रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय महामार्ग कृती आराखड्यात 5801 कोटी रुपयांपर्यंत वाढ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


दिल्ली-मुंबई ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे जेएनपीटी पर्यंत विस्तारणार

आळंदी आणि देहू रोडला पंढरपूरला जोडणारा समांतर पादचारी मार्गासह ‘पालखी मार्ग’ बांधण्यात येणार

Posted On: 07 JAN 2021 11:02PM by PIB Mumbai

मुंबई, 7 जानेवारी 2021

केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी आज मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत  महाराष्ट्रातील महामार्ग पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की, केंद्राने वार्षिक आराखड्याअंतर्गत  महाराष्ट्रासाठी 5,801 कोटी रुपयांच्या नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी 2,727 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी होती. तो  मी वाढवून  5,801 कोटी रुपये केला आहे . यामुळे  राज्यात 1035 किमीचे राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती /विकास होईल असे  गडकरी म्हणाले.

या लांबीमध्ये  3,037 कोटी रुपये खर्चासह  406 किमी लांबीचे दोन पदरी मार्गाचा  विकास समाविष्ट आहे. तसेच, 5 प्रमुख पूल आणि 10 छोट्या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी 429 कोटी रुपयांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, केंद्रीय रस्ते निधी योजनेंतर्गत 1,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे, असे  गडकरी म्हणाले.

कंटेनर वाहतूक सुलभ व्हावी यासाठी ग्रीनफील्ड दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग जेएनपीटी पर्यंत वाढवण्यात येणार आहे.  गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र सरकार जीएसटी सूट आणि रॉयल्टी मुक्त स्टील आणि सिमेंटच्या पुरवठ्याच्या माध्यमातून या प्रकल्पात भागीदारी करेल, जी या प्रकल्पातील राज्य सरकारची मालकी  मानली जाईल.

आम्ही केवळ रस्तेच बांधत नाही आहोत तर आम्ही वृक्षारोपण देखील करत आहोत आणि वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत, असे ते  म्हणाले. पंढरपूर - आळंदी आणि पंढरपूर-देहू रोडला जोडणारा ‘पालखी मार्ग’ बांधला जाणार असून, वारकऱ्यांना पंढरपुरात सुरक्षित आणि आरामदायी तीर्थयात्रेसाठी समांतर पादचारी मार्ग असणार आहे.

गडकरी पुढे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाच्या मुंबई-पुणे महामार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांत जाणाऱ्या  वाहतुकीसाठी सुरतहून नाशिक - अहमदनगर - सोलापूर मार्गे स्वतंत्र उत्तर-दक्षिण महामार्ग बांधला जाईल.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्रात  3,771 कि.मी. काँक्रीटचे रस्ते बांधले आहेत. 2020-21  दरम्यान 2,500 किमी रस्ते बांधणीचे लक्ष्य असून  त्यापैकी आतापर्यंत 1,394 किमीचे  रस्ते पूर्ण झाले आहेत.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686964) Visitor Counter : 148


Read this release in: English