संरक्षण मंत्रालय
भारताने पाकिस्तानवर 49 वर्षांपूर्वी मिळवलेल्या नेत्रदीपक विजयाची गाथा सांगणाऱ्या 16 डिसेंबर या विजय दिवसानिमित्त वीरांचे स्मरण
Posted On:
16 DEC 2020 6:42PM by PIB Mumbai
लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडीग इन चीफ लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या विजय दिनानिमित्त विजयी वीरांचे स्मरण केले आहे. भारतीय सैन्याने केवळ 13 दिवसांत या युद्धात विजय मिळवला होता आणि पाकिस्तानला पूर्ण शरणागती पत्करावी लागली होती. या युद्धाचा परिणाम म्हणूनच पाकीस्तानचे विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली होती.
लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी यानिमित्त 1971 च्या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या शूर वीरांचे स्मरण केले. त्यांनी आपले शौर्य,हिंमत, निश्चयाची गाथाच दक्षिण विभागाच्या इतिहासात लिहिली आहे आणि येणाऱ्या सर्व पिढ्यांना त्यांच्या या शौर्याचा अभिमान वाटेल, असे मोहंती यांनी म्हटले आहे. विजय दिनानिमित्त या युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व योद्ध्यांना दक्षिण विभाग सलाम करतो, असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
या युद्धातील लोंगेवाला आणि प्ररबत अली या गाजलेल्या लढाया भारतीय लष्कराचे अमर्याद धैर्य आणि निश्चयाचेच दर्शन देणाऱ्या आहेत. भारतीय सैनिकांच्या पराक्रमापुढे शत्रूची लढण्याची उमेदही संपून गेली होती. लेफ्टनंट कर्नल भवानी सिंग (नंतर ब्रिगेडियर) यांच्या नेतृत्वाखाली 10 पैरा कमांडो बटालियनने पाकिस्तानामधल्या छाछरो गावात घुसून फडकावलेला तिरंगा ही या युद्धातला आणखी एक चित्तथरारक आणि गाजलेला पराक्रमही दक्षिण विभागाच्या सैन्याच्या नावावर जमा आहे.
लष्कराचा दक्षिण विभाग, युद्धासाठी सदैव सज्ज, तैयार आणि देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या वीर जवानांची कमांड आहे, असे लेफ्टनंट जनरल मोहंती यांनी म्हटले आहे.
****
M.Iyanegar/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1681174)
Visitor Counter : 124