माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते ऑनलाईन चित्रपट रसास्वाद शिबिराचे उद्घाटन
Posted On:
02 NOV 2020 3:00PM by PIB Mumbai
मुंबई, 2 नोव्हेंबर 2020
सिनेमा म्हणजे काळ आणि अवकाश यामध्ये लीलया संचार करणारे प्रभावी माध्यम आहे. तंत्रज्ञान विकसित होत असले तरीही दृक श्राव्य भाषा बदलणारी नाही म्हणून या भाषेविषयी साक्षर होणे महत्वाचे आहे” असे मत नाट्य कलाकार आणि चित्रपट अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांनी चित्रपट रसास्वाद शिबिराचे उद्घाटन करताना व्यक्त केले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय ऑनलाईन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय चित्रपट चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि चित्रपट रसास्वाद शिबिराचे समन्वयक श्री सतीश जकातदार आणि श्री सुहास किर्लोस्कर हे उपस्थित होते.
ऑनलाईन शिबिरास महाराष्ट्रातील अनेक शहरा-गावामधून तसेच अमेरिका -सिंगापूर येथून 80 चित्रपट रसिक या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत ज्यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, इंजिनियर सारख्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या रसिकांचा समावेश आहे.
उद्घाटन प्रसंगी डॉ मोहन आगाशे यांनी सांगितले की बाळाचा जन्म झाल्यानंतर वास, चव आधी कळते. माणसाला शब्दाची भाषा नंतर समजते त्यापूर्वी त्याला दृश्यात्मकता समजते. लहान मुल दृक श्राव्य माध्यमातून नक्कल करण्यास शिकते. शालेय जीवनात विद्यार्थ्याना वाचणे आणि लिहिणे यावर अधिक भर दिला जातो आणि दृक श्राव्य समज मागे पडत जाते. अनेकवेळा एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्यासाठी बरीच पाने खर्च करावी लागतात तेच चित्रपटाच्या माध्यमातून 20 सेकंदात दाखवले जाऊ शकते आणि ते परिणामकारकरीत्या अनेकांपर्यंत पोहोचू शकते. गेल्या वीस वर्षात तंत्रज्ञानात झपाटयाने बदल झाले असले तरीही चित्रपटाची भाषा बदललेली नाही, त्यामुळे आपण या माध्यमासंबंधी साक्षर होणे गरजेचे आहे.
या वर्षीचे पंधरावे शिबीर 1 नोव्हेबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीनुसार ऑनलाईन घेतले जाणार आहे. चित्रपट या कलेचा रसास्वाद कसा घ्यावा, चित्रपट कसा निर्माण केला जातो, चित्रपटाच्या निर्मितीमधील कथा, पटकथा, दिग्दर्शन, कॅमेरा, अभिनय, संकलन, चित्रपटाचे पार्श्वसंगीत, वितरण, चित्रपटाचे जतन करणे अशा अनेक पैलूंचा समावेश असलेल्या चित्रपट रसास्वाद शिबिरामध्ये यावर्षी जागतिक सिनेमा, भारतीय सिनेमा आणि प्रादेशिक सिनेमांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीकोनातून डॉ मोहन आगाशे,समर नखाते, दीपक देवधर, सुहास किर्लोस्कर, अभिजित देशपांडे, अनुपम बर्वे, उमेश कुलकर्णी, श्यामला वनारसे, गणेश मतकरी, उज्वल निगुडकर, अभिजित रणदिवे, राहुल रानडे, सुधीर नांदगावकर, प्रकाश मगदूम असे अनेक तज्ञ विश्लेषक व्याख्यान देणार आहेत.
यासंदर्भात बोलताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयांचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, "सुजाण प्रेक्षक तयार व्हावेत यासाठी चित्रपट साक्षरता महत्वाची आहे. दिग्दर्शक पडद्यावर काय मांडतो आहे, ते प्रेक्षक म्हणून सजगपणे समजणे हि गरज आहे. यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे आणि ही कार्यशाळा हा त्याचाच एक भाग आहे."
MC/NFAI/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669446)
Visitor Counter : 186