अर्थ मंत्रालय
वस्तू आणि सेवा कर गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दुसऱ्याला दिल्याबद्दल आणि त्याचा लाभ घेतल्याबद्दल दोन व्यक्तींना अटक केली
Posted On:
12 NOV 2020 7:55PM by PIB Mumbai
मुंबई, 12 नोव्हेंबर 2020
वस्तू आणि सेवा कर गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने सुनील हायटेक इंजिनिअरिंग लिमिटेडचे संचालक सुनील रत्नाकर गुट्टे यांना बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट वापरल्याबद्दल आणि दुसऱ्याला दिल्याच्या आरोपाखाली आज, 12 नोव्हेंबर 2020 रोजी अटक केली. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या बळावर 520 कोटी रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यात आले.
वस्तू आणि सेवा कर गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई विभागाच्या तपासणीनुसार असे आढळले आहे की विविध कंपन्यांचा मोठा समूह या फसवणुकीत सहभागी आहे. सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडने अंदाजे 3,000 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या दिल्या आणि घेतल्या. यात 520 कोटी रुपये आयटीसी समाविष्ट आहे. महासंचालनालयाने देशभरात केलेल्या तपासात उघड झाले आहे की या बोगस बिलांचे लाभार्थी नवी दिल्ली, हैदराबाद, लुधियाना, गुरुग्राम, मेरठ, अहमदाबाद, कोलकातासह देशाच्या सर्व भागात आहेत. तपासात असे दिसून आले आहे की सुनील हायटेक इंजिनियर्स लि. हे संपूर्ण भारतात बनावट आयटीसी कार्टेलमध्ये सहभागी असलेल्या प्रमुख गैैरव्यवहार करणाऱ्या कंपन्यापैकी एक आहे.
समांतर कारवाईत,वस्तू आणि सेवा कर गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने ओशिया फेरो अॅलोय प्रा. लि.चे संचालक विजेंद्र विजयराज रंका यांना अटक केली. सध्या सुरु असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने महासंचालनालयाने श्री ओशिया फेरो अॅलोय प्रा. लि.चे बोगस व्यवहारांचा शोध घेतला. त्यानंतरच्या चौकशीत असे निष्पन्न झाले की श्री ओशिया फेरो अॅलोय प्रा. लिमिटेडने 1371 कोटी रुपयांच्या बोगस पावत्या जारी केल्या तसेच कोणतीही वस्तू किंवा सेवा न घेता बोगस चालान घेतले. यात 209 कोटी आयटीसीचा समावेश आहे. श्री ओशिया फेरो अॅलोय प्रा. लि.ने सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडला भरीव पुरवठा केल्याचेही उघड झाले आहे.
हे बोगस व्यवहार फक्त बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट तयार करण्यासाठीच नव्हे तर कृत्रिमरित्या उलाढाल वाढवण्यासाठी देखील वापरण्यात आले जेणेकरुन जास्त पत मर्यादा आणि बँक कर्ज मिळू शकेल आणि हळूच निधीही काढून घेता येईल.
सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 132 नुसार वस्तू किंवा सेवांचा पुरवठा केल्याशिवाय इनव्हॉइस किंवा बिल जारी करणे आणि वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता बिल / इनव्हॉइसवर इनपुट टॅक्स क्रेडिटचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणे किंवा त्याचा वापर करणे दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे .
मेसर्स सुनील हायटेक इंजिनियर्स लि. आणि श्री ओशिया फेरो अॅलोय प्रा. लि., यांनी केलेल्या मोठ्या फसवणूकीच्या पार्श्वभूमीवर संचालकांना केंद्रीय वस्तू व सेवा कायदा , 2017 च्या कलम 132 (1) (b)आणि 132 (1) (c) अंतर्गत गुन्हा केल्याबद्दल अटक करण्यात आली आणि उच्च न्यायालयात हजर केले गेले. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1672383)
Visitor Counter : 177