माहिती आणि प्रसारण मंत्रालय

जयशंकर दानवे यांच्याकडील दुर्मिळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त

Posted On: 18 FEB 2021 2:57PM by PIB Mumbai

पुणे, 18 फेब्रुवारी

सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक कै. जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मिळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे. दानवे यांच्या कुटुंबीयांनी नुकताच कोल्हापूर येथे हा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केला.  मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारे जयशंकर दानवे हे प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक होते. पुण्यात जन्मलेले दानवे यांनी अगदी सुरुवातीला मराठी आणि उर्दू नाटकांमध्ये कामे केली आणि त्यानंतर १९३०च्या सुमारास कोल्हापूर येथे चित्रपटमहर्षी भालजी पेंढारकर यांच्याकडे सहदिग्दर्शक म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. आपल्या पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत दानवे यांनी असंख्य मराठी  चित्रपट आणि नाटकांमधून  कामे केली.

सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांच्या 'सावकारी पाश' (1936) तसेच भालजी पेंढारकर यांच्या 'सासुरवास '(1946), 'मीठभाकर' (1949), 'मोहित्यांची मंजुळा ' (1963), 'मराठा तितुका मेळवावा' (1964) आणि दादा कोंडके यांच्या ' आंधळा मारतो डोळा' (1973) आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या होत्या. 1935 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'असिरे हवीश' या उर्दू चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 1930 आणि 1940च्या दशकांत त्यांनी अनेक हिंदी आणि उर्दू चित्रपटांतून कामे केली. 'सच हैं' या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली होती. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर या दोघांचीही भूमिका असलेल्या 'वाल्मिकी' (1946) या चित्रपटातही दानवे यांनी काम केले होते. याशिवाय 'जय भवानी' (1947), 'फुलपाखरू' (1953 ), 'ईश्वरी न्याय' (1953) आदी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते.

दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहात असंख्य दुर्मिळ छायाचित्रे, हॅंडबिल्स, गाण्यांच्या पुस्तिका, वृत्तपत्रीय कात्रणे, त्यांच्यावर आलेले लेख, जुनी कागदपत्रे, अनेक पुस्तके, त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेली काही नाटके तसेच ते काम करीत असलेल्या हॅम्लेट (1933) या नाटकातील काही विग्स, मिशा आदी वस्तूंचाही समावेश आहे. त्यांच्या संग्रहातील छायाचित्रे प्रामुख्याने कृष्णधवल असून सुमारे 250 छायाचित्रे दानवे यांनी अभिनित केलेल्या चित्रपट आणि नाटकांमधील आहेत. याशिवाय त्यांच्या समकालीन इतर अभिनेत्यांची 51 छायाचित्रे आहेत. याशिवाय त्यांनी भूमिका केलेल्या चित्रपटआणि नाटकातील 15 बाय 12 आकाराच्या सुमारे चाळीस मोठ्या फ्रेम्सही आहेत.

दानवे कुटुंबीयांनी मोठ्या परिश्रमाने जतन करून  ठेवलेला हा दुर्मिळ संग्रह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम म्हणाले की, भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगा तील  एका ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शकाचा हा संग्रह मिळाल्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिना आणखी समृद्ध झाला असून त्याचा संशोधकांना खूप उपयोग होणार आहे, दानवे यांच्या कुटुंबीयांकडून प्रेरणा घेऊन इतरांनीही आपल्याकडील असाच दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

 

Jaydevi PS/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1699023) Visitor Counter : 157