दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

कर्करोगाच्या 100 प्रकारांपैकी 70 प्रकार टाळता येऊ शकतात यासंबधी जाणीवजागृती आवश्यक- टाटा मेमोरियल केंद्राच्या संचालकांचे प्रतिपादन

Posted On: 04 FEB 2021 10:20PM by PIB Mumbai

मुंबई, 4 फेब्रुवारी 2021

 

भारतीय टपाल खाते, मुंबई विभाग यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने कर्करोगासाठी विशेष पाकीट आज जारी केले. जागतिक कर्करोग दिन -2021 निमित्ताने या आजाराबद्दल जागृती करणे व लोकांना त्यांच्या आरोग्याला असणारा कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी सहकार्य करणे ही यामागील उद्दिष्टे.

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र ए. बडवे, मुंबई आणि  गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच. सी अगरवाल तसेच  भारतीय टपाल खात्याच्या  मुंबई विभागाच्या  पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांनी हे विशेष कव्हर जारी केले.  

कर्करोगाच्या विविध 100 प्रकारांपैकी 70 प्रकार हे टाळता येण्याजोगे असतात व या आजाराच्या या गोष्टीबाबत जागृती करणे आवश्यक आहे अशी माहिती डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली.

भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढीला  लागले आहे. हे प्रमाण शहरात एक लाख लोकसंख्येमागे 100, निमशहरी भागात एक लाख लोकसंख्येमागे 60 ते 70 तर ग्रामीण भागात 40 ते पन्नास रोगग्रस्त असे आहे. आपण शहरीकरणाची किंमत अश्या प्रकारे चुकवत असतो, असे सांगून टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक म्हणाले की, “शहरीकरणासोबत येणाऱ्या आरामदायक जीवनशैली द्वारे आपण कर्करोगाला आमंत्रण देत असतो आणि त्याला प्रतिबंध करता येउ शकतो यावर अभ्यास झालेला आहे. ”

तंबाखूसेवन आणि लठ्ठपणा या दोन बाबी या जीवघेण्या आजाराला कारणीभूत आहेत. कर्करोगग्रस्तांनी उपचारानंतरही पाच वर्षांपर्यंत नियमित तपासणी करून घेत राहणे आवश्यक असल्याचे डॉ बडवे यांनी नमूद केले

देशभरात पसरलेल्या विस्तीर्ण टपाल खात्याच्या जाळ्याचे देशातील कर्करोग उपचारामधील लक्षवेधी सहयोगाबद्दल सांगताना डॉ बडवे यांनी, पूर्वी दुर्गम व ग्रामीण भागातील रूग्ण उपचारानंतरच्या तपासणीसाठी डॉक्टरांना पत्र पाठवत असत याचा उल्लेख केला.

कर्करोगाचे निदान व तपासणी, उपचारानंतरची नियमित तपासणी  याबद्दल  टपाल खात्याच्या महाराष्ट्र विभागीय कर्मचाऱ्यांमध्ये तसेच त्यांच्या कुटुंबियांमध्ये जागृती करण्यासाठी टाटा मेमोरियलच्या सहयोगाने मोहिम सुरू करणार असल्याचे मुंबई व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल  एच. सी. अगरवाल यांनी सांगितले.  ही मोहिम मुंबईपासून सुरु होईल.

कर्करोगाशी लढा देण्यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकजूटीची भावना असणे आवश्यक असल्याचे मुंबई विभागाच्या पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमात वेगवेगळ्या वयोगटातील कर्करोगमुक्त सहभागी झाले होते. या रोगाशी झुंज घेतानाचे आपले अनुभव त्यांनी  यावेळी कथन केले.  

* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1695323) Visitor Counter : 125


Read this release in: English