माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘अभिवादन’ कार्यक्रम
आकाशवाणी संगीत संमेलन यापुढे पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल : प्रकाश जावडेकर
Posted On:
06 FEB 2021 6:16PM by PIB Mumbai
पुणे, 6 फेब्रुवारी 2021
आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीताचा खजिना या अगोदरच जनतेसाठी खुला केला असून लवकरच तो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावा यासाठी त्याची फेररचना करण्यात येईल तसेच आकाशवाणीचे संगीत संमेलन यापुढे भारतरत्नपंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात आयोजित 'अभिवादन' कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते श्री शरद पवार, खासदार विनय सहस्रबुद्धे , पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जावडेकर पुढे म्हणाले की, संगीतातील अखेरचा शब्द असलेल्या पंडित भीमसेन जोशींनी अनेक तानसेन बनवलेच परंतु त्याच बरोबर सर्वसामान्यांना कानसेन देखील बनवले. संगीतामध्ये जीवनाला प्रेरणा देण्याची ताकद आहे. मोठमोठ्या मैफिली गाजवणारे पंडित भीमसेन जोशी मनाने अत्यंत कोमल होते आणि गरिबातल्या गरिबांसाठी देखील त्यांनी आपल्या संगीताचा खजिना उपलब्ध करून दिला. परदेशातील मैफिलीमधे गाणारे पंडितजी पुण्यातील गणेशोत्सवात छोट्या छोट्या मैफिलिंमध्ये देखील अत्यंत उत्कटतेने आणि आत्मीयतेने गायचे अशी आठवण प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितली. अटलजींच्या काळात पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न दिल्याच्या आठवणींना देखील जावडेकर यांनी यावेळी उजाळा दिला.हा संगीताचा सर्वोच्च सन्मान असून अशा कलाकारांच्या सन्मानामुळे देशाची मान उंचावते असे ते यावेळी म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी बोलताना आकाशवाणीने संगीताला घरोघरी नेल्याची आठवण करून दिली आणि दूरदर्शन नसतानादेखील संगीत प्रसारणाची धुरा आकाशवाणीने समर्थपणे सांभाळली असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना विनय सहस्त्रबुद्धे यांनी संगीताच्या सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी संगीताचे व्याकरण शुद्ध ठेवून देखील ते लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम केले असे प्रतिपादन केले.
जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या 'मोनोग्राम' चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
भीमसेनजींचे शिष्य उपेंद्र भट, आनंद भाटे यांच्या गायनाने समारंभाची शान वाढवली. प्रसिद्ध सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांच्या वादनाने या सत्राचा समारोप झाला. उद्या या कार्यक्रमाचा समारोप होईल.
MD/MI/MC/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1695825)
Visitor Counter : 110