नौवहन मंत्रालय

जेएनपीटीने हरीत बंदर उपक्रमाचा एक भाग म्हणून एकात्मिक घनकचरा व्यवस्थापनाला केला आरंभ

Posted On: 09 FEB 2021 7:09PM by PIB Mumbai

मुंबई, 9 फेब्रुवारी 2021

 

हरीत बंदर उपक्रमाला चालना देण्यासाठी आणि शाश्वत लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वसाहतीत जेएनपीटीचे अध्यक्ष राजीव सेठी यांनी दिनांक 9 फेब्रुवारी 2021 रोजी उद्‌घाटन केले.

हा नवीन प्रकल्प भाभा अणू विज्ञान संशोधन संस्थेच्या तंत्रज्ञानावर आधारीत असून त्यात 2016 च्या घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार 10 मेट्रिक टन प्रतिदिन कचऱ्याचे व्यवस्थापन करता येईल अशी रचना केली आहे.हा 5 मेट्रिक टन प्रतिदिन बायोगॅस प्लॅंटच्या क्षमतेवर आधारीत असून त्यातून बायोगॅस आधारीत वीजनिर्मिती आणि बायोगॅस उत्पादन करता येईल. तसेच यात सुका कचरा दाबण्यासाठी हायड्रॉलिक बेलिंग यंत्र असून त्यात सुका आणि ओला कचरा याचे वेगळे संकलन करण्यासाठी दोन विभाजकांसह घंटागाड्या आहेत तसेच वापरकर्त्यांना नियोजित घनकचरा संकलन एकत्रितपणे करण्यासाठी प्रशिक्षिण देणारी उपकरणे आहेत.

स्वच्छ भारत मिशन ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना असून देशभरात सर्वांना आरोग्य, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता सुनिश्चित करणे हा त्याच्या मूलभूत उद्देश असून विविध सहयोगी संस्थांच्या मदतीने स्वच्छ भारत हे ध्येय गाठण्यासाठी त्याची चौकट आखली आहे.आधुनिक पध्दतीने घनकचरा व्यवस्थापन आणि त्याची विल्हेवाट लावण्याची सुविधा हे त्याच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे.

या उद्‌घाटन प्रसंगी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ,आणि इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जेएनपीटी बद्दल:

जेएनपीटी हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणारे बंदर असून ते बंदराच्या कारभाराचा पर्यावरण आणि आसपासच्या समुदायावर कमीत कमी प्रभाव पडेल यावर सतत लक्ष ठेवत असते.पर्यावरण संवर्धनासाठी बंदराने विविध हरीत उपक्रम हाती घेतले आहेत ज्यात सौरऊर्जा, सांडपाणी पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प ,ई-आरटीजीसीज याव्यतिरिक्त पर्यावरण पूरक उद्यान, सागरी जीवांचे  संवर्धन आणि एकात्मिक वृक्षारोपण असे प्रकल्पही विकसित केले आहेत. बंदर क्षेत्रातील ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी आणि कार्बनचा उपयोग कमी करण्यासाठी बंदरातील दिवे बदलून एलईडी बल्बची सुरुवात केली आहे. बंदराचे उद्दिष्ट केवळ आर्थिक कार्यक्षमता प्राप्त करणे हे नसून त्याचा केंद्रबिंदू पर्यावरण आणि सामाजिक सुरक्षितता हा देखील आहे.

सध्या जेएनपीटीचे पाच कंटेनर टर्मिनल कार्यरत आहेत : जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनरl (JNPCT),न्हावा शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल(NSICT), गेटवे टर्मिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (GTIPL), न्हावा शेवा आंतरराष्ट्रीय गेटवे टर्मिनल l(NSIGT) आणि नव्याने सुरू झालेले भारत मुंबई कंटेनर टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड (BMCTPL) बंदरात सर्वसाधारण मालवाहतूकीसाठी उथळ वॉटर बर्थ,आणि बीपिसीएल -आयओसीएल (BPCL-IOCL) यांच्या संयुक्त व्यवस्थापनाने चालविले जाणारे जल वाहतूक टर्मिनलही आहे.

 

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696583) Visitor Counter : 177


Read this release in: English