पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 लसनिर्मिती सुविधा केंद्रांना भेट देऊन लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा घेतला आढावा
Posted On:
28 NOV 2020 10:50PM by PIB Mumbai
पुणे, मुंबई, नवी दिल्ली - दि. 28 नोव्हेंबर, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या तीन शहरातल्या लसनिर्मिती सुविधा केंद्रांना भेट देऊन लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. मोदी यांनी आज अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्क, हैद्राबादेतल्या भारत बायोटेक आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, या तीन संस्थांना भेट दिली.
सध्याच्या काळामध्ये संपूर्ण देशाचे लक्ष कोविडविरोधी लस कधी येणार, याकडे लागले आहे, अशावेळी पंतप्रधानांनी या लस निर्मिती करणा-या संस्थांना भेट दिली. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली, याबद्दल संशोधकांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे आमच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी आणि आमचे मनोबल वाढविण्यासाठी मदत मिळणार असल्याची भावनाही संशोधकांनी व्यक्त केली. स्वदेशामध्ये लस विकसित करण्यासाठी इतक्या कमी कालावधीमध्ये ,वेगाने केलेल्या प्रगतीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शास्त्रज्ञांच्या कार्याविषयी अभिमान वाटत असल्याचे सांगितले. लस विकसित करण्याच्या संपूर्ण कार्यामध्ये भारत ,विज्ञानाच्या तत्वांचे किती काटेकोरपणे पालन करीत आहे, याविषयी पंतप्रधानांनी भाष्य केले. तसेच तयार होत असलेली लस सर्वांपर्यंत वितरित करण्यासाठी अधिक सुयोग्य प्रक्रियेची शिफारस करण्यात यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
लस केवळ आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे असे नाही तर जगाच्या भल्याचा विचारही आपण करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. या कोरोना विषाणू विरुद्धच्या एकत्रित लढ्यामध्ये शेजारधर्म म्हणून इतर राष्ट्रांना अशा संकटकाळी मदत करणे, भारताचे कर्तव्य आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
या लसीसंबंधी नियामक प्रक्रियेमध्ये आणखी कशा पद्धतीने सुधारणा करता येईल, याविषयी शास्त्रज्ञांनी अगदी मोकळेपणाने आणि स्पष्ट, विनासंकोच मते मांडावीत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. कोविड-19 विरोधात अधिक ताकदीने लढा देण्यासाठी नवीन आणि पुन्हा वापरता येण्यायोग्य औषधे कशी विकसित करण्यात येत आहेत, यासंबंधीच्या अभ्यास आढाव्याचे सादरीकरण शास्त्रज्ञांनी केले.
अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्कला पंतप्रधानांनी आज भेट दिली. येथे झायडस कॅडिला या संशोधन आणि औषध निर्माण कंपनीने डीएनएवर आधारित स्वदेशी झायडस बायोटेक पार्कमध्ये लस निर्मितीचे काम सुरू आहे. ‘‘ झायडसच्या टीमकडून केल्या जाणा-या प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा. या प्रवासामध्ये सरकारचा सक्रिय सहभाग असून आवश्यक असणारा सर्व पाठिंबा सरकारकडून देण्यात येईल’’, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
यानंतर पंतप्रधानांनी हैद्राबादच्या भारत बायोटेक या लस सुविधा केंद्राला भेट दिली. भारत बायोटेकमध्ये कोविड-19 विरोधी स्वदेशी लस निर्मितीच्या प्रगतीविषयी माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी केलेली प्रगती जाणून घेवून, त्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. आयसीएमआरबरोबर भारत बायोटकची टीम कार्यरत असून संस्थेने लस निर्मितीसाठी वेगाने प्रगती साधली आहे.
सिरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधानांनी भेट दिली, त्यावेळी सिरममधील लस उत्पादनाशी संबंधित लोकांशी संवाद साधला. लस निर्मिती आणि उत्पादन वाढीसाठी आखण्यात आलेल्या योजनेची त्यांनी माहिती घेतली. तसेच लस वितरणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या योजनेचा तपशील पंतप्रधानांनी जाणून घेतला. सिरम संस्थेमध्ये नोवावॅक्स कोविशिल्ड लस तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
सिरम इन्स्टिट्यूटला दिलेल्या भेटीनंतर पंतप्रधानांनी व्टिट करून लस निर्मिती, वितरण या कार्यातील प्रगतीचा तपशील संस्थेने दिल्याचे आणि उत्पादन सुविधेचा आढावा घेतल्याचे सांगितले आहे.
-----
Jaydevi PS/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676891)
Visitor Counter : 141