श्रम आणि रोजगार मंत्रालय

ईपीएफओ निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या सोईनुसार वर्षभरामध्ये कधीही डिजिटल प्रमाणपत्र सादर करण्याची परवानगी


गोवा ईपीएफओ अंथरूणाला खिळून असलेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या निवासस्थानी जाऊन जीवन प्रमाणपत्र संकलित करणार

Posted On: 06 NOV 2020 8:40PM by PIB Mumbai

गोवा, 6 नोव्हेंबर 2020

 

सध्या कोविड-19 महामारीचा उद्रेक लक्षात घेता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्यावतीने सर्व निवृत्तीवेतनधारकांची सुरक्षा लक्षात घेऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र वर्षभरामध्ये कधीही त्यांच्या सोईनुसार सादर करण्याची परवानगी गोवा ईपीएफओने दिली आहे. तसेच सीएससी म्हणजेच सामान्य सेवा केंद्रांबरोबर भागीदारी केली आहे. त्याचबरोबर टपाल कार्यालयांमध्येही डिजिटल जीवन प्रमाणपत्र संकलित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या सोयीनुसार सेवा वितरण एजन्सी निवडण्याची  मुभा देण्यात आली आहे.

ईपीएफओने निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या सोईनुसार वर्षाभरात कधीही डिजिटल प्रमाणपत्र सादर करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर याच महिन्यात प्रमाणपत्र सादर करावे, या नियमात धोरणात्मक बदल करण्यात आला आहे. एकदा दिलेले जीवन प्रमाणपत्र एक वर्षासाठी वैध असणार आहे. उदाहरणार्थ - नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये सादर केलेले जीवन प्रमाणपत्र नोव्हेंबर- डिसेंबर 2020 पर्यंत वैध असणार आहे. यानुसार मासिक निवृत्तीवेतन जमा करण्यात येईल. सामाजिक सुरक्षा कवच म्हणून असलेले हे निवृत्तीवेतन घेताना कोणताही त्रास होऊ नये म्हणून ही सुविधा दिली आहे.

ईपीएस निवृत्तीवेतनधारकांनी पीएफ कार्यालयाला भेट देणे टाळून त्याऐवजी आपल्या सोईच्या सामान्य सेवा केंद्रांवर अथवा संबंधित बँक शाखा, जवळचे टपाल कार्यालय येथे जीवन प्रमाण पत्र, आधार कार्ड, ‘बायोमेट्रिक डिजिटल लाइफ’ प्रमाणपत्र, सादर करण्यात यावे. सामान्य सेवा केंद्रांची माहिती https://locator.esecloud.in. या संकेतस्थळावरून जाणून घेणे शक्य आहे. निवृत्तीवेतन धारकांनी फक्त त्यांचा मोबाईल क्रमांक, बँक पासबुक, पेन्शन पेमेंट आॅर्डर क्रमांक आणि आधार क्रमांक नोंद करण्याची गरज आहे. स्थानिक टपाल कार्यालयामध्येही ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण गोव्यामध्ये 254 टपाल कार्यालये आणि 100 सामान्य सेवा केंद्रे आहे. त्यामध्ये जीवन प्रमाण पत्र सादर करण्याची सेवा आहे.

वृद्ध, अंथरूणाला खिळून असलेले, अशक्त निवृत्तीधारक व्यक्तींसाठी गोवा ईपीएफओने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे जीवन प्रमाणपत्र संकलित करण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी अशा व्यक्तींच्या कुटुंबातील कोणाही सदस्यांनी ro.goa@epfindiagov.in ईमेलव्दारे विनंती करावी.

कोविड-19 महामारीचा काळ लक्षात घेऊन निवृत्तीवेतन धारकांनी जवळची बँक शाखा, टपाल कार्यालय, सामान्य सेवा केंद्र येथेच जीवन प्रमाण पत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1670798) Visitor Counter : 113


Read this release in: English