संरक्षण मंत्रालय
दक्षिण कमांडचे लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांना निरोप
Posted On:
30 JAN 2021 8:46PM by PIB Mumbai
लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक , सेना पदक, विशिष्ट सेवा पदक , उद्या आपला पदभार सोडणार आहेत. त्यांची ‘व्हाइस चीफ आॅफ द आर्मी स्टाफ’ या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांना दक्षिणी कमांडकडून निरोप देण्यात आला. लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी 29 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दक्षिणी कमांडच्या कार्यकक्षेत 11 राज्ये आणि चार केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. दक्षिणी कमांडची परिचालन कार्यक्षमता वृद्धीसाठी नेमके कशा पद्धतीने आणि अधिक समन्वयाने काम करणे शक्य आहे, याविषयी लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी प्रेरणादायक विचार मांडले. त्यांच्या कार्यकाळातच कोविड-19 महामारीच्या आपत्तीला सामोरे जावे लागले होते. या काळात मोठ्या प्रमाणावी मदतकार्य करण्यात आले, तीन राज्यातल्या 27 जिल्ह्यांमध्ये गेल्यावर्षी महापुरामुळे संकट निर्माण झाले होते, त्यावेळी पुरामध्ये अडकलेल्या दहा हजारांपेक्षाही जास्त लोकांची सुटका दक्षिण कमांडच्या जवानांनी केली. तसेच जवानांसाठी नौदल आणि वायूदल अशा संयुक्त प्रशिक्षणाचा कार्यक्रमही राबविण्यात आला. कोविड आपत्ती असतानाही राज्यात कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी निरंतर सज्ज राहून कार्य केल्याचेही लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक राज्यातल्या नागरी प्रशासनाबरोबर आणि पोलिस खात्याशी उत्कृष्ट संबंध ठेवून मदतकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
नियमित कामकाजाव्यतिरिक्त अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले भूमीविषयक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी विविध नागरी संघटना आणि संरक्षण दल यांच्यामध्ये समन्वय साधून प्रश्नांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने काम करण्यात आले. शिक्षण, शिस्त आणि वैद्यकीय सेवा यासारख्या प्रशासकीय विषयांवरही भर देण्यात आला. यामध्ये शाळा, व्यावसायिक महाविद्यालये आणि रुग्णालये यांचा समावेश करून विकास करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. पुण्यातल्या लष्करी विधी महाविद्यालय आणि लष्करी तंत्रज्ञान संस्था यांच्या कामात सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. आरोग्य विषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले. यामध्ये अत्याधुनिक मल्टी-स्पेशलिटी रूग्णालयाचा प्रकल्प पूर्ण झाले असून आणि आता त्यांची सेवा सुरू झाल्यामुळे वैद्यकीय गरजांची पूर्तता होत आहे.

दक्षिणी कमांड आर्मी वाईफ वेलफेअर असोसिएशनच्या (एडब्ल्यूडब्ल्यूए) अध्यक्ष म्हणून श्रीमती मामून मोहंती कार्यरत असून कमांडमधील जवानांच्या कुटुंबियांसाठी कल्याण कार्य करीत असल्याचेही लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी नमूद केले. सैनिकांच्या पत्नींचे कौशल्य विकसन, त्यांना पायाभूत सुविधा देणे आणि सुधारणा घडवून आणणे यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. तसेच दिव्यांग मुलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ‘‘उत्कर्ष’’ मंचाच्या माध्यमातून व्यायामशाळा, मुलांची क्रीडाक्षेत्र, आणि कुटुंबियांसाठी बहुउपयोगी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
पुणे छावणीच्या सर्व विभागांच्या वतीने लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती आणि मामून मोहंती यांना आज सन्माननीय निरोप देण्यात आला.
M.Iyengar/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1693639)
अभ्यागत कक्ष : 150