा यांनी समाजातील स्त्रियांबद्दल आपले अनुभव सांगितले. समाजात अगदी योग्य समतोल संस्कृती असण्याची आवश्यकता आहे असे त्या म्हणाल्या. अडचणी मोडून काढण्यासाठी स्त्रीने स्वतःच्या मर्यादांवर मात करत मुक्त व्हावे, स्वतःच्या अंतर्मनातला आवाज ऐकावा आणि स्वतःवर प्रेम करावे, असे आवाहन त्यांनी स्त्रियांना केले. संघर्ष कमी झाला आहे मात्र तो संपलेला नाही. बदल स्त्रियांकडे झुकता हवा असे त्या म्हणाल्या.
गोवा राज्याच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, गोव्यात अत्यंत सुरक्षित कार्यानुकुल वातावरण आहे. गोवा हे पर्यटन स्थळ आहे, सरकार मदतीला तत्पर आहे, अशावेळी अधिकाधिक नव उद्योजिकांनी नवनवीन कल्पनांसह पुढे यायला हवे, असेही त्यांनी सांगीतले.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील विविध व्यवसायांमध्ये स्त्रियांचा सहभाग ठळकपणे उठून दिसतो आहे, तरीही काही संस्थांमध्ये समान लिंग गुणोत्तराचा अभाव दिसतो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे डॉ. प्रतिभा यांनी नमूद केले. आत्ताच्या भारतीय स्त्रिया भारताला नव्या उंचीवर नेतील, अशी आशा त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना व्यक्त केली.
स्त्रियांनी धोरणकर्त्या या स्तरावर काम करायला हवे. निर्णयकर्त्या या भूमिकेतील स्त्रिया अधिक समानता आणू शकतील, ज्यामुळे अधिक समतोल साधला जाईल, असे उद्योजिका दिव्या कपूर यांनी आपले विचार मांडताना सांगितले. तरुण महिला उद्योजकांनी आपले।ध्येय आणि प्राधान्य यांचा वेध घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. नवउद्योजक म्हणून नवनवीन आव्हाने स्वीकारणाऱ्या तरुण पिढीचे त्यांनी कौतुक केले.
जगातील जास्तीत जास्त कार्यबलाच्या मागे स्त्रियांचे महत्वाचे बळ लागत असते. काही जणी अडचणींवर मात करण्यात यशस्वी होतातही पण अधिक समानता येण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
उपसंचालक डी.व्ही विनोदकुमार यांनी आमंत्रितांचे स्वागत केले आणि वेबीनारमागील संकल्पना विशद केली, तसेच कोविड महामारीदरम्यान स्त्रियांच्या खांद्यावरील ओझे कसे वाढले यावर विचार मांडले. ऑल इंडिया रेडिओच्या ऑरिना वाझ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703212)
Visitor Counter : 188