कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

कौशल्य मंत्रालय आणि टाटा यांच्यातर्फे मुंबईतील भारतीय कौशल्य संस्थेच्या पहिल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा शुभारंभ

पहिल्या तुकडीमध्ये फॅक्टरी ऑटोमेशन आणि डिजिटल (स्मार्ट) मॅन्युफॅक्चरिंग या दोन अल्प-मुदतीच्या अभ्यासक्रमांचा समावेश

सर्वप्रथम प्रवेश घेणा-या १०० विद्यार्थ्यांना टाटा आयआयएस, मुंबईकडून दिली जाणार ७५ टक्‍के शिष्यवृत्ती

Posted On: 25 DEC 2020 8:17PM by PIB Mumbai

 

स्किल इंडिया मिशनअंतर्गत भारताला कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या दिशेने वेगाने घेऊन जाण्याच्या लक्ष्याला अनुसरत आणि खासगी क्षेत्राच्या सहयोगाच्या माध्यमातून स्किल इंडिया कार्यक्रमाला चालना देण्यासाठी माननीय केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांच्या हस्ते टाटा-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स येथील प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीचा शुभारंभ करण्यात आला. एका व्हर्च्युअल सोहळ्यामध्ये हा कार्यक्रम पार पडला. ही संस्था म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड आंत्रप्रेन्युअरशीप (एमएसडीई), भारत सरकार आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्‍स यांचा संयुक्त उपक्रम आहे. ११ नोव्हेंबर २०२० रोजी एमएसडीई आणि टाटा आयआयएस यांच्यादरम्यान ही संस्था स्थापन करण्याचा अधिकृत करार झाला होता.

टाटा-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सच्या पहिल्या तुकडीमध्ये फॅक्टरी ऑटोमेशनमधील दोन कामांसाठीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा कालावधी प्रशिक्षणार्थींच्या पूर्वपात्रतेनुसार १ ते ४ आठवड्यांचा असेल. या संस्थेच्या शुभारंभाच्या टप्प्यामध्ये संस्थेकडून आकर्षक शुल्कयोजनांच्या पर्यायांसह पहिल्या १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे. सर्वप्रथम प्रवेश घेणा-या १०० विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्‍के शिष्यवृत्ती योजनेचीही घोषणा करण्यात आली आहे.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना डॉ. महेंद्र नाथ पांडे म्हणाले, “विविध क्षेत्रांतील उच्च दर्जाचे तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण पुरविण्याच्या हेतूने गेल्या वर्षी या अद्ययावत सुविधेची पायाभरणी करण्यात आली आणि आज आयआयएस, मुंबई येथे या संस्थेच्या पहिल्या अभ्यासक्रमांच्या संचाचा शुभारंभ होत असताना, भारताला जगाची कौशल्य राजधानीबनविण्याच्या आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाच्या दिशेने आपण हळूहळू वाटचाल करू लागलो आहोत असे मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो. देशातील इतर प्रमुख शैक्षणिक केंद्रांच्या पावलावर पाऊल टाकत आयआयएस मुंबईसुद्धा भविष्यासाठी सज्ज असे मनुष्यबळ निर्माण करण्याच्या कामी हातभार लावण्यासाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यामध्ये आपली भूमिका बजावणार आहे. स्किल इंडिया मोहीमेला दिलेल्या पाठबळासाठी मी महाराष्ट्र सरकार आणि टाटा समुहाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. या सहयोगातून राज्यातील तरुणाईमध्ये परिवर्तन घडून येईल व  हे युवक रोजगाराचा शोध घेण्याऐवजी रोजगार निर्मितीक्षम बनतील, अशी मला आशा आहे.

या प्रसंगी महाराष्ट्राचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री श्री. नवाब मलिक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि देशासाठी हा उपक्रम भव्य यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वतोपरी पाठिंबा दर्शवण्याची खात्री दिली.

हे प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यासाठी संस्थेने विविध खासगी कंपन्यांचे पाठबळ मिळवले आहे. ज्‍या त्‍यांच्‍या संबंधित क्षेत्रांमध्‍ये अग्रणी आहेत. यापैकी दोन कंपन्‍या इंडस्ट्रियल ऑटोमेशनच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी FESTO आणि न्यूमॅटिक कम्पोनन्ट्सची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी अशी ओळख असलेले जपानचे SMC कॉर्पोरेशन आहेत. आज सुरू झालेल्या अभ्यासक्रमांमध्ये पुढील पाच वर्षांमध्ये आणि त्यानंतरच्या काळात उदयाला येणा-या नोक-यांसाठी तरुणांची तयारी करून घेण्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये भविष्यातील अभ्यासक्रमांचा पाया मानल्या जाणा-या फॅक्टरी ऑटोमेशन आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग (इंडस्ट्री ४.०) तंत्रज्ञान आणि उपयोजन यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. नॅशनल स्किल्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एनएसटीआय), चेंबूर येथील टाटा आयआयएस इंटेरिम कॅम्पसमध्ये हे अभ्यासक्रम चालतील. नॅशनल स्किल्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एनएसटीआय), मुंबई येथे संस्थेच्या कायमस्वरूपी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. २०२२ पर्यंत ही इमारत कामकाजासाठी खुली होण्याची शक्यता असून वर्षाकाठी ५,००० हून अधिक प्रशिक्षणे देण्याची क्षमता या केंद्राजवळ असणार आहे.

