सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अली यावर जंग राष्ट्रीय संस्थेच्या नवीन वसतिगृह इमारतीचे केंद्रीय मंत्री थावर चंद गेहलोत यांच्या हस्ते भूमीपूजन
Posted On:
18 FEB 2021 3:23PM by PIB Mumbai
मुंबई, 18 फेब्रुवारी 2021
केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत असा पुनरुच्चार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांनी आज केला. मुंबईत अली यावर जंग नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ स्पीच ॲन्ड हिअरिंग डिसॲबिलीटीच्या नवीन वसतिगृह इमारतीचा भूमीपूजन सोहळा आज गेहलोत यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. येत्या वर्षभरात (निर्धारीत वेळेत) या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशभरातून या संस्थेत शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहामुळे मोठा लाभ होईल असे ते म्हणाले. मुंबई सारख्या शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय उपलब्ध होणे अतिशय महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गेहलोत यांनी यावेळी दिली.

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील अली यावर जंग राष्ट्रीय संस्थेच्या प्रांगणातच दिव्यांगांना सुलभ अशी ही वसतिगृह इमारत बांधली जाणार आहे. या बांधकामाचा खर्च वीस कोटी इतका अपेक्षित आहे. आठ मजल्यांच्या या इमारती मध्ये 70 खोल्या असतील,ज्यामध्ये शौचालय तसेच कॅन्टीन सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या इमारतीमुळे दिव्यांगांना सुलभ अशी निवासी सुविधा उपलब्ध होणार आहे. सुमारे दीडशे विद्यार्थी या निवासी सुविधेचा लाभ घेऊ शकतील. सुविधेमुळे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मेसर्स आर के आर कन्स्ट्रक्शन मार्फत हे बांधकाम केले जाणार आहे.

डॉ. योगेश दुबे, आमदार आशिष शेलार, सी पी डब्ल्यू डी चे मुख्य अभियंता एल. डुंग डुंग, संस्थेच्या संचालक डॉ. सोनी मॅथ्यू आदी मान्यवरांच्या यावेळी उपस्थित होते.




R.Tidke/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699030)
Visitor Counter : 190