कृषी मंत्रालय

उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशचे मंत्रीही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या द्विवर्षपूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन


पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे कोट्यावधी शेतकऱ्यांना घरबसल्या लाभ मिळत आहे पीएम-किसान योजनेचा लाभ

उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशचे मंत्रीही झाले सहभागी

Posted On: 24 FEB 2021 7:51PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या यशस्वी द्विवर्षपूर्ती निमित्त केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले होते. गाव-गरीब-शेतकरी यांचा विचार करणारे तसेच समग्र व समतोल विकासाची कल्पना प्रत्यक्षात राबविणारे सरकार हेच उत्तम सरकार असते असे तोमर यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील कोट्यावधी शेतकर्‍यांना घरबसल्या पीएम-किसान योजनेचा लाभ मिळत आहे, ही योजना भारताच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. सुमारे पावणे 11 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारांनी यासाठी अभियान राबवावे असे आवाहन तोमर यांनी यावेळी केले.

नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री  कैलाश चौधरी तसेच उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशचे कृषीमंत्री उपस्थित होते. तोमर यांनी विविध विभागांमध्ये राज्ये / जिल्ह्यांना पुरस्कारांचे वितरण केले.

केंद्रीय मंत्री तोमर यांनी यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले तसेच सामान्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वृद्धिंगत करणाऱ्या व चांगल्या, अर्थपूर्ण योजनेबद्दल पंतप्रधान  मोदी यांचे आभार मानले. फक्त दोन वर्षांच्या कालावधीत 10.75 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांची ओळख पटवून त्यांना 1.15 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे हस्तांतरण हे मोदी सरकारचा संकल्प व कार्यक्षमता दर्शवते असे ते म्हणाले .

या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये राज्यांनी चांगली भूमिका बजावली आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. कोरोनासारख्या संकटग्रस्त परिस्थितीतही शेतकऱ्यांचे अथक परिश्रम आणि सरकारच्या शेतकरी अनुकूल धोरणांमुळे कृषी क्षेत्राची प्रगती झाली आहे असे तोमर यांनी यावेळी सांगितले.

पुरस्कार सोहळ्यात कर्नाटक राज्याला आधार प्रमाणन लाभार्थ्यांना सर्वाधिक टक्केवारी प्राप्त करण्यासंदर्भातील श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आला.  पडताळणी आणि तक्रार निवारण क्षेत्रात उत्तम कामगिरीच्या श्रेणीत महाराष्ट्राला गौरविण्यात आले. विविध श्रेणीत राज्यामध्ये   चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना आधार प्रमाणीकरण श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच  पीएम -किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देखील गौरविण्यात  आले.

तक्रार निवारण श्रेणीत  महाराष्ट्रातील पुणे, गुजरातमधील दाहोद आणि आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्हा यांना, तर ईशान्य / डोंगराळ प्रदेश श्रेणीसाठी  उत्तराखंडचा नैनीताल जिल्हा तसेच हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्हा यांना सन्मानित करण्यात आले. भौतिक पडताळणी श्रेणीत महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा, आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्हा आणि बिहारमधील औरंगाबाद जिल्हा यांना पुरस्कृत करण्यात आले.

 

 

Jaydevi PS/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1700566) Visitor Counter : 86


Read this release in: Hindi