माहिती आणि प्रसारण मंत्रालय

कोविड लसीकरण मोहीम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ


या मोहिमेद्वारे अंत्योदयाचे उद्दिष्ट पूर्ण होईल- डॉ प्रमोद सावंत

गोव्यातील 600 ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार- संतोष अजमेरा, संचालक आरओबी

सीएससीच्या ई-प्रशासकीय सेवा आता आपल्या दारी उपलब्ध होणार

Posted On: 12 FEB 2021 4:42PM by PIB Mumbai

पणजी, 12 फेब्रुवारी 2021

कोविड लसीकरण मोहीम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा आज गोव्यात, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील क्षेत्रीय  लोकसंपर्क विभाग, गोवा यांच्या वतीने  ही मोहीम सुरु केली आहे.

जेव्हा संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत संघर्ष करत आहे, अशावेळी भारतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविड लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना लस दिली जात आहे. गोव्यात आतापर्यंत 9,200 आरोग्य कर्मचारी आणि 2,000 कोरोनायोद्ध्यांना लस देण्यात आली, असे डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले.

यासारख्या जनजागृती मोहिमेमुळे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. सरकारचा अंत्योदयाचा दृष्टीकोन यामुळे प्रत्यक्षात साध्य होऊ शकेल केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे लसीकरणाबाबत पसरवल्या जात असलेल्या सर्व अफवा आणि गैरसमजांपासून लोकांना दूर ठेवता येईल, असेही सावंत म्हणाले. आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा या अभियानामुळे 19 डिसेंबर 2021 पर्यंत गोवा स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत प्रत्येक शनिवारी ‘स्वयंपूर्ण मित्र’ उपस्थित राहून लोकांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती डॉ सावंत यांनी दिली.

प्रादेशिक लोकसंपर्क विभाग, महाराष्ट्र आणि गोव्याचे संचालक संतोष अजमेरा यांनी यावेळी या अभियानाविषयी माहिती दिली. राज्यातल्या 600 जागांवर ही मोहीम राबवली जाईल असे त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ या मोहिमेच्या परिणामांचा अभ्यास करत असून ते भारत सरकारकडे आपला अहवाल सादर करणार आहेत असे त्यांनी सांगितले.

फिल्ड आऊटरिच ब्युरो- क्षेत्रीय  लोकसंपर्क  विभाग ही प्रादेशिक लोकसंपर्क विभाग- आरओबीची शाखा असून आरओबीचे मुख्यालय पुणे येथे आहे. आरओबी द्वारे संपूर्ण महराष्ट्र आणि गोव्यात अनेक जनजागृती मोहिमा राबवल्या जात असून त्या माध्यमातून लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर करुन , लसीची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेविषयी माहिती दिली जाते. या लसीकरणाच्या दुष्परिणामांबाबत लोकांच्या मनात असलेली भीती आणि शंकाकुशंका दूर करण्याचाही या मोहिमेचा उद्देश आहे. या अंतर्गत 800 स्थानिक कलाकार, आपल्या 11,400 सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत.

याच मोहिमेत आत्मनिर्भर अभियानाविषयीही जनजागृती केली जाणार आहे. या अंतर्गत, गोवेकरांना विविध योजना, त्यातील संधी, केंद्र सरकारची धोरणे- ज्यात कौशल्य विकास, स्वयंरोजगार, व्होकल फॉर लोकलचे महत्व इत्यादींची माहिती दिली जाणार आहे.

ही मोहीम मोबाईल प्रदर्शनी व्हॅन अशा  फिरत्या चित्ररथातून चालवली जाणार आहे. सर्व डिजिटल  साधने आणि साहित्यांनी सजलेला हा चित्ररथ दक्षिण आणि उत्तर गोव्यात प्रवास करेल. प्रत्येक व्हॅन दररोज 30-40 किलोमीटरचा प्रवास करुन एका जिल्ह्यातल्या 8 ते 10 गावांना भेट देईल.

प्रत्येक व्हॅनमध्ये 5 ते 6 जणांचा एक चमू असेल जो त्या त्या स्थळी लोककला आणि लोकगीतांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत जनजागृती करेल.

या मनोरंजन आधारित प्रबोधनासोबतच प्रदर्शन व्हॅनमध्ये सामाईक सेवा केंद्र-सीएससीच्या विविध सेवाही उपलब्ध असतील. माहिती तंत्रज्ञान विभागच्या सहकार्याने या सेवा, ग्रामीण भागातील ग्राहकांना थेट पुरवल्या जातील. यात आवेदन पत्रे भरणे, प्रमाणपत्रे, आणि वीज-फोन-पाणी बील भरण्याची सुविधा असेल. सरकारच्या सार्वत्रिक नागरी सेवांशिवाय, सामाईक सेवा केंद्रांतून कृषी, शिक्षण आणि प्रशिक्षण, आरोग्य, ग्रामीण बँकिंग आणि विमा अशा सुविधाही पुरवल्या जात आहेत.

सामाईक सेवा केंद्र  ही संपूर्ण देशव्यापी सेवा असून त्याआधारे देशातल्या विविध भागात प्रादेशिक, भूगोलीय तसेच सांस्कृतिक विविधतेनुसार स्थानिक नागरिकांना शासनाकडून आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण करण्याचे ते एक माध्यम आहे. या केंद्रांमुळे समाजात वित्तीय आणि डिजिटल समानता आणण्यासाठी, वित्तीय आणि डिजिटल व्यवहार यात एकात्मता आणण्यासाठी मदत होते.

या व्हॅनचा प्रवास, त्यांची हालचाल याकडे जीपीएस द्वारे लक्ष ठेवले जाईल. आत्मनिर्भर भारत पोर्टल उपलब्ध व्हावे यासाठी सर्वसामान्यांना QR कोडचे प्रिंटआउट कार्ड दिले जातील.

गोव्याच्या माहिती तंत्रज्ञान विभाग संचालक अंकिता आनंद,माहिती आणि प्रसारण विभगाचे उपसंचालक विनोद कुमार, दूरदर्शनचे उपसंचालक रविराज सरतापे आणि आकाशवाणीचे सहायक संचालक तुषार जाधव यावेळी उपस्थित होते.

 

Jaydevi P.S/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1697392) Visitor Counter : 650


Read this release in: English