पंतप्रधान कार्यालय

भारताचा कोरोनाविषयक लसीकरण कार्यक्रम जागतिक पातळीवर त्याच्या सर्वाधिक वेगामुळे गौरवला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये प्रतिपादन

Posted On: 31 JAN 2021 1:04PM by PIB Mumbai

मुंबई, 31 जानेवारी 2021

कोरोनाच्या विरोधातली भारताची  लढाई एक उदाहरण म्हणून समोर आली असतानाच भारताचा लसीकरण कार्यक्रम  ही जागतिक पातळीवर त्याच्या सर्वाधिक वेगामुळे  गौरवला जात आहे असे पंतप्रधान नानरेंद्र मोदी यांनी सांगितले. मन की  बात या आकाशवाणीवरील  कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधताना ते पुढे म्हणाले  आज भारत जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे अभिमानाची गोष्ट असून जगात सर्वाधिक वेगानं  लसीकरणही करत आहोत. केवळ 15 दिवसांमध्ये, भारतानं, आपल्या 30 लाखांहून अधिक, कोरोना योद्ध्यांचं लसीकरण केलं असून अमेरिकेसारख्या समृद्ध देशातही, या कामासाठी 18 दिवस लागले होते तर ब्रिटनला तब्बल 36 दिवस लागले होते असे त्यांनी सांगितले. भारतात बनवलेली लसदेशाच्या  आत्मनिर्भरतेची आणि  आत्मसम्मानाचंही प्रतिक असल्याचं पंतप्रधान म्हणाले . 

यंदा  भारत, आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा समारंभ- अमृतमहोत्सव सुरू करत आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना  विशेषतः युवकांना  त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल, त्यांच्या  भागातील  स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातल्या वीरगाथांबद्दल लिहिण्याचे आवाहन केले. तरूण लेखकांसाठी देशाच्या  पंचाहत्तरीनिमित्त एक उपक्रम सुरू केला जाणार असून त्याद्वारे  राज्यं आणि भाषांमधील युवा लेखकांना प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले.

देशाच्या विविध भागात राबविल्या जात असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी सांगत असताना पंतप्रधानांनी हैदराबाद इथल्या  बोयिनपल्ली भागात

भाजी मंडईशी संबंधित लोकांनी खराब झालेल्या भाजीपाल्या पासून वीज तयार करण्याच्या प्रयत्नाची तसेच हरियाणातील पंचकुला येथील  बडौत ग्रामपंचायतीनं पूर्ण गावात येणारं गलिच्छ पाणी एका ठिकाणी साठवून गाळले  आणि  हे गाळलेलं पाणी आता गावकरीसिंचनासाठी वापरत  असल्याचे उदाहरण दिले.

विविध क्षेत्रात देशातल्या महिलांचं योगदान सातत्यानं वाढतअसून  देशातल्या गावागावांमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या बदल घडवणाऱ्या  घडामोडी होत आहेत असे सांगून पंतप्रधानांनीमध्यप्रदेशातील जबलपूरजिल्ह्यातील  चिचगाव येथील आदिवासी भगिनींनी  जिथे त्या कधी कामगार म्हणून काम करत होत्या तीच राईस मिल खरेदी करून आता त्या  स्वतः  चालवत असल्याचे उदाहरण दिले आहे.

चिली देशाची राजधानी सॅन्टीयागो येथे  तीस पेक्षा जास्त योग विद्यालयं कार्यरत असून चिलीमध्ये  आंतरराष्ट्रीय योग दिवस सुद्धा मोठ्या उत्साहानं साजरा केला जात असल्याची माहिती देत पंतप्रधान म्हणाले, मला असं समजलं की चिलीतल्या हाऊस ऑफ डेप्युटीज मध्ये योग दिवसाच्या निमित्तानं खूपच उत्साहानं भारलेलं वातावरण असतं. कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वर भर देणं, प्रतिकारशक्ती वाढवणं यासाठी योगाचा होणारा चांगला उपयोग लक्षात घेऊन, इथले लोक आता योगाला पहिल्या पेक्षाही खूप जास्त महत्त्व देत आहेत. चिलीच्या संसदेनं एक प्रस्तावही संमत केला आहे त्यानुसार तिथे चार नोव्हेंबरला राष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातल्या जालना येथील  डॉक्टर स्वप्नील मंत्री आणि केरळच्या पलक्कड येथील प्रल्हाद राजगोपालन यांनी माय गव्ह या संकेतस्थळाच्या माध्यमातून  मन की बात मध्ये  रस्ते सुरक्षेविषयी चर्चा  करण्याची विनंती केल्याची माहिती देत पंतप्रधानांनी  आज देशात रस्ते सुरक्षेसाठी सरकारच्या बरोबरीनं वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत असे सांगत जीव वाचवण्यासाठी होत असलेल्या या प्रयत्नांमध्ये  सर्वांनी  सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. 

कोलकात्याच्या अपर्णा दासजी यांनी  फास्टॅग सुविधेबाबत बोलण्याचा आग्रह केला आहे.  असे सांगून पंतप्रधानांनी फास्टॅग मुळे टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी लागणारा वेळ कमी होऊन इंधनातही बचत होत आहे आणि देशाचे साधारण 21 हजार कोटी रुपये वाचत असल्याची माहिती दिली .

विविध क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या  आणि कुठेही प्रसिद्धी न मिळालेल्या अशा अप्रसिद्ध नायकांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्याची जी परंपरा देशानं काही वर्षांपूर्वी सूरू केली होती, ती, यावर्षीही कायम राखण्यात आली आहे असे सांगून पंतप्रधानानी, या लोकांबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दलमाहिती करून  घेण्याची आणि कुटुंबात त्यांच्याबद्दल चर्चा करण्याची विनंती केली.

Jaydevi P.S/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1693688) Visitor Counter : 176