टाटा आयआयएसचे संचालक श्री. गिरीश कृष्णमूर्ती म्हणाले, “भारतातील युवावर्गाला कौशल्य आणि रोजगार-सज्जता प्राप्त होण्याच्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या वाटचालीतील प्रगतीचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. येत्या काळामध्ये ही संस्था अशाप्रकारच्या इतर संस्थांसाठी दीपस्तंभाचे काम करेल.

राष्ट्रीय आणि जागतिक बाजारपेठेच्या सतत बदलणा-या मागण्यांनुसार उदयास येणा-या नवनव्या उद्योगक्षेत्रांसाठी सज्ज असे मनुष्यबळ निर्माण करणे हा य संस्थेच्या स्थापनेमागचा हेतू आहे. देशातील सर्वात आघाडीची प्रशिक्षण संस्था बनण्याची या संस्थेची महत्त्वाकांक्षा असून ती व्यावसायिक प्रशिक्षणासाठीच्या जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांनी सुसज्ज असणार आहे. उद्योगक्षेत्रांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संरक्षण, तेल आणि वायू, अंतरिक्ष अवकाश (एअरोस्पेस) आणि इतर उदयोन्मुख उद्योगक्षेत्रांचे मोठ्या प्रमाणात विशेषीकृत (स्पेश्यलाइझ्ड) प्रशिक्षण पुरविण्याची संस्थेची योजना आहे.

टाटा-आयाआयएस मुंबई येथील प्रशिक्षण आणि अध्ययन यांना सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांतील उद्योगांशी असलेल्या निकट संपर्काच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. डिजिटल आणि ऑगमेंटेड लर्निंग प्लॅटफॉर्म्सचा लाभ घेत राबविण्यात येणा-या आधुनिक प्रशिक्षण पद्धतींनी सुसज्ज असलेली ही संस्था शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिसशिप) अंत:स्थापित अभ्यासक्रम (एम्बेडेड कोर्सेस) यांच्यावरही लक्ष केंद्रित करेल व इतर विद्यापीठांशी जोडून घेत उच्च पात्रताही मिळवून देऊ शकेल.

 

मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड आंत्रप्रिन्युअरशीप विषयी (एमएसडीई)

कौशल्यांना अधिक रोजगारक्षम बनविण्यावर भर देत ९ नोव्हेंबर २०१४ रोजी भारत सरकारकडून एमएसडीईची स्थापना केली गेली. एमएसडीईने आपल्या स्थापनेपासूनच धोरणे, आराखड्यांची आखणी आणि दर्जात्मकतेचे निकष तयार करणे, नवे कार्यक्रम आणि योजना सुरू करणे; नवीन पायाभूत सुविधा निर्माण करणे व आधीपासून सरू असलेल्या संस्थांचे आधुनिकीकरण करणे; राज्यांशी भागीदारी; उद्योगक्षेत्रांच्या संपर्कात राहणे आणि कौशल्यांचा सामाजिक स्वीकार व्हावा व ती प्राप्त करण्यासाठीच्या आकांक्षा वाढाव्यात यासाठी लक्षणीय उपक्रम आणि सुधारणा हाती घेतल्या आहेत. कुशल मनुष्यबळाला असलेली मागणी व पुरवठा यांच्यातील दरी भरून काढणे हे मंत्रालयाचे लक्ष्य आहे, जेणेकरून केवळ सध्या प्रचलित नोक-यांसाठीच नव्हे तर भविष्यात निर्माण होऊ घातलेल्या कामांसाठी आवश्यक अशा नव्या कौशल्यांची आणि नवसंकल्पनांची उभारणी होऊ शकेल. स्किल इंडिया मोहिमेअंतर्गत आजवर तीन कोटींहून अधिक लोकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. प्रधान मंत्री कौशल विकास योजना (पीएमकेव्‍हीवाय) २०१६-२०२० या आपल्या प्रमुख कार्यक्रमांतर्गत मंत्रालयाने जवळ-जवळ एक कोटी उमेदवारांना प्रशिक्षण दिले आहे.

 

कौशल्य विकासाविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी कृपया पुढील लिंक्स पहा:

फेसबुक: www.facebook.com/SkillIndiaOfficial  ; ट्विटर: @MSDESkillIndia ;

यूट्यूब: https://www.youtube.com/channel/UCzNfVNX5yLEUhIRNZJKniHg  

 

M.Chopade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1683700) Visitor Counter : 26


Read this release in: English