पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद
देशातल्या लोकांनी बनविलेल्या वस्तूंचा अभिमान वाटणं ही आत्मनिर्भरतेची पहिली अट असते : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
28 FEB 2021 2:25PM by PIB Mumbai
मुंबई, 28 फेब्रुवारी 2021
आपल्या देशाच्या वस्तूंविषयी, मालाविषयी अभिमान बाळगणे. आपल्या देशातल्या लोकांनी बनविलेल्या वस्तूंचा अभिमान वाटणं आत्मनिर्भरतेची पहिली अट असते. ज्यावेळी प्रत्येक देशवासीयाला असा अभिमान वाटेल आणि तो त्या वस्तूशी जोडला जाईल तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनेल. तेव्हा हे एक आर्थिक अभियान राहणार नाही तर ते एक राष्ट्रीय चैतन्य बनेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते आज आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते.
संरक्षण साहित्य, मेट्रो कोच आदीची भारतात निर्मिती अशा मोठ-मोठ्या गोष्टींमुळेच भारताला आत्मनिर्भरता येईल असे नाही तर भारतामध्ये बनणारे कापड, भारतातल्या प्रतिभावंत कारागिरांनी बनविलेल्या हस्तकलेच्या वस्तू, भारतातली इलेक्ट्रॉनिक उपकरणं, भारतात बनणारे मोबाइल, प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपल्याला गौरव वाढवायचा आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.
ज्यावेळी आपण असा विचार करून पुढची वाटचाल करणार आहोत, त्याचवेळी ख-या अर्थाने देश आत्मनिर्भर बनणार आहे. आणि आत्मनिर्भर भारताचा हा मंत्र, देशातल्या गावां-गावांमध्ये पोहोचतोय, याचा मला आनंद होत आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाचे महत्व आणि गरज यावर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले, ''पाण्याच्या बाबतीत आपण आपली सामूहिक जबाबदारी जाणून घेतली पाहिजे. भारताच्या बहुतांश भागामध्ये मे-जूनमध्ये पावसाला प्रारंभ होतो. आपल्या परिसरातल्या जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यासाठी आणि येणा-या पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी, आपण सर्वजण आत्तापासूनच 100 दिवसांचं एखादं अभियान सुरू करू शकतो का? हाच विचार करून आता काही दिवसांतच जलशक्ती मंत्रालयाच्यावतीन जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ सुरू करण्यात येणार आहे.’’ ‘‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’’ हा या अभियानाचा मूलमंत्र आहे असे सांगत पंतप्रधानांनी या मोहिमेसाठी आत्तापासूनच काम सुरू करण्याचे आवाहन केले. देशात आधीपासूनच रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम आहेत, त्यांची दुरूस्ती करून घेणे, गावांची, तलावांची, पोखर, वाव यांची स्वच्छता करून घेणे. जलस्त्रोतांपर्यंत जात असलेल्या पाण्यामध्ये जर कुठे अडथळा येत असेल, तर तो दूर करणे आणि जास्तीत जास्त पावसाच्या पाण्याचा संचय कसा होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भारताचे महान वैज्ञानिक, डॉक्टर सी.व्ही. रमण यांनी शोधून काढलेल्या ‘रमण इफेक्ट’ला निमित्त आज ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जात आहे असे मोदी यांनी सांगितले आणि त्यानिमित्त विविध देशवासीयांनी त्यांच्याशी याविषयी साधलेल्या संवादाची माहिती सामायिक केली.
ते म्हणाले ,’’केरळच्या योगेश्वरन यांनी ‘नमोॲप’वर लिहिलं आहे की, रमण इफेक्टच्या शोधामुळं संपूर्ण विज्ञानाची दिशाच बदलली गेली होती. तर यासंबंधित एक खूप चांगला संदेश नाशिकच्या स्नेहीलजी यांनीही पाठवला आहे. स्नेहीलजी यांनी लिहिलं आहे की, आपल्या देशात अगणित संशोधक आहेत, त्यांनी दिलेल्या योगदानाशिवाय विज्ञानामध्ये इतकी प्रगती झाली नसती. आपल्याला दुनियेतल्या इतर वैज्ञानिकांची माहिती असते, तशीच आपण भारतातल्या संशोधकांची माहितीही जाणून घेतली पाहिजे.
