युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांची पुण्यातील आर्मी रोईंग नोड आणि आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटला भेट
Posted On:
18 JAN 2021 9:26PM by PIB Mumbai
पुणे, 18 जानेवारी 2020
युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी आज, 18 जानेवारी, 2020 रोजी पुण्यातल्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या आर्मी रोईंग नोड आणि आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट ला भेट दिली. क्रीडा खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रिजीजू यांनी रोईंग नोडला पहिल्यांदाच भेट दिली. तर आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटला त्यांनी आज दुस-यांदा भेट दिली.

यावेळी मंत्री रिजीजू यांनी रोईंगच्या प्रशिक्षणाची कार्यपद्धती जाणून घेतली तसेच तिथे सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी केली. सध्याच्या कोरोना काळामध्येही ज्या समर्पित भावनेने गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यात येत आहे, ते पाहून देशाचे क्रीडा क्षेत्रातले भविष्य उज्ज्वल आहे, असा आत्मविश्वास येत असल्याचे किरेन रिजीजू म्हणाले. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सर्व खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील, असेही ते म्हणाले.

आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये मंत्री रिजीजू यांनी राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या काही मान्यवर नेमबाजांशी संवाद साधला. यामध्ये पाच अर्जुन पुरस्कार विजेते आहेत. यापैकी तीन जणांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. या संस्थेत उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण सुविधेचे मंत्री रिजीजू यांनी कौतुक केले. संस्थेला आवश्यक असणारी आर्थिक मदत पुरविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

क्रीडा मंत्र्यांच्या या संस्था भेटीमुळे देशाच्या रोईंग आणि नेमबाजांच्या पथकांमध्ये उत्साह आला असून त्यांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली आहे. देशासाठी पदकांची कमाई करण्यासाठी कठोर परिश्रम हे खेळाडू घेत आहेत.

M.Iyengar/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689833)