अणुऊर्जा विभाग

‘बीएआरसी’ने केली अणुआधारित औषधांच्या उत्पादनासाठी पहिल्या ‘पीपीपी‘ संशोधन अणुभट्टीची रचना विकसित


कर्करोगावर प्रभावी आणि परवडणा-या दरामध्ये औषधोपचार करण्यासाठी नवीन प्रकल्प एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार - अणुऊर्जा आयोग अध्यक्ष

Posted On: 29 JAN 2021 6:14PM by PIB Mumbai

मुंबई, 29 जानेवारी, 2021

 

बीएआरसी अर्थात भाभा अणु संशोधन केंद्राच्यावतीने अणुआधारित औषधांच्या उत्पादनासाठी पहिल्या ‘पीपीपी’ संशोधन अणुभट्टीची रचना विकसित केली आहे. अणु ऊर्जा विभागाच्या प्रमुख संशोधन संस्था विविध प्रकारच्या अणुआधारित औषधांच्या उत्पादनाचे तंत्रज्ञान सामायिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या प्रस्तावित भागीदारीमध्ये खाजगी संस्थांना अणुभट्टी आणि प्रक्रिया सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी संशोधन अणुभट्टीमध्ये तयार होणा-या समस्थानिकांवर प्रक्रिया करणे आणि विपणनाचे विशेष अधिकार मिळणार आहेत. दि. 16 मे, 2020 रोजी केंद्रीय वित्तीय मंत्र्यांनी आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा एक भाग म्हणून वैद्यकीय समस्थानिकांच्या निर्मितीसाठी ‘पीपीपी’पद्धतीने संशोधन अणुभट्टीची स्थापना करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. 

अणुऊर्जा विभागाने संभाव्य भारतीय आणि जागतिक गुंतवणूदारांबरोबर या प्रकल्पासाठी प्रारंभीची चर्चा सुरू केली आहे. आता 2021 पहिल्या तिमाहीमध्ये गुंतवणूकदारांचे ‘रोड शो‘ करण्याचा कार्यक्रम ठरविण्यात येत आहे. यानंतर खाजगी भागीदारांच्या निवडीसाठी औपचारिक निविदा मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. प्रस्तावित अणुभट्टीच्या उभारणीचे काम आगामी पाच वर्षांमध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी लागणारे आवश्यक बांधकाम परवाने मिळाल्यानंतर अणुभट्टीचे बांधकाम सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 

अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव के.एन. व्यास म्हणाले की, सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाच्या अनुषंगाने हा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणा-या प्रमुख समस्थानिकांबाबतीत भारत स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असणार आहे. यामुळे प्रभावी आणि परवडणा-या दरामध्ये उपचार करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर नियोजित संशोधन अणुभट्टीसाठटी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अणुआधारित औषधे हा वैद्यकीय क्षेत्राच्या बाजारपेठेत एक महत्वाचा जागतिक घटक बनणार आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात आधुनिक संशोधन अणुभट्टी भारतामध्ये उभारण्यात येणार आहे. 

बीएआरसीचे संचालक डॉ. ए.के. मोहंती म्हणाले, ‘बीएआरसी गेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त काळापासून वैद्यकीय, औद्योगिक आणि संशोधन कार्यासाठी रेडिओ समस्थानकाच्या संशोधनामध्ये कार्य करणारी अग्रणी संशोधक संस्था आहे. ‘बार्क’ च्या या संशोधनामुळे अनेक प्रकारच्या नवीन रेडिओ -समस्थानकांचा विकास आणि प्रक्रिया करण्यात आली आहे, त्याचा परिणाम देशाच्या आयातीमध्ये घट झाली. तसेच देशाचे समस्थानकांबाबतचे अवलंबित्व कमी झाले. आता या प्रकल्पामुळे देशातल्या गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतल्या लोकांना अगदी वाजवी किंमतीमध्ये जीवरक्षकाचे काम करणारी समस्थानिके उपलब्ध होऊ शकणार आहेत.’’ 

* * *

G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1693326) Visitor Counter : 278


Read this release in: English