‘मन की बात’च्या या श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या मताशी मीही सहमत आहे असे सांगत पंतप्रधानांनी युवकांना भारतातल्या संशोधकांचा इतिहास, वैज्ञानिकांनी केलेलं कार्य याविषयी माहिती वाचून, त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावे असे आवाहन केले.
‘आत्मनिर्भर भारत अभियान’ मध्ये विज्ञानाच्या शक्तीचे खूप जास्त योगदानही आहे. विज्ञानाला ‘लॅब टू लँड’ म्हणजेच ‘प्रयोगशाळेपासून ते भूमीपर्यंत’ नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आजच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विविध व्यक्तींनी नवसंकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या अभिनव प्रयन्तांची माहिती दिली त्यापकी एक आहेत, रेड्डी जी शेतकरी आहेत. यांच्या एका डॉक्टर मित्रानं त्यांना एकदा ‘विटामिन-डी’ च्या कमतरतेमुळं होणारे आजार आणि त्याचे धोके, यांच्याविषयी माहिती दिली असता त्यांनी या समस्येवर उपाय योजना म्हणून गहू, तांदूळ या पिकांचे ‘विटामीन-डी’ युक्त वाण विकसित केलं. याच महिन्यामध्ये जिनिव्हाच्या ‘जागतिक बौद्धिक संपदा संघटनेकडून रेड्डी यांना, त्यांनी विकसित केलेल्या पिकांच्या वाणांचे बौद्धिक स्वामित्वही मिळालं आहे.
अशाच अनेक नवसंकल्पना प्रत्यक्षात आणून लडाखचे उरगेन फुत्सौग काम करीत आहेत असे सांगत पंतप्रधान म्हणाले की, उरगेनजी लदाख सारख्या अति उंचीवरील प्रदेशात सेंद्रीय पद्धतीने शेती करून जवळपास 20 प्रकारची पिके घेतात.
सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना ते मोफत प्रशिक्षण देणाऱ्या ओडिशाच्या अरखुडा मध्ये राहणाऱ्या सिलू नायक यांच्या कार्याची माहितीही आज पंतप्रधानांनी आज सांगितली. महागुरु बटालियन या संघटनेच्या माध्यमातून नायक सर इथे तरुणांना शारीरिक स्वास्थ्यापासून ते मुलाखती पर्यंत आणि लेखनापासून ते प्रशिक्षणा पर्यंत सर्व गोष्टींचे प्रशिक्षण मोफत देतात आतापर्यंत त्यांनी ज्या लोकांना प्रशिक्षण दिले आहे त्यांची सैन्य, नौदल, हवाई दल, सीआरपीएफ, बीएसएफ सारख्या दलांमध्ये निवड झाली आहे.
देशातील विविध क्रीडाप्रकाराना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की ,’’ज्या खेळांचे समालोचन उत्तम प्रकारे केले जाते त्या खेळांचा प्रचार खूप वेगाने होते हे लक्षात घेतले पाहिजे.'' अनेक भारतीय खेळ आहेत ज्यांच्यासाठी समालोचन केले जात नाही यामुळे हे खेळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत असे सांगत पंतप्रधानांनी वेगवेगळे खेळ विशेषत: भारतीय क्रीडा प्रकारांचे समालोचन जास्तीत जास्त भाषांमध्ये व्हावे यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे असे सांगितले. क्रीडा मंत्रालय आणि खासगी संस्थेच्या सहकाऱ्याना याबद्दल विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
* * *
Jaydevi PS/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701500)
Visitor Counter : 134