रेल्वे मंत्रालय
कॅसलरॉक आणि वास्को द गामा दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपरीकरण जनतेच्या हितासाठी -भारतीय रेल्वे
कोणत्याही नवीन परिसराचा समावेश नाही, पर्यावरणावर परिणाम नाही, अतिशय कमी प्रमाणात वृक्षतोड
या भागात हरित आणि कार्बन न्यूट्रल वाहतुकीसाठी मार्ग सुकर
Posted On:
11 NOV 2020 11:45PM by PIB Mumbai
गोवा, 11 नोव्हेंबर 2020
दक्षिण पश्चिम रेल्वेने आज कॅसरलॉक ते वास्को दा गामा दरम्यान रेल्वे मार्ग दुपरीकरणाबाबत ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना दक्षिण पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक पी.के मिश्रा म्हणाले की, होस्पेट (कर्नाटक) आणि वास्को-द -गामा (गोवा) दरम्यान 342 कि.मी. रेलवे मार्गाचे दुपदरीकरण गोव्यासाठी मोठे परिवर्तन घडवणारे ठरेल. प्रदेशाच्या विकासाला नवी भरारी देईल, व्यापाराला चालना देईल आणि प्रवासी वाहतूक सुलभ आणि वेगवान बनवेल.
रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणामुळे गतिशीलता सुधारेल आणि प्रदेशातील सर्व प्रकारच्या हवामानात रेल्वे सेवा सुरु राहील. सध्या एकेरी मार्गावर मोठा घाट असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आणि रेल्वे चालवण्याच्या क्षमतेवर मर्यादा येते.
प्रकल्पाचे प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे -
- अधिक प्रवासी गाड्या
- उत्तम आंतरराज्य संपर्क व्यवस्था
- आसपासच्या राज्यांमध्ये व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल
- पर्यटकांचा ओघ वाढेल
- मधल्या स्थानकांवर पायाभूत सुविधा वाढतील
- घाट विभागातील कोंडीवर दिलासा
- स्थानकांच्या प्रवासी सुविधामध्ये सुधारणा
- 24 डब्यांसाठी यार्डचे पुनरमॉडेलिंग
- रस्ते वाहतूक सक्षम करण्यासाठी 5 उड्डाणपूल आणि 3 भुयारी पुलांचे बांधकाम
उपमहाव्यवस्थापक आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी ई. विजया यांनी आश्वासन दिले की सर्व हितधारकांना विश्वासात घेतले जाईल आणि जनतेला भेडसावणाऱ्या चिंतांकडे लक्ष दिले जाईल. केवळ राज्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आणि जिल्हा प्रशासन व गोवा सरकारकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर कामाची अंमलबजावणी केली जाईल.
हा प्रकल्प राबवण्यासाठी रेल्वेचे नियोजन –
- सुलभ, वेगवान, हरित वाहतूक: सर्वात ऊर्जा-कार्यक्षम मार्गाने प्रवासी वाहतूक सुलभ आणि जलद बनवण्यासाठी संपर्क व्यवस्था अधिक बळकट करणे हे दुपदरीकरणाचे उद्दिष्ट आहे.
- कमी कोळसा, नवीकरणीय उर्जा स्त्रोतांवर भर : वीज निर्मितीसाठी पर्यावरणस्नेही ऊर्जा स्त्रोत/संसाधने वापरण्यावर भर दिला जात आहे.
- कोळशाच्या वापरात घट : कोळशाचा वापर हळूहळू कमी होत आहे आणि अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वाटा हळूहळू वाढत आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेची कोळसा वाहतूक 2015-16 मधील 12 दशलक्ष टनांवरून 2019-20 मध्ये 9 दशलक्ष टनापर्यंत कमी झाली आहे.
- पर्यावरणावर कोणताही अतिरिक्त परिणाम नाही: रेल्वेच्या जमीनीवर प्रामुख्याने दुपदरीकरणाचे काम केले जात आहे. बांधकामादरम्यान कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेतली जाईल आणि वृक्षतोड कमीतकमी व्हावी यासाठी संरेखन करण्याचा निर्णय घेतला जाईल. कामाचे नियोजन करण्यापूर्वी, बंगळुरूच्या आयआयएससीकडून पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यास केला जाईल.
- इमारती आणि घरांवर कमीतकमी प्रभाव: संरेखनाचे काम अशा प्रकारे केले जात आहे की दुपदरीकरणामुळे एकही इमारतीवर पूर्ण परिणाम होणार नाही. फक्त काही घरांच्या (12 पेक्षा कमी) कंपाऊंड भिंती बाधित होऊ शकतात आणि हे देखील टाळण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
- पी.के. क्षत्रिय, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, आरव्हीएनएल; एस. के. झा, हुबळी विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

पार्श्वभूमी
गोवा राज्यातील कॅसल रॉक आणि वास्को-द -गामा दरम्यान सध्या अस्तित्त्वात असलेला एकेरी मार्ग शतकाहूनही जुना आहे. रेल्वे मंत्रालयाने सन 2010-11 मध्ये 2,127 कोटी रुपये खर्चासह होस्पेट (कर्नाटक) आणि वास्को-द -गामा (गोवा) दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी दिली होती. उन्काळ आणि हुबळी दरम्यान दहा किलोमीटर वगळता हा प्रकल्प कर्नाटक राज्यात जवळपास पूर्ण झाला आहे. मार्च 2021 पर्यंत तो कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे. गोवा राज्यातील मडगाव-मजोर्डा दरम्यान सुमारे 90 कि.मी.चा मार्गही दुहेरी करण्यात आला आहे. उरलेले सुमारे 90 कि.मी. क्षेत्र गोवा राज्यात आहे, आवश्यक ती मंजुरी दिल्यानंतर दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात येईल.
घाटात दरडी कोसळण्याचा धोका असून एकेरी मार्ग असल्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग अनेकदा बंद असतो.
दुपदरीकरणामुळे या समस्या सुटतील आणि प्रदेशाच्या विकासाला चालना मिळेल.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1672218)
Visitor Counter : 131