संरक्षण मंत्रालय

पुण्यातील नूतनीकृत राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे लोकार्पण

Posted On: 29 JAN 2021 8:10PM by PIB Mumbai

पुणे, 29 जानेवारी 2021

 

पुणे येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या विस्तारित नूतनीकरणानंतर एका विशेष संस्मरणीय सोहळ्यात आज, 29 जानेवारी 2021 रोजी या स्मारकाचे राष्ट्रार्पण व लोकार्पण करण्यात आले. लेफ्टनंट जनरल सी.पी.मोहन्ती, जनरल ऑफिसर कमांडींग इन चीफ , दक्षिण मुख्यालय यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण केले. पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त तसेच अन्य  नागरी सेवा व लष्करी सेवांमधील मान्यवर या समारंभाला उपस्थित होते. हे स्मारक देशाच्या संरक्षणासाठी लष्करी सेवा देत असलेल्या योगदानाची जाणीव देशातील नागरीकांना करून देईल.  युवावर्गाला लष्करी सेवेत दाखल होण्याची प्रेरणाही या स्मारकामुळे मिळेल.

भारतीय लष्कराने 1971च्या भारत-पाक युद्धात मिळवलेल्या विजयाच्या रजत जयंतीनिमित्त 1998 मध्ये ह्या स्मारकाची उभारणी झाली. इंडियन एक्स्प्रेस समुहाच्या पुढाकाराने 15 ऑगस्ट 1998 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी.सी,अलेक्झांडर यांच्या हस्ते या स्मारकाचे राष्ट्रार्पण झाले होते. आतापर्यंतच्या कालावधीत पुण्यातील महत्वांच्या स्मारकांमध्ये या स्मारकाने स्थान मिळवले आहे.

 

दररोज 1000 पेक्षा जास्त पर्यटक येथे भेट देतात, या स्मारकाचे सौंदर्य वृद्धींगत करण्यासाठी, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कालखंडात भारतीय लष्कराने बजावलेल्या कामगीरींपैकी आठ प्रमुख कामगीरी दर्शवणारे आठ ‘शौर्यस्तंभ’ येथे उभारण्यात आले आहेत. विविध लढ्यांमधील शौर्यगाथा चित्रित केलेली चार म्युरल्स व परमवीरचक्र सन्मान प्राप्त करणाऱ्याचे 21 पुतळेही येथे उभारण्यात आले आहेत. जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, दक्षिण कमांड  यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या कार्यात पुणे महापालिकेने सर्वतोपरी सहकार्य दिले तसेच मेसर्स एम्फोनिल इंटरकनेक्ट इंडिया प्रायवेट लिमिटेड यांनी ,नागरी-लष्करी सहकार्याचे प्रतिक असलेल्या या स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी सहाय्य केले.

 

हे नुतनीकृत युद्ध स्मारक आणि लाईट अँड साउंड शो, सर्व कोविडसंबधीचे नियम पाळून आठवड्यातून तीन दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार व रवीवारी पर्यटकांसाठी खुले राहील, असे यावेळी जाहीर करण्यात आले. 

* * *

M.Iyengar/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1693408) Visitor Counter : 87


Read this release in: English