संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांचा 23 जानेवारी 2021 रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद

Posted On: 23 JAN 2021 8:12PM by PIB Mumbai

पुणे, 23 जानेवारी 2021

 

आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त, भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती, (जनरल ऑफिसर, कमांडर इन चीफ, सदर्न कमांड) यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि लष्कराच्या दक्षिण विभागाशी निगडीत संरक्षण आणि सुरक्षाविषयक मुद्यांवर आपली मते मांडली. या दक्षिण विभागाकडे देशातील 11 राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारी आहे.

दक्षिण विभाग कोणत्याही सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि दिलेल्या आदेशांचे पालन करण्यासाठी पूर्णतः सज्ज आहे, असा विश्वास मोहंती यांनी यावेळी व्यक्त केला.

भारतीय सेनेच्या तिन्ही दलांमधील समन्वयाविषयी बोलतांन ते म्हणाले की तिन्ही सेवांमधील सहकार्य आणि समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने दक्षिण विभागाणे अनेक पावले उचलली आहे. तिन्ही दलांच्या एकत्रित शक्तीतून ‘संयुक्त थियेटर कमांड’तयार करणे हे उद्दिष्ट असून, त्यासाठी देशाच्या सुरक्षेशी संबधित सर्व यंत्रणांच्या एकत्रित भागीदारीच्या दिशेने काम सुरु आहे, असेही लेफ्टनंट जनरल मोहंती यांनी सांगितले.

देशाच्या उभारणीत दक्षिण विभागाच्या योगदानाविषयी बोलतांना त्यांनी सांगितले, की देशासमोर केवळ कोविड सारख्या महामारीमुळेच नाही, तर इतरही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित संकटे/आव्हानांचा सामना करतांना सर्वतोपरी मदत करण्यास दक्षिण विभाग कटिबद्ध आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय धोरणांनुसार आवश्यक ते सर्व सहाय्य करण्यासाठी आम्ही सज्ज असतो, असे ते म्हणाले. यावेळी मोहंती यांनी कोविड योद्ध्यांनी या संकट काळात केलेल्या अविरत सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले

या काळात, देशातील सर्व राज्यात, लष्कर आणि नागरी प्रशासन तसेच पोलीस सेवा यांच्यात उत्तम समन्वय आणि सहकार्याची भावना होती. महामारीच्या काळात गर्दी नियंत्रण करणे असो अथवा मानवी दृष्टीकोनातून केलेली कुठलीही मदत किंवा कामे  योग्य समन्वयातून अचूकपणे पार पडली गेली.

पुण्यात अलीकडेच उद्घाटन झालेल्या कमांड हॉस्पिटलच्या इमारतीविषयी देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. हे बहुपयोगी अत्याधुनिक  रुग्णालय सैनिक आणि निवृत्त सैनिकांसाठी उभारण्यात आले आहे. त्याशिवाय  पुण्यातल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि वस्तूसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे उद्घाटन होईल, अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.  

देशातल्या सर्व नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम  भारतीय लष्कर यापुढेही इतक्याच सक्षमपणे करत राहील, अशी ग्वाही देत देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता अबाधित राखण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे  लेफ्टनंट जनरल मोहंती यांनी शेवटी सांगितले.


* * *

Pune-PIB (Defence)-M.Iyengar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691680) Visitor Counter : 103


Read this release in: English