विशेष सेवा आणि लेख

क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी : स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी  मॅमोग्राफीला एक महिला-स्नेही पर्याय


क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी ही स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्याची सर्वात सोयीची चाचणी  पद्धत असल्याचे भारतीय शास्त्रज्ञांच्या 20 वर्षांच्या महत्त्वपूर्ण अभ्यासाचा निष्कर्ष

Posted On: 25 FEB 2021 10:42PM by PIB Mumbai

मुंबई, 25 फेब्रुवारी 2021

 

मुंबईतल्या टाटा मेमोरियल रुग्णालयाने  (टीएमसी) केलेल्या  20 वर्षांच्या महत्त्वाच्या अभ्यासातून  हे सिद्ध केले आहे की स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी आणि निदान करण्यासाठी क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी हा मॅमोग्राफीऐवजी एक  महिला -स्नेही आणि किफायतशीर पर्याय आहे. टीएमसी अर्थात टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक आणि या अभ्यासाचे सह-लेखक डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले, “भारतात स्तन चाचणीसाठी ही  पद्धत लागू केल्यास  दरवर्षी स्तनांच्या कर्करोगामुळे होणारे 15 हजार मृत्यू  वाचवता येतील आणि जगभरातलय अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 40 हजार  जीव  वाचू शकतील  यासाठी अगदी अत्यल्प खर्च येतो  त्यामुळे आरोग्यसेवेवरील  ताण कमी होईल.”

अभ्यासाच्या निष्कर्षांवर चर्चा करण्यासाठी टीएमसी, मुंबई येथे येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. बडवे बोलत होते.

स्तनाचा कर्करोग हा जागतिक स्तरावर आणि भारतातही  स्त्रियांमध्ये सर्वाधिक होणारा    कर्करोग आहे. जगातील सर्व देशांमध्ये विशेषत: अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये (एलएमआयसी) स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे.  मुंबईत1992 ते 2016 दरम्यान स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जवळपास ४० टक्क्याने वाढले आहे आणि स्तनाचा कर्करोग भारतात कर्करोगाने मृत्यू होण्याचे मुख्य कारण बनले आहे.

अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मध्ये स्तनाचा कर्करोग हा मुख्यतः प्रगत अवस्थेत निदान  होतो आणि यामुळे स्तनांच्या कर्करोगामुळे जगात निम्म्याहून अधिक मृत्यू या देशांमध्ये होतात. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी मेमोग्राफी ही एक मानक चाचणी प्रणाली आहे जी पाश्चात्य जगात मोठ्या प्रमाणात वापरली जाते.  स्तन-कर्करोगामुळे हणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात स्वत: स्तन तपासणी करणे प्रभावी असल्याचे दिसून आले नाही. टीएमसीच्या अभ्यासानुसार क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी एक प्रभावी तंत्र  आहे जी अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना उपयुक्त ठरणारी आहे कारण ती मॅमोग्राफीच्या तुलनेत किफायतशीर आहे.

हा अभ्यास करताना  महिलांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. त्यापैकी  स्क्रीनिंग गटामधील 75,360 महिलांना प्रशिक्षित महिला प्राथमिक आरोग्य कर्मचारी आणि कर्करोग जागरूकता माहितीद्वारे क्लिनिकल ब्रेस्ट चाचणीच्या दर दोन वर्षांनी एक अशा चार चाचण्या करण्यात आल्या आणि त्यानंतर दर दोन वर्षांनी घरी भेट देण्यात येऊन त्याच्या पाच चाचण्या केल्यागेल्या .

कंट्रोल या दुसर्या गटामधील आणखी,76,178  महिलांना कर्करोग या आजाराबाबत  जागरूक केले गेले  आणि ही जनजागृती दर दोन वर्षांनी अशी आठ वेळा केली गेली.  या दोन्ही गटातील सहभागी टाटा मेमोरियल रुग्णालयात विनामूल्य निदान, मूल्यांकन आणि उपचारांसाठी पात्र होते.

कंट्रोल गट (55 वि  57 वर्षे) च्या तुलनेत स्क्रीनिंग गटामध्ये वयाच्या आधीच्या टप्प्यात  स्तनाचा कर्करोगाचे निदान झाले.  ज्यामध्ये अधिक प्रगत अवस्थेतील (III किंवा IV) रोग (37%  च्या तुलनेत 47%) स्त्रियांचे प्रमाण कमी होते.जे  डाउन-स्टेजिंग म्हणून ओळखले जाते.  50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यूच्या प्रमाणात 30% घट झाल्याचे अभ्यासाच्या निष्कर्षात  दिसून आले आहे. मृत्यूत घट होण्याचे हे प्रमाण मॅमोग्राफी प्रमाणेच आहे. या अभ्यासानुसार 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रियांमध्ये कोणताही लाभ झालेला नाही, जर त्यांनी नियमितपणे तपासणीच्या चारही फेऱ्या केल्या असतील तर या स्त्रियांच्या मृत्यूदरात  34% घट आढळली आहे.

स्तन कर्करोगाच्या तपासणीसाठी मॅमोग्राफीचा वापर करण्यासाठी महाग यंत्रसामग्री, उच्च प्रशिक्षित रेडिओलॉजिस्ट आणि रेडिओग्राफर्स आणि उच्च दर्जाचे नियंत्रण आवश्यक आहे. मात्र  भारत आपल्या सर्व महिलांसाठी मॅमोग्राफीद्वारे मोठ्या प्रमाणात चाचण्या  घेऊ शकत नाही. दुसरीकडे सीबीई ही कमी खर्चाची, तांत्रिकदृष्ट्या सोपी, महिला-स्नेही  आणि एक स्पर्श-संवेदनशील प्रक्रिया आहे.

या अभ्यासाचे वैशिष्ट्य म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा कामगारांचा सहभाग ज्यांची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण एवढीच  होती. टीएमसी सर्जन डॉ. वाणी परमार यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीला सीबीई प्रक्रिया करण्यासाठी प्रशिक्षण दिले. प्रतिबंधात्मक ऑन्कोलॉजीच्या  प्राध्यापक डॉ. गौरवी मिश्रा या अभ्यासाच्या  सह-संशोधक  आहेत आणि सुरुवातीच्या काळापासून या अभ्यासाशी संबंधित आहेत आणि हा त्यांचा आजवरचा मोठा संशोधन प्रकल्प म्हणून यांचा उल्लेख करतात. “डॉ. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार हे एक अत्यंत जटिल कार्य आहे. यामध्ये मुंबईच्या विविध भागात विखुरलेल्या दीड लाख  सहभागींचा शोध घेणे, त्यांची नोंद  ठेवणे, दोन दशकांहून अधिक काळ स्क्रिनिंगसाठी आणि देखरेखीसाठी समुपदेशन करणे यांचा समावेश होता.

टाटा मेमोरियल सेंटरचे सर्जन डॉ. इंद्रनील मित्र यांच्या नेतृत्वाखाली या  अभ्यासकांच्या पथकाने वीस वर्ष अभ्यास केला. सध्याची प्रत्यक्ष चाचणी 1998 मध्ये सुरू केली गेली होती ज्यामध्ये मुंबई शहरातील 20 क्लस्टर्समधील 35-64 वयोगटातील 151,538 महिलांचा समावेश होता.

लिंक : https://www.bmj.com/content/bmj/372/bmj.n256.full.pdf

ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग मुंबई अभ्यासावरील शॉर्ट व्हिडिओसाठी लिंकः

https://tmc.gov.in/tmh/components/com_jumi/files/video/ad5_video.php

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1700941) Visitor Counter : 426


Read this release in: English